Navratri 2020 : मी दुर्गा -डॉ. उल्का चरापले- शिक्षणाचं सार्थक झालं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:25 PM2020-10-23T18:25:12+5:302020-10-23T18:30:44+5:30
Coronavirus, navratri2020, mi durga, kolhapur, kagal कोरोना झालेला रुग्ण आधीच घाबरलेला असतो. अनेक ताणतणावांतून तो आलेला असतो. उल्का यांनी या रुग्णांना पहिल्यापासूनच धीर देण्याची भूमिका घेतली. झालेला आजार, सुरू असलेली औषधे, आहार यांबाबत त्या ज्या आपुलकीने, समजुतीच्या भाषेत बोलत, की रुग्ण सकारात्मक होई आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देई. आपली इथं कोणीतरी काळजी घेणारं आहे, अशी त्याची भावना होई.
समीर देशपांडे
डॉ. उल्का चरापले. शिवाजी विद्यापीठातील माहिती तंत्रज्ञान विभागातील अभियंता असलेले, साने गुरुजी वसाहतीतील रहिवासी नामदेव चरापले यांच्या कन्या. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉ. उल्का या राधानगरी तालुक्यातील धामोड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या. वर्षभरातच त्यांची बदली कागल येथील जिल्हा परिषदेच्या दवाखान्याकडे झाली. जुलै २०२० मध्ये त्या कागलमध्ये आल्या आणि १५ दिवसांतच कागल येथे उभारलेल्या कोविड केअर सेंटरवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
वास्तविक रुग्णसेवेचा फार मोठा अनुभव नाही. सुरुवातीला कोरोनाबाबत फारशी माहिती नाही; परंतु वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, स्वत: माहिती घेऊन, दिलेल्या सूचनांप्रमाणे उपचार करायचे. कोरोना झालेला रुग्ण आधीच घाबरलेला असतो. अनेक ताणतणावांतून तो आलेला असतो. उल्का यांनी या रुग्णांना पहिल्यापासूनच धीर देण्याची भूमिका घेतली. झालेला आजार, सुरू असलेली औषधे, आहार यांबाबत त्या ज्या आपुलकीने, समजुतीच्या भाषेत बोलत, की रुग्ण सकारात्मक होई आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देई. आपली इथं कोणीतरी काळजी घेणारं आहे, अशी त्याची भावना होई.
सकाळी सात वाजता कोल्हापूरहून दुचाकीवरून निघून दिवसभर कागलमध्ये सेवा द्यायची. पुन्हा संध्याकाळी सातनंतर कोल्हापूर असा त्यांचा दिनक्रम आजही सुरू आहे. याच काळात किरकोळ आजारी असल्याने डॉ. उल्का तीन दिवस कामावर जाऊ शकल्या नाहीत, तर रुग्णांनी त्यांना फोन केले. लवकर कागलच्या दवाखान्यात या, असा आग्रह धरला. त्यांच्या या सकारात्मक वृत्तीमुळे अनेकजण कोरोनामुक्त होऊन गेले तरी त्यांना भेटायला येतात.
त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. शासकीय सेवा म्हणजे ह्यकाम आवरण्याह्णकडे अनेकांचा कल असतो; परंतु डॉ. उल्का यांनी ही रुग्णसेवा मनापासून केली. त्यामुळे केवळ कागलच नव्हे तर चंदगड, गडहिंग्लज, करवीर तालुक्यांतूनही रुग्ण कागलमध्ये उपचारासाठी जात होते. डॉ. उल्का या रुग्णसेवेच्या समाधानाच्या मानकरी ठरल्या आहेत.
माझ्या आईवडिलांनी मला जे शिक्षण दिलं, त्याचा सर्वसामान्यांसाठी उपयोग होताना पाहून मला सार्थक वाटलं. सिद्धनेर्लीचे कोरोना रुग्ण रोहिदास माने हे कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा सेंटरवर आले. चांदीची गणेशमूर्ती देऊन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. चांगुलपणाला दिलेलं हे प्रशस्तीपत्र आहे, असं मी मानते. या सगळ्यांमध्ये माझे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांची मला मोठी मदत झाली.
- डॉ. उल्का चरापले
वैद्यकीय अधिकारी, कागल कोविड केअर सेंटर