Navratri 2020 : मी- दुर्गा : मुस्तफा यादवाड , रुग्णसेवेने दिली नवी ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 10:18 AM2020-10-24T10:18:39+5:302020-10-24T10:21:55+5:30
coronavirus, mi durga, navratri2020, kolhapurnews, hospital कोरोना रुग्णापासून कुटुंबीयच चार हात लांब राहत असल्याच्या काळात हिना मुस्तफा यादवाड या परिचारिकेने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आपले कुटुंब स्वत:पासून लांब ठेवले. आपल्या लहान मुलांना आईकडे सोपवून स्वत:ला त्यांनी रात्रंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेला वाहून घेतले. रुग्ण वृद्ध असो की, लहानगे बाळ; प्रत्येकाची त्यांनी आपुलकीने सेवा केली. कोरोनामुक्त झालेल्यांसह अन्य रुग्णांसाठी हिना या खऱ्या अर्थाने जणू दुर्गा बनून आल्या आणि त्यांनी जीव वाचविले.
संतोष मिठारी
कोरोना रुग्णापासून कुटुंबीयच चार हात लांब राहत असल्याच्या काळात हिना मुस्तफा यादवाड या परिचारिकेने कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी आपले कुटुंब स्वत:पासून लांब ठेवले. आपल्या लहान मुलांना आईकडे सोपवून स्वत:ला त्यांनी रात्रंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेला वाहून घेतले. रुग्ण वृद्ध असो की, लहानगे बाळ; प्रत्येकाची त्यांनी आपुलकीने सेवा केली. कोरोनामुक्त झालेल्यांसह अन्य रुग्णांसाठी हिना या खऱ्या अर्थाने जणू दुर्गा बनून आल्या आणि त्यांनी जीव वाचविले.
मध्यमवर्गीय कुटुंबातील हिना यांनी कोल्हापुरातील कोविड केअर सेंटरमध्ये दोन महिने राहून रुग्णसेवा केली. त्यांचे माहेर कोल्हापुरातील माळी कॉलनी, तर सासर कर्नाटकातील घटप्रभा आहे. त्यांचे पती मुस्तफा हे सेंट्रिंग काम करतात. त्या सध्या गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे राहतात. बी. ए.ची पदवी घेतल्यानंतर हिना यांनी पुढे पॅरामेडिकलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्या परिचारिका म्हणून काम करू लागल्या.
समाजसेवा करण्याची त्यांच्या मनात इच्छा होती. ही सेवा करण्याची संधी त्यांना व्हाईट आर्मीच्या माध्यमातून उपलब्ध झाली. मिळालेल्या संधीनुसार त्यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपण या सेंटरमध्ये काम करून एक प्रकारे आपल्या अरमान आणि माजिद या दोन मुलांचा जीव धोक्यात घालत असल्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यावर पती मुस्तफा यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्यासाठी हिना यांना पाठबळ दिले. त्यावर हिना यांनी माळी कॉलनी येथील राहणाऱ्या आपल्या आईकडे दोन्ही मुलांना ठेवले.
हिना आणि त्यांचे पती गोकुळ शिरगाव येथे राहू लागले. मुले सुरक्षित राहिल्याने त्यांनी कोल्हापुरातील दसरा चौकामधील जैन बोर्डिंगमध्ये व्हाईट आर्मीने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये ३ ऑगस्टपासून काम सुरू केले. रुग्णांची संख्या अधिक होती. रात्रीच्या वेळी काही रुग्णांमधील ऑक्सिजनची लेव्हल कमी व्हायची, ताप वाढायचा; अशा वेळी त्या ठिकाणी त्यांना थांबणे आवश्यक असायचे. त्यावर पती मुस्तफा यांच्या संमतीने त्या कोविड सेंटरमध्येच राहून रुग्णसेवा करू लागल्या.
या कामामुळे त्यांना दोन महिने मुलांना भेटता आले नाही. १०३ वर्षांच्या आजींचे कोरोनामुक्त होणे; आईसमवेत असलेल्या एका दिवसाच्या बाळाची १३ दिवस सेवा करणे; कोरोना पॉझिटिव्ह असणारे चार महिन्यांचे बाळ ठणठणीत बरे करून घरी पाठविणे, या रुग्णसेवेत त्यांनी योगदान दिले. व्हाईट आर्मीच्या जवानांच्या मदतीने त्यांनी ३०० रुग्णांची सेवा केली.
खासगी रुग्णालयातील एक परिचारिका अशी माझी ओळख होती. मात्र, या कोविडच्या कालावधीत रुग्णसेवेचे काम करू लागल्याने सामाजिकदृष्ट्या एक वेगळी ओळख मला मिळाली. नवी सामाजिक नाती निर्माण झाली. कुटुंबीयांचे पाठबळ, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता आले. या कोविड विरोधातील लढाईत रुग्णसेवेच्या माध्यमातून योगदान दिल्याचे समाधान आहे.
- हिना य़ादवाड,
परिचारिका, व्हाईट आर्मी