Navratri : मी दुर्गा - जिवाची पर्वा न करता कामाशी प्रामाणिक : सुशीला कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:34 AM2020-10-21T11:34:26+5:302020-10-21T11:38:01+5:30
Navratri, muncipaltycarporation, coronavirus, kolhapurnews कोरोना संकटात लॉकडाऊनमध्ये कोणीही घरातून बाहेर पडत नव्हते. अशा काळात महापालिकेतील सफाई कामगार सुशीला कांबळे यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या कामाशी प्रामाणिक राहत सफाईचे काम सुरूच ठेवले. विशेष म्हणजे त्या रोजंदारीवरील कर्मचारी असून कायम कर्मचाऱ्यांना लाजवेल असे त्यांनी काम करून दाखविले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा अभिमान वाटत आहे. यामुळे सुशीला या खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विनोद सावंत
कोरोना संकटात लॉकडाऊनमध्ये कोणीही घरातून बाहेर पडत नव्हते. अशा काळात महापालिकेतील सफाई कामगार सुशीला कांबळे यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या कामाशी प्रामाणिक राहत सफाईचे काम सुरूच ठेवले. विशेष म्हणजे त्या रोजंदारीवरील कर्मचारी असून कायम कर्मचाऱ्यांना लाजवेल असे त्यांनी काम करून दाखविले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा अभिमान वाटत आहे. यामुळे सुशीला या खऱ्या अर्थाने दुर्गा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सुशीला कांबळे यांचे माहेर अप्पाचीवाडी येथील भाटनांगनूर आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी महापालिकेत रोजंदारीवर कामाला सुरुवात केली. तब्बल चौदा वर्षे रस्ते डांबरीकरण करण्याचे काम केले. त्यानंतर गेले बारा वर्ष त्या झाडू कामगार आहेत. पती ट्रॅक्टरचालक होते. त्यांचे २०१३ मध्ये निधन झाल्यानंतर दोन मुली, मुलगा, सून आणि नातवंड यांची सर्व जबाबदारी सुशीला यांच्यावर आली.
वयाच्या ५५व्या वर्षी तरुणांना लाजवेल असे त्यांचे काम आहे. सुशीला रोजंदारीवर असल्यामुळे ज्या दिवशी काम करील त्याच दिवसांचा पगार मिळत असल्याने त्यांनी सुट्टी कधी घेतली नाही. काम करीत असतानाच पडल्यामुळे पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. तरी सुट्टी घेतली नाही. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी सफाईचे काम सुरूच ठेवले.
कोरोनामध्ये त्यांनी मंगळवार पेठेतील नंगीवली चौक ते शाहू बँक परिसराची नियमित स्वच्छता केली. रस्त्यावर कोणीही नसताना सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत त्यांनी परिसर स्वच्छ केला. काम पूर्ण झाल्याशिवाय घरी जायचे नाही, असाच त्यांचा ठाम निर्धार होता. महापालिकेकडून मास्क, हॅन्डग्लोव्हज, रेनकोट दिले होते. त्यांचा मुलगा आणि सून हे घातल्याशिवाय त्यांना कामावर सोडत नव्हते. त्यांनीही स्वतःसोबत कुटुंबाची काळजी घेत कामावर आल्यानंतर अंघोळ करूनच त्या घरात जात होत्या.
स्वच्छता मोहिमेत दर रविवारी त्या सहभागी होतात. त्यांचा एकदाही मोहिमेत खंड पडला नाही. यावरून त्यांचा कामाविषयी असलेला प्रामाणिकपणा दिसून येतो. कामाच्या ठिकाणी कोरोना योद्धा म्हणून शाल आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावर त्या भारावून गेल्या. त्यांनी आणखी जोमाने काम सुरू ठेवले आहे. मुलगा कारखान्यात कामाला लागला असून त्यांना त्याचा हातभार लागत आहे.
गेली २६ वर्षे रोजंदारीवर काम करीत आहे. कोरोनामध्ये भीती न बाळगता जनसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून प्रामाणिकपणे काम केले. कामाची पोचपावती म्हणून निवृत्तीपूर्वी कायम होईन, अशी अपेक्षा आहे. निवृत्तीनंतर मुलग्याला कामाची संधी मिळावी आणि त्यानेही माझ्याप्रमाणे जनतेची सेवा करावी, अशी इच्छा आहे.
- सुशीला कांबळे,
झाडू कामगार, महापालिका
संपर्क क्रमांक : ९७६६२२९३०८