‘लोकमत’संगे जाणून घेऊ : अनेक आजारांवर गुणकारी; वृक्षाच्या सालीपासून दोराची निर्मिती भगव्या आकर्षक पुष्पांचा फुलोरा ‘कौसी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:37 AM2018-09-03T00:37:27+5:302018-09-03T00:38:17+5:30
कोल्हापूरची वृक्षसंपदा
-डॉ. मधुकर बाचूळकर
आपला देश जैवविविधतेत अत्यंत समृद्ध असून, महाजैवविविधता असलेल्या जगाच्या पाठीवरील सतरा देशांपैकी एक आहे. भारतात तब्बल ४८ हजार वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यापैकी १७,५०० सपुष्प म्हणजेच फुले देणाऱ्या वनस्पती आहेत.
भारतात आढळणाºया सपुष्प वनस्पतींपैकी सुमारे २३०० प्रजाती भारतात प्रदेशानिष्ठ आहेत. या प्रदेशानिष्ठ प्रजाती भारताशिवाय इतरत्र कोठेही आढळत नाहीत. भारतात इतकी वनस्पती विपुलता व विविधता असूनही या सर्व वनस्पती प्रजातींचा सर्वांगीण संशोधनात्मक अभ्यास भारतात समाधानकारक झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या स्थानिक वनस्पती सुंदर व आकर्षक असूनही त्याचा प्रसार बागांमध्ये फारसा झालेला नाही. आपण बागेत लागवड करणाºया बहुतांश वनस्पती विदेशी आहेत. आपल्या स्थानिक वनस्पती बागांमध्ये आणण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहेत.
अशाच एका सुंदर फुले देणाºया एका देशी वृक्षाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हा वृक्ष आपल्या जंगलात आढळतो. या वृक्षाला सुंदर आकर्षक फुले येतात; पण हा वृक्ष बागेत किंवा रस्त्याच्या कडेने लागवड केली जात नाही. हा मनमोहक वृक्ष बागांमध्ये यावा यासाठी काही विशेष प्रयत्नही झालेले नाहीत. अशा या सुंदर व देखण्या फुलांचा बहार देणाºया, पण दुर्लक्षित असणाºया वृक्षाचे मराठी स्थानिक नाव आहे ‘कौसी’. हा वृक्ष ‘भारकोई’ व ‘सुपली’ या स्थानिक नावानेही ओळखला जातो.
कौसी या वृक्षाचे शास्त्रीय नाव आहे ‘फिरमिअना कोलोरेटा’. या वृक्षाचे जातीविषयक ‘फिरमिअना’ हे नाव इटली देशाच्या उत्तरेकडील लोम्बारडी या प्रदेशाचे सुप्रसिद्ध गव्हर्नर ‘जोसेफ व्हॉन फिरमिअन’ यांच्या स्मरणार्थ ठेवले आहे. कौसी वृक्षाला रंगीत सुंदर फुले येतात. यामुळे या वृक्षाचे प्रजातीविषयक नाव ‘कोलोरेटा’ असे आहे. हा वृक्ष जंगली बदामाच्या कुळातील म्हणजेच ‘स्टरक्युलिएसी’ कुळातील आहे.
कौसीचे वृक्ष भारतात आसाम, पश्चिम बंगाल मेघालय, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ या राज्यांतील जंगलात आढळतात. कौसी वृक्षाला कोंकणी भाषेत ‘खोलथे’ म्हणतात, तर हिंदीत ‘सामारी’, ‘वालेना’, ‘बोड्युला’ या नावानी ओळखतात. आसामी भाषेत या वृक्षाला ‘जारी’, ‘उडाल’, ‘कात उडाल’ अशी नावे आहेत. भारताशिवाय कौसीचे वृक्ष म्यानमार, थायलंड, श्रीलंका, बांगला देश, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम या देशांतील जंगलातही आढळतात. या वृक्षाला इंग्रजीत ‘बोन फायर ट्री’, ‘बट्रेसड पॅरासोल ट्री’, ‘कलर्रड स्टरक्युलिया’, ‘इंडियन अॅनमोन्ड’ अशी विविध नावे आहेत.
कौसीचे पर्णझडी वृक्ष, पठारी मैदानी प्रदेशातील, तसेच डोंगरी भागातील उष्ण-दमट हवामानातील पानगळी जंगलात आढळतात. महाराष्टÑात कौसीचे वृक्ष मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील जंगलात आढळतात. कौसीचे पर्णझडी, मध्यम उंचीचे वृक्ष ८ ते १० मीटर उंचीपर्यंत वाढतात. खोड गोलाकार, सरळ वाढणारे, फांद्या अनेक, पसरणाºया. साल जाड खवल्यांची, राखाडी रंगाची. पाने एका आड एक, साधी हस्ताकृती, तीन ते पाच खंडात अस्पष्टपणे विभागलेली, १० ते १२ सें.मी. लांब, ०८ ते ३० सें.मी. रुंद, पर्णखंडाची टोके निमुळती, पानांचा तळ हृदयाकृती, पानांचा देठ लांब, ४ ते ६ सें.मी. लांब, कोवळी पाने व कोवळ्या फांद्या लवयुक्त. लव भुरी रंगाची जानेवारीपासून पानगळ सुरू होते.
