छटा हरहुन्नरीच्या-कोल्हापूर स्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:48 AM2018-08-31T00:48:35+5:302018-08-31T00:50:08+5:30
खरं म्हणजे बाळ चव्हाण यांच्यावर एका लेखात सर्वच कलांचं रेखाटन करणं म्हणजे त्यांच्या कलासक्त, प्रयोगशील कारकिर्दीवर अन्याय होईल. छत्रपती राजाराम महाराजांच्या डायनिंग हॉलमध्ये माश्या येऊ नये म्हणून कल्पकतेने
शिवशाहीर डॉ. राजू राऊत
खरं म्हणजे बाळ चव्हाण यांच्यावर एका लेखात सर्वच कलांचं रेखाटन करणं म्हणजे त्यांच्या कलासक्त, प्रयोगशील कारकिर्दीवर अन्याय होईल. छत्रपती राजाराम महाराजांच्या डायनिंग हॉलमध्ये माश्या येऊ नये म्हणून कल्पकतेने त्यांनी जसे घड्याळाच्या मॅकॅनिझमचा वापर करून छोटे उपकरण केले तसे त्यांचे घर ते कंपाऊंड हे अंतर साठ-सत्तर पावलांचे. घरी कुणी आला की गेट लोखंडी व शेजारच्या निलगिरीच्या झाडाखाली लाकडी ठेप्यावर तिथे एक दगड ठेवलेला असायचा. तो घेऊन त्या गेटवर वाजवला की आतून आवाज ऐकू यायचा, ‘अगं, शकुंतला पाहिलंस का कोण आलंय? मग तार्इंचं येणं, गेट उघडणं, बाहेरच लाकडी झाडाच्या बुंध्यात एक काष्ठशिल्प तयार केलेलं एका म्हातारीचं.
त्या लाकडी शिल्पालाच जुनं लुगडं गुंडाळलेलं. हातात एक कंदील. तो रात्रभर एका वातीने त्या एकुलत्या एक घराची राखण करायचा. चौकटीच्या दारातच घरभर फिरणारा मोर स्वागताला तयार असे.
तिथून आत स्टुडिओ. इथेच मोठमोठी शिल्पे तयार व्हायचीत. आजवर केलेल्या शिल्पांच्या प्लास्टर कॉपीज अनेक क्षेत्रात प्रयोगशीलता करत त्यांनी अनेक शिल्पाकृती बनवल्या. पद्माराजे गार्डनमधील आबालालांचा पुतळा तर मास्टर वर्क. तशी सर्वच कामे ही वेगवेगळ्या अंगांनी तशी वैशिष्ट्यपूर्णच. छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळ्यातील अर्धपुतळा, छ. चिमासाहेब यांचा एकमेवाद्वितीय पुतळा, के. एम. सी. कॉलेजच्या प्रांगणातील राजमाता जिजामाता यांचा बस्ट. माधवराव बागल यांच्या पुतळ्याचे बाळ चव्हाण गेल्यानंतर कास्टिंग झाले, पण बरीच वर्षे त्याची प्लास्टर कॉपी तिथेच स्टुडिओत होती. क्ले मॉडेलमधील टोपीवर, कोटाचे काम करताना जे थम अॅप्लिकेशन (अंगठ्याने माती लावणे) झाले होते, त्यातील बोटावरचे शंख, चक्रही ते स्वत: दाखवत.
व्यवहाराची तर अशी कथा की, एकदा एक फुटाचे जवळपास १५० अश्वारूढ छ. शिवाजींच्या पुतळ्याची आॅर्डर ७५ हजार रु. अॅडव्हान्स घेऊन स्वीकारली. पूर्ण झाले काम. ठरलेल्या रकमेपेक्षा पार्टी फारच कमी द्यायला लागली. बरीच हुज्जत झाली. बाळ चव्हाणांनी त्यांना तिथेच बसवले. थेट आमच्या घरी आले. वडिलांना बरोबर घेतले. सोबत पिशवीतून आणलेले सोन्याचे दागिने बलभीम बॅँकेत ठेवले. खात्यावरील शिल्लक रक्कम काढून ७५ हजाराची बेजमी केली नि घरी जाऊन गिºहाईकांच्या पुढ्यातच भट्टी पेटवून ते ब्रांझचे तयार पुतळे वितळून टाकले नि अॅडव्हान्स परत दिली. सगळी समिती जीपमधून बसून गेली.
राजाराम टॉकीजच्या प्रोजेक्टरचा रिफ्लेक्टर नवाच पॅकिंगसह आला. त्या काचेला भोक पाडूनच त्यातून कार्बन कांडी जळत झाल्या प्रकाशातून रिफ्लेक्ट होत दृश्य पडद्यावर दिसत असे. काचेला भोक पाडणे हे महाकठीण काम. त्यात ही रिफ्लेक्टरची महागडी काच. एक तर मुंबई नाही तर कोलकाता. एकाच मशीनवर रिळे बदलत मध्ये वेळ घेण्यानं आॅपरेटर शिव्या खात थिएटर चालू होते. शेवटी ‘बाळ’ना बोलावले ते जोखमीचे काम त्यांनी लीलया केले.
बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा त्यांच्या हयातीतच बसवला आहे. त्या निमित्ताने बाबासाहेब सलग पाच-सहा दिवस बाळासाहेबांच्या समोर येऊन बसत. समोर सिटींग्ज दिल्यामुळेच बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हुबेहूब या पुतळ्यांमध्ये साकारले गेले आहे.
शाहीर अमर शेखांचेही तसेच समोर लाईफ केले आहे. ते हसतमुख आहे. असे एकमेव लाईफ माझे बघण्यात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने शाहीर अमर शेख यांचा कार्यक्रम वरुणतीर्थ वेस मैदानात होता. निव्वळ माझे वडील कृ. दा. राऊत व बाळासाहेब यांच्या स्नेहातूनच शाहीर अमर शेख हे आमचे घरी आले. ही कधीच न विसरणारी घटना माझ्या मनात घट्ट आहे.
अनेक व्यक्ती, अनेक माध्यमे, अनेक कलाप्रकारात मनमुराद स्वैर आनंद घेणारा हा कलाकार जेव्हा अनंतात विलीन झाला, तेव्हा कोल्हापूर वैकुंठभूमीतील अग्नी संस्काराच्या सर्वच जागा फुल्ल झाल्या होत्या. तिथंच अगदी एका बाजूला सरण रचले गेले. जमलेल्या फार कमी लोकांमध्ये माधवराव बागल होते. ते श्रद्धांजलीच्या भाषणात म्हणाले, ‘बाळ आयुष्यभर शहराबाहेरच राहिला. आजही सर्वच प्लॉट फुल्ल आहेत. आजही बाळ गावाबाहेरच चिरविश्रांती घेत आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो.’
(लेखक कोल्हापुरातील नामवंत आर्टिस्ट आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com