सक्षम मी... भक्कम मी...! हितगुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:15 PM2019-01-02T23:15:49+5:302019-01-02T23:24:28+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे नुसते आजारी न पडणे असे नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थता असणे हे होय. स्त्रियांचे आयुष्यमान वाढलेले आहे. त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच त्या अनुषंगाने येणारे आजारही वाढलेले आहेत.
- डॉ. भारती अभ्यंकर
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे नुसते आजारी न पडणे असे नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थता असणे हे होय. स्त्रियांचे आयुष्यमान वाढलेले आहे. त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच त्या अनुषंगाने येणारे आजारही वाढलेले आहेत. स्त्रियांचे आरोग्य वेगवेगळ्या घटनांमुळे बदलू शकते. आपल्या देशात प्रामुख्याने स्त्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो व त्याचा परिणाम तिच्या शरीरावर होतो. दारिद्र्य, बेकारी, समाजातील स्त्रीचे असुरक्षित स्थान या बाबी तिच्या अनारोग्यास कारणीभूत ठरतात.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात ‘स्त्री’ महत्त्वाची भूमिका बजावत असते. कधी प्रेमळ कन्या, कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी कर्तव्यदक्ष पत्नी बनून ती आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ बनते. पर्यायाने ती समाजाचाही आधारस्तंभ असते. या सर्व भूमिका ती कोमलपणे आणि कुशलतेने निभावत असते. या स्त्रीमध्ये असणारे गुण किंवा तिची क्षमता याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. नुसतेच ‘वुमेन इम्पॉवरमेंट’ किंवा ‘महिला सबलीकरण’ म्हणून चालणार नाही. सबलीकरण हे नुसतेच आर्थिक नसावे; तर तिचे मानसिक, आत्मिक आणि शारीरिक सबलीकरण करणे निकडीचे आहे. समाजाचा ती आधारस्तंभ असली तरी हल्ली मात्र जन्मासाठीसुद्धा तिला लढावं लागतं, झगडावं लागतं; कारण समाजातील स्त्रीभू्रण हत्या! ‘अबला नहीं सबला है तू, नारी नहीं चिंगारी है तू...’ या वर्षी या लेखमालेतून स्त्रीचे शारीरिक सबलीकरण करण्याचा माझा मानस आहे. ‘लोकमत’सारख्या वृत्तपत्रामुळे मला तुमच्याशी संवाद साधता येणार आहे. त्यासाठी मी ‘लोकमत’ची खूप खूप आभारी आहे. तरुणींमध्ये आढळणारे मासिक पाळीसंदर्भातील वेगवेगळे घटक, लैंगिकतेबद्दलची चुकीची माहिती, आहार व विहारामधील काही तत्त्वे यामध्ये सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. लैंगिकतेबद्दल शिक्षण द्यावे किंवा नाही हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे. खरे तर तरुण पिढीला नातेसंबंधाबद्दल आणि लग्नानंतर ते कसे टिकवावेत याबद्दल प्रबोधन करणे गरजेचं आहे.
तरुणींना जर ‘रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ’बद्दल माहिती सांगितली, त्यामागची त्यांची भूमिका समजावली तर मला वाटते, त्या पिढीची भावनिकता खूप
बदलेल. त्यामुळे एक निरोगी, सुशिक्षित, सुसंस्कृत समाज घडायला मदत होईल, जी आपली सर्वांची इच्छा आहे !
गरोदरपणात व प्रसूतीदरम्यान अनेक अडथळे येऊन माता मृत्युदर वाढतो; परंतु सरकारने मातांसाठी चालू केलेल्या योजना व त्यांना आम्ही स्त्री
रोगतज्ज्ञांनी दिलेली साथ यांमुळे माता मृत्युदर घटविण्यात आपल्याला यश येत आहे. गरोदरपणामध्ये रक्तदाब वाढणे व त्यामुळे गर्भावर व मातेवर होणारे परिणाम आपण जाणून घेऊया. रक्तक्षय किंवा अॅनेमिया हा भारतीय स्त्रियांमध्ये खूप आढळतो. तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंत याचे दुष्परिणाम दिसतात. त्यासंबंधीसुद्धा सजग करण्याचा हा प्रयत्न आहे.
मातृत्व प्राप्त होणे म्हणजे काय, त्यामध्ये येणारे अडथळे म्हणजेच वंध्यत्वाबद्दल प्र्राथमिक माहिती देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे. गरोदरपणाचा काळ, त्यामध्ये घ्यावयाची काळजी, सुरक्षित प्रसूती, गरोदरपणामध्ये येऊ शकणारे अडथळे किंवा वेगवेगळ्या समस्या याबद्दलही थोडक्यात सांगायचा माझा मानस आहे. संतती नियमनासारख्या विषयावर स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न राहील. स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या तक्रारी, त्यांची लक्षणे, त्यांचे निदान आणि त्यावरील उपचारांबद्दलही या लेखमालेत सांगितले जाईल. आजकाल आढळणारा भयावह आजार म्हणजे कॅन्सर! स्त्रियांमध्ये आढळणारे कर्करोग म्हणजे स्तन, आतडी, गर्भपिशवीचे तोंड, गर्भाशय, बीजकोश याविषयीची माहिती, ते टाळण्यासाठी कराव्या लागणाºया तपासण्या, ते होऊ नयेत यासाठी घ्यावयाची काळजी यावरही प्रकाश टाकण्याचा माझा मानस असेल. थोडक्यात, स्त्रीभ्रूण हत्या टाळून महिलांना शारीरिकदृष्ट्या सबल करण्याचा प्रयत्न या लेखमालेतून मी करणार आहे.
(लेखिका कोल्हापुरातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ आहेत)