खरं काय? बरं काय?-- भिरभिरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:11 AM2018-09-01T01:11:10+5:302018-09-01T01:11:41+5:30

श्याम मनोहर खरं लिहितात, बरंही लिहितात; पण कधी-कधी त्यात तिरकसपणा इतका असतो की, मेंदूला झिणझिण्या येतात. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने नुकतीच त्यांची ‘प्रेम आणि खूप-खूप नंतर’ नावाची एक कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरी

Whats up Well, what? | खरं काय? बरं काय?-- भिरभिरं

खरं काय? बरं काय?-- भिरभिरं

googlenewsNext

उदय कुलकर्णी
श्याम मनोहर खरं लिहितात, बरंही लिहितात; पण कधी-कधी त्यात तिरकसपणा इतका असतो की, मेंदूला झिणझिण्या येतात. ‘पॉप्युलर प्रकाशन’ने नुकतीच त्यांची ‘प्रेम आणि खूप-खूप नंतर’ नावाची एक कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरी कल्पित असते हे खरं; पण त्या कादंबरीत पान क्रमांक २५२ वर जनतेसाठी व सरकारसाठी निवेदन म्हणून जे काही मुद्दे लिहिले आहेत त्यानं कुणी भडकलं तर? आजचा समाज हा ज्ञानसमाज बनण्यापासून दूर-दूर जातो आहे, हे वाचकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करताना त्यांनी लिहिलेले काही मुद्दे असे-तांत्रिक कौशल्ये शिकायची, त्यातील कामे करायची, पैसे मिळवायचे आणि उरलेल्या वेळात करमणुकीच्या मागे लागायचे ही नागरिकांची जीवनशैली झाली आहे. धर्म करमणुकीच्या पातळीवरच गेला आहे. खेळ हा करमणुकीचा मोठा उद्योगधंदा झाला आहे. टुरिझमच्या नावाखाली होणारा प्रवास हा केवळ एंजॉयमेंटसाठी केला जातो. माणसाचे सृष्टी रहस्याचे कुतूहल मेले आहे. करमणूक होत नाही, अशी स्थिती आली तर उद्या नागरिक व्हॉयोलंटही होतील. पन्नास टक्के माणसे केवळ पैसा कमविणे आणि श्रीमंतांच्या यादीत आपले नाव आणणे हेच जीवनाचे सार्थक समजत आहेत. विद्यापीठातून मानव्यशाखा जवळजवळ बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी आहेत त्या जवळपास शो म्हणून आहेत आणि तिथले विद्यार्थी, शिक्षक फ्रस्ट्रेटेड आहेत. सर्व चांगले लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ नोकऱ्या करून निर्मिती करत आहेत. एकही लेखक, कवी, कलावंत, तत्त्वज्ञ पूर्णवेळ निर्मिती करून जगू शकेल, अशी स्थिती पंतप्रधान देशात निर्माण करू शकले नाहीत, हे पंतप्रधानांचे फेल्युअर आहे. करमणूक करणारे कलावंतच फक्त पूर्णवेळ कलावंत आहेत. सर्व शास्त्रज्ञांना तंत्रज्ञ बनविले गेले आहे. किंबहुना तंत्रज्ञानाचा शास्त्रज्ञ म्हणण्याची पद्धत पडली आहे. हे सगळे धोकादायक आहे.
कल्पित म्हणून का होईना, असं लोकांना विचार करायला लावणारं काही लिहिणं म्हणजे प्रस्थापित सत्तेशी एकप्रकारचा द्रोह असतो. हे श्याम मनोहर यांना कोण सांगणार?
खरंतर माझ्यासारखा माणूस काहीच करीत नाही. कशावरही फार प्रतिक्रिया देण्याच्या फंद्यात पडत नाही. देशाच्या राज्यघटनेने सांगितलेल्या मूलभूत तत्त्वांशी प्रामाणिक राहून शांततापूर्ण जगण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तरीही मला वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर भीती वाटत राहते की, कधीही कोणी माझा दरवाजा ठोठावेल. माझ्यावर प्रश्नांच्या फैरी झाडेल आणि मला कसलातरी द्रोही ठरवून रिकामा होईल. कधी-कधी या भीतीतून माझाच माझ्याशी प्रश्नोत्तर रूपानं संवाद सुरू होतो.
