Dil-e-Naadan: लव्ह... लग्न... अन् आयुष्य बदलून टाकणारा 'धक्का'!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 03:15 PM2018-04-24T15:15:35+5:302018-04-24T15:54:07+5:30
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)
- कौस्तुभ केळकर नगरवाला.
लग्न ठरलं तेव्हाची गोष्ट.
तो बघायला आला त्याच्या गाडीतून.
रीतसर चहापोह्यांचा कार्यक्रम झाला.
दोघांचे आईबाप वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखे गप्पा कुटायला लागलेले.
त्याची अत्यवस्थ चुळबुळ.
एकदम आठवल्यासारखं त्याचे बाबा म्हणाले.
"तिची हरकत नसेल, तर तुम्ही चक्कर मारून या.
जरा मोकळ्या गप्पा होतील."
तो खूष.
तिची हरकत नव्हतीच.
आजा मेरी गाडी में बैठ जा.
बसली.
पहिल्यांदाच.
तसा दोघांचा क्लास एकच.
प्युअर मिडलक्लास.
तिचा भाऊ अजून शिकत होता.
तिच्या घरी गाडी यायला अजून अवकाश.
याची गाडी नवीकोरी.
ताज्या लाल टोमॅटोसारखी.
तुकतुकीत.
आवडणेबल.
त्याच्या घराण्यातली पहिली गाडी.
चांदोबातल्या गोष्टींमधला राक्षस आठवतो?
त्याचा जीव कसा पिंजऱ्यातल्या पोपटाच्या डोळ्यात असायचा.
तसा याचा जीव गाडीत.
घरातले सगळे आरसे फुटल्यासारखं वेडपट वागायचा.
कॉलनीतल्या पोरींनी त्या गाडीला बघून वेणीफणी करावी इतकी चकचकीत.
उमेदीची वर्ष हा गाडी पुसण्यातच घालवणार.
दोघं गाडीतून फिरायला गेली खरं.
पण तिचं लक्ष गाडीकडेच.
गाडी बघून जाम खुष.
तिचे हात सळसळू लागलेले.
त्याला मात्र ती आवडलेली.
रिफ्लेक्शन ऑफ लाईट.
गाडीतल्या आरशातून तिची रिफ्लेक्टेड ईमेज बघत होता.
चोरी चोरी छुपके छुपके.
काही वेळाने दोघं परत आली.
मंडळी घरी गेली.
तासाभरातच फोन.
पसंत आहे मुलगी.
तिलाही तो आवडला होताच.
बैठक ठरली.
खेळीमेळीत पार पडली.
साखरपुड्याची तारीख ठरली.
दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं.
'गाडी शिकून घे..."
त्याची रिक्वेस्ट.
अॅक्सेप्टेड.
मोटर ड्रायव्हिंग स्कूल.
"आठ दिवसात गाडी शिकाल...'
ती हवेत.
आठ दिवस संपलेही.
ती गाडी चालवायला शिकली.
निदान तिला तरी नक्की तसं वाटायचं.
पण ती गाडी डॅशिंग कारसारखी.
अॅक्सिडेंटची भीती नाही.
कंट्रोल सगळे शेजारच्याच्या हातात...
सॉरी पायात.
शिकणारा स्टिअरिंग हातात घेऊन गाडी गाडी खेळतो.
प्रत्यक्षात कर्ता करविता वेगळाच.
तो ....शेजारचा.
साखरपुडा दणक्यात.
दोघांना रोज संध्याकाळी फिरायला जायचं लायसन्स मिळालेलं.
एका संध्याकाळी, त्यानं गाडी तिच्या हातात दिली.
आयुष्यात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहिलेली ती दीपिकासुद्धा गांगरली असणार...
तसंच झालं.
गाडी सुरू झाली की बंद पडायची.
गिअर अडकायला लागले.
कण्णी बांधलेल्या पतंगासारखी गाडी तिरकी तिरकी चालू लागली.
समोरून येणारी प्रत्येक गाडी आपल्याच अंगावर येणार...
तिला तसंच वाटायला लागलं.
कपाळावर घामाचे ईनोले बुलबुले.
डायबेटीशी पेशंटाची शुगर एकदम लो व्हावी ...
तसा तिचा कॉन्फी लो झालेला.
ती वेळच तशी असते.
