मी दुर्गा : रुग्णसेवेचे समाधान : डॉ. शीतल वाडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 03:50 PM2020-10-17T15:50:06+5:302020-10-17T15:51:52+5:30
navrarti, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. सारे जग कोरोनाशी लढत असताना कोल्हापुरातील महिलांनीही या लढाईत बरोबरीने योगदान देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नवरात्रौत्सवात प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा महिलांचे कतृत्व मी दुर्गा या सदरातून मांडत आहोत.
इंदुमती गणेश
शारदीय नवरात्रौत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. सारे जग कोरोनाशी लढत असताना कोल्हापुरातील महिलांनीही या लढाईत बरोबरीने योगदान देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नवरात्रौत्सवात प्रातिनिधिक स्वरूपात कोरोना योद्धा महिलांचे कतृत्व मी दुर्गा या सदरातून मांडत आहोत.
कोरोनाच्या भीतीने एकीकडे खासगी डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस बंद केलेली असताना या मात्र केवळ कोरोना ड्यूटीसाठी आयसोलेशन या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. तहान-भूक हरपून संसर्गाने अत्यवस्थ झालेल्या, गोरगरीब रुग्णांची सेवा करून त्यांना बरे केले. हजारो लोक कोरोनाग्रस्त असताना, मी त्यांना सेवा दिली नाही तर माझ्या या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग तरी काय? या विचारातून गेले चार महिने डॉ. शीतल वाडेकर या कोरोना ड्यूटी बजावत आहेत.
डॉ. शीतल यांचे माहेर सोलापूरचे. त्यांचे शिक्षण बीएएमएसपर्यंत झाले आहे. पती बालरोगतज्ज्ञ असून त्यांचा रंकाळा स्टँड परिसरात त्यांचा दवाखाना आहे. दोन्ही मुलगे डॉक्टर आहेत. जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. उपचारांसाठी डॉक्टर मिळेनात; तेव्हा महापालिकेने वैद्यकीय अधिकारी पाहिजेत, ही जाहिरात काढली.
ती वाचून डॉ. शीतल यांनी आयसोलेशनमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला, जो कुटुंबीयांसह कोणालाच न पटणारा होता. सगळ्यांचा विरोध पत्करून त्यांनी जुलैमध्ये सेवा बजावायला सुरुवात केली. तो काळच इतका कठीण होता की मृत्युसंख्या वाढली. रुग्णालयात बेड फुल्ल आणि दारात शेकडो रुग्ण उपचारांसाठी ताटकळत बसलेले असायचे.
ओपीडी, आयपीडीच्या रुग्णांचीही जबाबदारी त्यांच्यावरच. बाहेर वाट बघत असलेल्या अनेक रुग्णांची ऑक्सिजनची पातळी ५०-६० वर गेलेली असायची. प्रवास करून आलेल्या लोकांची तपासणीदेखील येथेच व्हायची. गोरगरीब रुग्ण आस लावून बसायचे. त्यांना इथे उपचार होणार नाहीत; तुम्ही दुसरीकडे जा,म्हणून सांगणे, अनेकजणांचा डोळ्यांदेखत होत असलेला मृत्यू ही सगळ्यांत त्रासदायक गोष्ट होती, असं त्या म्हणतात.
सकाळी नऊ वाजता पीपीई किट घातले की दुपारी चार वाजेपर्यंत जेवण लांबच; पण पाण्याचा घोटही प्यायला मिळायचा नाही; त्यामुळे डिहायड्रेशन व्हायचे. रुग्णाची मानसिकता इतकी बिघडलेली असायची की त्यांचे कौन्सेलिंग करावे लागायचे. अनेक वेळा आमचाच रुग्ण आधी घ्या म्हणून दबाव टाकला जायचा, वादाचे प्रसंग घडायचे.
मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर लढावे लागायचे. घरी आल्यावर अंघोळ केल्यानंतर पोटात अन्नाचा घास जायचा. नंतर इतका थकवा यायचा की काहीही करायची मानसिकता नसायची; पण हे काम करताना आत्मिक समाधान मिळत होते. रोजचा दिवस नवी ऊर्जा घेऊन यायचा. आता रुग्ण कमी झाल्याने ताणही कमी झाला आहे.
मी रुजू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन महिने अधिक ताणतणाव आणि दबावाचे होते; पण गरीब रुग्ण बरा होऊन जाताना त्यांनी दिलेला आशीर्वाद मनाला समाधान देतो. यापुढे कोणताही कठीण काळ येऊ दे; मी रुग्णांना सेवा देत राहीन.
- डॉ. शीतल वाडेकर,
आयसोलेशन