‘तुला लोक पर्यावरणवादी म्हणतात ना’? ‘हो’! ‘तू त्याला विरोध करीत नाहीस?’ ‘नाही. कारण मला पर्यावरणाविषयी आणि त्याचं संतूलन बिघडलं तर मानवी जीवनावर व जीवसृष्टीवर होणाºया परिणामांविषयी खरंच आस्था आहे!’
‘असं असेल तर तू घटनाद्रोही आहेस. समता हे घटनेच्या मूलतत्त्वांपैकी एक आहे आणि निसर्गात समतेला स्थान नाही!’ ‘तू घटनेशी बांधिल आहेस असं म्हणतोस म्हणजे सामाजिक न्याय ही संकल्पना तुला मान्य आहे?’ ‘हो’!
‘मग, तू फारच धोकादायक माणूस आहेस. प्रस्थापितांच्या सत्तेला सामाजिक न्यायासाठी तू कधीही आव्हान देशील. असं करणं म्हणजे राजद्रोह ठरेल याची तुला जाणीव आहे का?’ ‘घटनेच्या गप्पा मारतोस म्हणजे धर्मनिरपेक्षतेचं तत्त्वही तुला मान्य असणार?’ ‘हो’!
‘तुमची धर्मनिरपेक्षता म्हणजे एकतर तुम्ही सगळ्या धर्मांना एकाच तागडीनं तोलणार. रस्त्यावर कसलेही उत्सव करू नका म्हणणार. अनेकांच्या कमाईवर आणि रोजगारावर गदा आणणार. रस्त्यावरचे उत्सवच बंद केले, तर गल्लीतल्या दादा आणि नगरसेवकांपासून ते पुढे मंत्री होऊ इच्छिणाºयांपर्यंत सर्वांनी कार्यकर्त्यांचं मोहोळ सांभाळायचं कसं? सगळ्यांना नोकºया किंवा रोजगार देण्याची कुवत कोणत्याच सरकारमध्ये असू शकत नाही. अशा स्थितीत तरुणाईला परिस्थितीबाबत योग्य जाण येऊ दिली तर नेत्यांच्या मागं ‘जय म्हणायला कोण जाणार? त्यापेक्षा तरुणाईला धार्मिक सण, उत्सव यात गुंतवून ठेवलं तर देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम राहायला मदत होते. सांगण्याचा मुद्दा असा की, धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व सांगून तुम्ही नको ते मुद्दे उपस्थित करणार असाल तर समाजाच्यादृष्टीने तुम्ही धर्मद्रोही असालच; पण कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारे म्हणून तुम्हाला नजरकैदेतही ठेवावे लागेल!’
‘मी कसला धर्मद्रोही आणि प्रस्थापितांना आव्हान देणारा?’ मी काही हिंसक कारवाई करण्याची अजिबात शक्यता नाही कारण मी गांधींचा विचार मानणारा आहे!’
‘हिंसक कारवाईत सहभागी न होणारा गांधीवादी? छे छे! ग्रामीण भागातल्या नक्षलवाद्यांपेक्षा कशावरच लगेच अविचारी प्रतिक्रिया न देणारे शहरी आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणचे गांधीवादी म्हणजे फारच भयंकर. कोणीही बंदूक घेऊन अंगावर आलं तर त्यांच्याशी लढता तरी येतं. गप्प राहणाºया पण विचार करणाºयांबरोबर लढायचं कसं? छे छे! तुमच्यासारख्या गांधीवाद्यांचा अग्रक्रमानं बंदोबस्त केला पाहिजे!’
स्वत:शीच प्रश्नोत्तरं करत मी गांधीवादीही राहता येणार नाही. असं कसं जगता येईल, यावर गांभीर्यानं विचार करतो आहे.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत) kollokmatpratisad@gmail.com

 

Web Title: Whats up Well, what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.