गणेश विसर्जनाची लोकचळवळ !
By वसंत भोसले | Published: September 25, 2018 07:03 PM2018-09-25T19:03:34+5:302018-09-25T19:22:56+5:30
कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे.
कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे. त्यामुळेच करवीर संस्थानच्या संस्थापिका ताराराणी यांचा औरंगजेब विरुद्धचा लढा असो की, राजर्षी शाहू महाराज यांचा सनातनी प्रवृत्ती विरुद्धचा संघर्ष असो याला एक महत्त्व प्राप्त झाले. आजही त्या परंपरेतून कोल्हापूरचा परिसर जातो आहे.
शेती समृद्ध निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराची चळवळ झाली. त्यातून एक समृद्ध कृषी उद्योगाची माळ तयार झाली. व्यापारपेठ उभी राहिली. बँकिंगची चळवळ तयार झाली. औद्योगिकीकरणाचा विस्तारही झाला. याच्या जोडीला शिक्षण क्षेत्रातही काम करणारी अनेक व्यक्तिमत्त्वे उदयास आली. त्यातून नवी पिढी सुशिक्षित झाली. ही सर्व परंपरा समृद्ध करण्याची मानसिकता या मातीत रूजली आहे.
गणेशोत्सवाचा अकरा दिवसांचा सण नुकताच पार पडला. तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे. त्याला लोकोत्सवाचे स्वरूप आले आहे. मात्र, त्याच्या विस्ताराबरोबर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्याकडे गेल्या तीस वर्षांपासून लक्ष वेधले जात आहे आणि त्याला लोकांनी आश्रयही दिल्याने ती आता लोकचळवळ होऊ लागली आहे. कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून कोकण आणि घाटमाथा यांचे विभाजन करणारी सह्याद्री पर्वतरांगा दक्षिणोत्तर विस्तारल्या आहेत. या पर्वतरांगांतून छोट्या- मोठ्या चौदा नद्यांचा उगम होतो. यापैकी एक-दोन नद्यांचा अपवाद सोडला तर सर्वच नद्यांवर धरणे झाली आहेत. परिणामी, या नद्यांची खोरी बारमाही वाहणाऱ्या पाण्याने पाणीदार झाली आहेत.
पाणी उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापरावर अधिक भर देण्यात आला. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, उद्योग-व्यवसाय चालविण्यासाठी पाण्याचा वापर वाढत गेला. मात्र, ते वापरुन सोडलेले पाणी पुन्हा नदीत मिसळू लागले. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण वाढू लागले. त्याची तीव्रता वाढत गेली. तशी पंचगंगा या मुख्य नदीच्या प्रदूषणावरून लोकचळवळ उभी राहू लागली. त्याच्या मुळाशी सांडपाणी तसेच इतर प्रदूषित पाण्याचे कारण होते. त्याच्यावर चर्चा होत-होत पाणी प्रदूषणाचे सर्व मार्ग बंद करण्याची मागणी पुढे येत राहिली.
गणेशोत्सवानिमित्त निर्माण होणारे निर्माल्य नदीत टाकले जात होते. शिवाय हजारो गणेशमूर्ती नदीत विसर्जित केल्या जात होत्या. त्यांच्या विसर्जनाने पाण्याचे प्रदूषण हा विषयही चर्चेत आला. मात्र, धार्मिक अधिष्ठान असल्याने गणेशाचे विसर्जन करायचे कसे? निर्माल्य कोठे टाकायचे? हा सवाल उपस्थित होऊ लागला.
मूर्तिदान आणि निर्माल्य गोळा करून त्याचे खत तयार करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रारंभी त्यास प्रतिसाद फारच कमी मिळाला. अनेकांनी धार्मिक परंपरा आणि निष्ठा यांचे कारण पुढे देत विरोधही केला. लोकांना मात्र हळूहळू ही कल्पना पटू लागली. पाण्याचे प्रदूषण करण्यात भर टाकायची का? हा सवाल त्यांच्या मनातही उपस्थित होऊ लागला. निसर्गाने दिलेले प्रचंड पाणी प्रदूषणाने निरुपयोगी ठरविण्याने मानवी अस्तित्वालाच नख लागेल. इथंपर्यंत चर्चा गेली आणि लोकांना ती पटलीदेखील. त्यामुळे गेल्या तीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर आज ती एक लोकचळवळ बनवून टाकली आहे.
दोन दिवसांपूर्वी संपलेल्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याने गणेशमूर्ती दानास तसेच निर्माल्य गोळा करण्यास दिलेला प्रतिसाद हा एक नवा आशावाद निर्माण करणारा प्रसंग आहे. यावर्षी घरगुती गणेश विसर्जन करताना कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी चार लाख ६४ हजार गणेशमूर्ती नदीत किंवा तलावात विसर्जित न करता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. शंभर टक्के निर्माल्य पाण्यात न टाकता बाहेर ठेवले. हे फार मोठे यश आहे. ही आता लोकचळवळ झाली आहे.
अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळाने हा मुद्दा मागील वर्षापेक्षा एक पाऊल पुढे टाकून यशस्वी केला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतील १४५८ गणपतींपैकी ६२५ मूर्ती फेरविसर्जनासाठी दान केल्या गेल्या. सुमारे १५० टन निर्माल्य पाण्याबाहेर ठेवून पर्यावरणपूरक विसर्जन केले. ग्रामीण भागातूनही पर्र्यावरणपूरक गणेश विसर्जनास चांगला प्रतिसाद मिळाला. १७५० पैकी १४५३ मूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित करण्यात आल्या. हे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
गेल्या वर्षापासून डीजे न वापरण्याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावर्षी त्याला पूर्ण यश मिळाले. पारंपरिक वाद्यांच्या निनादात यावर्षी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. डीजेच्या आवाजाने ध्वनिप्रदूषणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्याला उच्च न्यायालयाने निर्बंध आणले तसेच जिल्हा प्रशासनाने अटकाव केल्याने लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत गेला. हासुद्धा कोल्हापूरच्या लोकचळवळीचा विजय आहे. पाण्याचे प्रदूषण रोखण्याचे मोठे पाऊल आता लोकांनीच उचलले आहे. त्याचे संवर्धन व्हायला हवे.