वृक्ष संपूर्णपणे निष्पर्ण झाल्यानंतर फुलांचा बहार सुरू होतो. फांद्यांच्या टोकांवर फुले तुºयांनी येतात. फुलांचे तुरे पाच ते सात सें.मी. लांब असतात व त्यामध्ये अनेक फुले दाटीवाटीने गच्च भरलेली असतात. फुले द्विलिंगी, नियमित, नारिंगी-लालसर किंवा भगव्या-लालसर व आकर्षक. फुलांच्या भगव्या लालसर रंगामुळे कौसीचा वृक्ष निष्पर्ण अवस्थेत अत्यंत उठावदार व आकर्षक दिसतो व अगदी दूरवरूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतो. फुलांचा बहार फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत असतो. फुले सुमारे तीन सें.मी. लांब. या फुलांना पाकळ्या नसतात. निदलपुंज पाच संयुक्त दलांनी बनलेला असतो व त्याचा अरुंद नरसाळ्यासारखा, अरुंद पेला तयार होतो. फुलांचा आखूड देठ व निदलपुंजावर भगवी मखमली लव असते. यामुळे फुले पोवळ्यांसारखी, व्हॅलवेटच्या कागदांनी तयार केल्यासारखी अगदी कृत्रिम वाटतात. पुंकेसर २० ते ३० ते एकमेकांस चिकटल्यामुळे त्यांचा भरीव दंडक तयार होतो. पुंकेसर दंडक निदलपुंज पेल्यापेक्षाही लांब असल्याने तो फुलातून बाहेर डोकावतो. बिजांडकोष पाच कप्पी, पुंकेसर दंडकाच्या टोकावर असतो. बिजांडकोश गोलाकार व लोमश, परागवाहिनी आखूड व गोलसर. फळे पातळ पापुद्रासारखी, पाच भागात तडकून फुटणारी. प्रत्येक पसरट कांडाच्या काठावर एक ते दोन बिया असतात. फळे वेगळीच असतात. पानांसारखी दिसतात. किंबहुना कृत्रिम कागदी वाटतात. फळांचा रंगही लालसर असतो. कौसीचा निष्पर्ण वृक्ष फळांनी पूर्णपणे जेव्हा लगडलेला असतो तेव्हांही तो देखणा, मनमोहक व आकर्षक दिसतो. कौसीच्या बिया खाण्यायोग्य असतात. त्यांना बदामासारखी चव असते.
कौसीचा वृक्ष फुलोºयावर असताना विविध प्रकारचे पक्षी या वृक्षाकडे आकर्षित होतात. कौसीची फळे खाण्यासाठीही अनेक पक्षी या वृक्षावर जमा होतात. या वृक्षाची साल व मुळे यांचा रस मेंढीच्या दुधात मिसळून कावीळ झालेल्या रुग्णास देतात. साल व मुळे त्वचाविकारावर व कॉलºयात वापरतात. या वृक्षाचा डिंक पोटदुखीत देतात. मध्य प्रदेशातील भिल्ल समाजातील आदिवासी, कौसीच्या बियांचे चूर्ण, गव्हाच्या पिठात मिसळून त्याचे लाडू बनवितात व लहान मुलांना व आजारी माणसांना रोज एक लाडू शक्तिवर्धक औषध म्हणून खाण्यासाठी देतात. कौसीच्या पानांचा उपयोग मासे मारण्यासाठी करतात. या वृक्षाच्या सालीपासून चिवट धागे मिळतात. त्यापासून दोर बनवितात. कोल्हापूर जिल्ह्यात कौसीचे वृक्ष राधानगरी, दाजीपूर, साळवण, गगनबावडा, पन्हाळा येथील जंगलात नैसर्गिकपणे वाढलेले आढळतात. कोल्हापूर शहराजवळील कात्यायनी परिसरातही कौसीचे काही वृक्ष आहेत. बियांपासून रोपे तयार करता येतात. यासाठी वनविभाग, कृषी विभाग व वनस्पती तज्ज्ञांनी प्र्रयत्न करून कौसीचे शोभिवंत वृक्ष बागेत व रस्त्यांच्या कडेने लावावेत.
शास्त्रीय नाव
Firmiana Colorata
फिरमिअना कोलोरेटा
कूळ :
Sterculiaceae
स्टरक्युलिएसी
कौसीची फुले द्विलिंगी, नियमित, भगवी-लालसर रंगाची व आकर्षक असतात. तर फळे पातळ पापुद्रासारखी पाच भागात फुटणारी असतात. तसेच ती पानांसारखी दिसतात. फळांचा रंग लालसर असतो.