Navratri 2020 : मी दुर्गा -नंदा पोतनीस यांच्या जनजागृतीमुळेच कोरोना रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 11:00 AM2020-10-22T11:00:46+5:302020-10-22T11:04:47+5:30
Navratri2020, sarpanch, ajra, kolhapurnews, mi durga मुंबई, पुणेसह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना सुरूवातीपासून शेतातील घरातच क्वारंटाईन केले. लाईट नसलेल्या ठिकाणी सोलर जोडून दिले. गावातील कोणालाही गावाबाहेर सोडले नाही. व बाहेरून गावात कोणाला घेतले नाही. महिलांना एकत्रित करून कोरोनाची जनजागृती केली. लोकांना विश्वास दिला त्यामुळेच ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सातेवाडी-देऊळवाडी (ता. आजरा) गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
सदाशिव मोरे
आजरा :मुंबई, पुणेसह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना सुरूवातीपासून शेतातील घरातच क्वारंटाईन केले. लाईट नसलेल्या ठिकाणी सोलर जोडून दिले. गावातील कोणालाही गावाबाहेर सोडले नाही. व बाहेरून गावात कोणाला घेतले नाही. महिलांना एकत्रित करून कोरोनाची जनजागृती केली. लोकांना विश्वास दिला त्यामुळेच ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या सातेवाडी-देऊळवाडी (ता. आजरा) गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
नंदा शंकर पोतनीस सातेवाडी-देऊळवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच. पोलिस पाटील महिला, उपसरपंच महिला, दूध संस्था महिलांची त्यामुळे गावावर महिलाराज. नंदा पोतनीस या गृहिणी असल्या तरी दोन म्हैशी, पाच हजार पक्षांचे कुक्कुटपालन चालवून गावागाडाही उत्तम पद्धतीने चालवित आहेत.
तालुक्याच्या दिशेने कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होवू द्यायला नाही. याचा निर्णय सर्व महिलांना संघटीत करून घेतला. कोरोनाबाबत जनजागृती केली.
मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, काम असेल तरच घराबाहेर जाणे, घरगुती साहित्याची गरज भासल्यास दक्षता समितीला माहिती देणे, महिलांना एकत्रित करून लोकसहभागातून गावात स्वच्छता मोहिम राबविणे, औषध फवारणी करणे, डासांपासून आजाराचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरडा दिवस पाळणे, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून १० दिवसातून एकवेळा कुटुंबाचा सर्व्हे करणे, सर्दी, ताप, थंडी असलेल्या ग्रामस्थांना आरोग्य सेवकांच्या माध्यमातून तातडीने औषधोपचार केले. त्यामुळे गेल्या आठ महिन्यात कोरोनासह गंभीर आजाराचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही.
राजकीय पार्श्वभूमी कोणतीही नाही. चुलत दीर राजाराम पोतनीस यांचे मार्गदर्शन घेवून काम सुरू आहे. कोरोना कालावधीत आलेल्या चाकरमान्यांना होम क्वारंटाईन न करता शेतातील घरामध्ये ठेवले. त्याच ठिकाणी त्यांना लाईट, सोलरची व्यवस्था केली.
दररोज जावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्यामुळेच कोरोनाला गावात प्रवेश करू दिला नाही. सातेवाडी गावाला अॅक्वाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे सर्दी, ताप, जुलाब याचा एकही रूग्ण नाही. १०० टक्के करवसुली करणारी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे.
कोरोनाची गावात जनजागृती, कुटुंबांची सर्व्हे व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले. त्यामुळे माझ्या कुटुंबाबरोबर गावातील सर्व कुटुंबांना कोरोनापासून वाचवू शकलो याचा आनंद आहे.
- नंदा शंकर पोतनीस,
ग्रुप ग्रामपंचायत, सातेवाडी-देऊळवाडी