Navratri : मी दुर्गा : ज्येष्ठांचा आधार बनल्या संजीवनी भोपळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 07:20 PM2020-10-26T19:20:17+5:302020-10-26T19:22:41+5:30
coronavirus, navratri, mi durga, kolhapurnews, postdepartment कोरोनाकाळात भीतीमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते तेव्हा टपाल कार्यालये सुरू होती. लोकांपर्यत त्यांचे टपाल पोहोचवणे आणि वैद्यकीय तसेच त्यांच्या हक्काचे बँकेतील पैसे पोहोचविण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या शनिवार पेठ पोस्ट ऑफिसमधील पोस्टवूमन संजीवनी भोपळे खऱ्या अर्थाने दुर्गा ठरतात.
संदीप आडनाईक
.कोरोनाकाळात भीतीमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते तेव्हा टपाल कार्यालये सुरू होती. लोकांपर्यत त्यांचे टपाल पोहोचवणे आणि वैद्यकीय तसेच त्यांच्या हक्काचे बँकेतील पैसे पोहोचविण्याचे कर्तव्य पार पाडणाऱ्या शनिवार पेठ पोस्ट ऑफिसमधील पोस्टवूमन संजीवनी भोपळे खऱ्या अर्थाने दुर्गा ठरतात.
१९९३ मध्ये शनिवार पेठेतील पोस्टात रूजू झालेल्या ५२ वर्षीय संजीवनी भोपळे या शहरातील पहिल्या महिला पोस्टमन. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या संजीवनी यांचे पती शिवानंद भोपळे यांचे १९९० मध्ये निधन झाले. त्यांच्या जागी १९९३ मध्ये अनुकंपा तत्वावर संजिवनी यांना पोस्टमनचे काम मिळाले. त्यांचा मुलगा आज एमटेक इंजिनिअर असून त्याच क्षेत्रात त्याने पीएच.डी. केली आहे तर मुलगीही एम.कॉम. असून विवाहित आहे.
बेळगाव माहेर असलेल्या संजीवनी यांची २७ वर्षे टपाल कार्यालयात कार्यरत आहेत. कोरोनाकाळात विषाणूची भीती असतानाही त्या टपाल वाटण्यासाठी बाहेर पडत होत्या. सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये काही दिवसच घरात असलेल्या संजीवनीताईंनी आजअखेर एकदाही सुटी घेतलेली नाही. एएफपीएस प्रणालीद्वारे ग्राहकांना घरबसल्या बँकेचे आर्थिक व्यवहार होत होते. घराबाहेर पडू न शकणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्यांचे हक्काचे बँकेतील पैसे पोस्टमनच्या माध्यमातून देण्याचे कर्तव्य संजीवनीताईंनी पार पाडले.
संजीवनीताईंकडे उमा टॉकीजपासून उत्तरेश्वर पेठेपर्यंत भाग पोस्टमन म्हणून आहे. या कोरोनाच्या काळात बससेवा, रिक्षा बंद असताना दोन वृध्दांना बँकेतील पैसे त्यांनी घरपोच दिले. याशिवाय अनेकांना औषधे, इतर साहित्यही पोहोचविण्यात संजीवनीताईंनी मागे पाहिले नाही.
कोल्हापुरातील एका वृद्ध ग्राहकाला अत्यावश्यक असणारी औषधे चेन्नईहून विमानाने आणि पुढे पुण्यातून कोल्हापुरात टपाल खात्याच्या गाडीतून वेळेत पोहोचविली, हे मोठे सत्कार्य आपल्या हातून झाल्याचे संजीवनीताई सांगतात.
मास्क, सॅनिटायजर, हँडग्लोज, शारीरिक अंतर ठेवून टपाल खात्याची सेवा बजावली. रक्षाबंधनच्या काळातही बहीण-भावांतील नात्यांतील गोडवा कायम ठेवण्यात पोस्ट खात्याचा मोठा हातभार आहे. खात्याने थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिले. शिवाय दहा लाखापर्यंतचे सानुग्रह अनुदानाची सुरक्षितता दिली. ग्राहक आणि सहकारी कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेतली. याबद्दल टपाल खात्याची, अधिकाऱ्यांची, सहकाऱ्यांची आणि ग्राहकाचाही अभिमान आहे..
- संजीवनी शिवानंद भोपळे,
महिला पोस्टमन, कोल्हापूर शहर.