होणाऱ्या बायकोची प्रत्येक गोष्ट गोडच वाटते.
तो गोड्ड हसला.
"जान दो.
सध्या राहू दे.
लग्न झाल्यावर बघू.
बाद में तुम्हाराही राज है..
कभीभी चला लेंगे."
लग्न झालं.
हनीमून पिरीयड पण संपला.
लग्नाळू साखरपुडी गोडुला तो आता टिपीकल नवरोबा झालेला.
तिनं महिनाभर वाट बघितली.
तो काय तिच्या हातात गाडी देईना.
आज उद्या...
ढकलंपंची चाललेली.
तिची सटकली.
सासरेबुवा मदतीला आले.
ते म्हणाले.
"काढ गाडी बिनधास्त.
मी शेजारी बसतो.
कॉलनीतल्या रस्त्यावर ट्रॅफीक नसतो.
रोज चक्कर मारूयात.
हळूहळू सवय होईल.
त्याला काय घाबरायचं?
मी बाप आहे त्याचा."
कंपनीच्या बसनं जायचा तो.
तो गेला की...
ही दोघं गाडी घेऊन बाहेर.
पहिल्या पहिल्यांदा कासवी गाडी चालवायची.
हळूहळू सुसाट ससा.
परवा तर हायवेपर्यंत पण जाऊन आली.
हात चांगलाच बसला.
एकच प्रॉब्लेम होता.
रिव्हर्स जमायचा नाही.
नो प्रॉब्लेम.
शेजारचे राजहंस काका.
रिटायर्ड.
पस्तीस वर्ष गाडी चालवतात.
ते गाडी रिव्हर्समधे गेटच्या आत आणून लावायचे.
नेहमीसारखा तो ऑफिसला पळाला.
टपलेल्या दरोडेखोरांसारखा त्या दोघांनी गाडीवर डल्ला मारला.
चक्कर मारून अर्ध्या तासात परत.
ओय तेरी...
हम तो भूलही गये.
राजहंसकाका सकाळीच औरंगाबादला गेलेले.
लंबी साँस लो.
आन दो... आन दो...
तिचे सासरेबुवा सिग्नलमन झालेले.
खळ्ळखटाक.
आन दो ..
चुकून ब्रेकवरचा पाय अॅक्सेलेटरवर.
गाडीचे मागचे दोन डोळे फुटले.
तिचा लाल रंग मागच्या भिंतीवर उमटलेला.
पोटात खड्डा.
तिच्या आणि गाडीच्याही.
बापमाणूस.
पण तोही घाबरलेला.
त्यांनी इल्जाम अपने सिर पें लेने की तैयारी दाखवली.
तिचा ठाम नकार.
संपलं...
सगळं संपलं.
सावर रे..
आवर रे..
सावरली ती.
क्रूरसिंहाला सामोरं जायची तयारी केली.
मेसेज टाकला.
"गाडी ठोकली..."
बस.
सिधी बात .
नो बकवास.
मेसेज पोचायच्या आत तो घरी आलेला.
वाऱ्याच्या वेगाने.
पवनपुत्र हनुमान की जय.!
गाडीचा जायजा घेतला.
तापलेल्या इंजिनासारखा फुरफुरू लागला.
ही डोळे मिटून तयार.
एकदम विझलेल्या दिव्यासारखा गोठला.
"तुला काही लागलं का?
गाडीत माझा जीव आहे गं.
पण तू माझा श्वास आहेस.
तुला काही झालं असतं म्हणजे.??
तुझ्यावर असल्या दहा गाड्या कुर्बान.
प्रॉमिस.
रोज संध्याकाळी रिव्हर्सची प्रॅक्टीस करू.
डोन्ट वरी.
ईन्शुरन्स आहे.
गाडी पुन्हा नव्यासारखी दिसेल."
दे धक्का.
अनएक्स्पेक्टेड.
हा धक्का तिला गाडीच्या धक्क्याहून भयंकर वाटला.
सहनच झाला नाही.
तिचा चेहरा लालगुलाबी स्वेटरसारखा फुलला.
चेहऱ्यावर त्याच्याविषयीचं प्रेम दाटून आलं.
कानात बॅकग्राउंड म्युझिक वाजू लागलं.
तुझ्यात जीव रंगला.....
(रेखाचित्रः अमोल ठाकूर)