Dil-e-Nadaan : त्यांचा मधुचंद्र अन् 'ती'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 11:14 AM2018-04-16T11:14:32+5:302018-04-16T11:14:32+5:30
प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)
- कौस्तुभ केळकर नगरवाला
चट मंगनी पट ब्याह.
टिपीकल फिल्मी.
आमच्या बाबतीत होईल ,असं वाटलंच नाही कधी.
आई बाबा मागे लागले, म्हणून मुलगी बघायला गेलो.
सहज चक्कर मारायला जावं तसं.
आवडी.
मनापासून.
दिल के तार छेड गई, तसलं काही तरी.
एकदम हार्टच्या पियानोवर, लवसाँग्ज ऐकू यायला लागली.
दिल की घंटी बज गई..
खरंच घंटा वाजायला लागल्या.
यही है वो..
मन आक्रोश करून ओरडायला लागलं.
इतक्या लगेच माझी विकेट पडेल, असं वाटलं नव्हतं.
हिटविकेट झालो मी.
मधु.
तिच्यापायी...
आवारा, पागल, दिवाना.
पुढच्या गोष्टी पटापट ठरल्या.
आठवडाभरात साखरपुडा ठरला.
खरं म्हणजे लग्न या विषयावर माझी काही ठाम मतं होती.
पैशाची उधळण बिलकूल मान्य नव्हती.
रजिस्टर्ड लग्न.
पण ऐकतो कोण?
वैदिक पद्धतीनं लग्न व्हायलाच हवं.
साखरपुडा जोरात.
दीडशे दोनशे मंडळी जमलेली.
भरपूर बजेट असणार मधुच्या बाबांचं.
मला सहन होईना.
हटूनच बसलो.
लगे हाथ लग्नही उरकून टाकू.
अनायासे मंडळी जमलीच आहेत.
पुन्हा कशाला?
सन्नाटा.
कुणी काहीच बोलेना.
माझा मामा.
फुल टू सपोर्ट.
सगळ्यांना पटवलं त्यानं.
माझ्या मित्रांची टीम कामाला लागली.
सब मॅनेज हो गया.
गोरज मुहूर्तावर आमचं लग्न लागलंसुद्धा.
एका पोरीच्या बापाचं बजेट कमी केलं म्हणून मी खूष.
दुसऱ्या दिवशी जेजुरीला जाऊन आलो.
रात्री आमच्या ऑफिसगँगनं पार्टी ठेवलेली.
मधु सगळ्यांना पसंत पडली.
मस्त ट्युनिंग जमलं सगळ्यांशी.
वुमेनगँगनं एक अल्टिमेट रेड कलरचा वनपीस गिफ्ट दिला मधूला.
कमीने दोस्त मेरे.
पार्टी संपत आली.
काही द्यायचं नाव नाही.
अकरा वाजत आले.
शेवटी चिडून घरी निघालो.
गाडी सुरू केली.
पशाचा फोन.
'भागो भागो.
जल्दी भागो.
रात्री दीडची फ्लाईट आहे.
इथून कोलकाता..
तिथून दार्जिलिंग.
टू डेज, थ्री नाईटस्.
एव्हरीथींग ईज बुक्ड.
सो , एन्जॉय दी हनीमून."
साले..
जाम भागमभाग.
कशीबशी फ्लाईट पकडली.
आणि दार्जिलिंग गाठलं.
मान गये.
साला, काय रिसॉर्ट शोधलं होतं.
"डार्लिंग"
डोंगर खरवडला होता.
पायऱ्या पायऱ्यानं कॉटेजेस बांधलेली.
सहा सात टप्पे असतील.
प्रत्येक टप्प्यात सहा कॉटेजेस.
प्रत्येक कॉटेजपुढं छोटंसं लॉन.
गुलाब फुललेले.
त्यामागून डोकावणारे कापूसकोंडे ढग.
ईन्फानाईट टाईम्स फोटो काढले.
मधेच मधु ढगात हरवून जायची.
ड्रीमगर्लसारखी स्लो मोशनमधे तरंगत तरंगत बाहेर यायची.
हे तरंगण्याचेच दिवस.
लॉनमागे हिरवी दरी.
त्यातून शिट्टी मारत जाणारी ती फेमस ट्रेन.
बढिया.
पहिला दिवस असाच संपला.
रात्री हॉटेलमधे पार्टी होती.
बॉलडान्स.
त्या रेडहॉट ड्रेसमधे काय दिसत होती मधु.
ईन्फानाईट टाईम्स मेलो असेन मी.
रात्र रंगत चाललेली.
मस्त डान्स केला आम्ही.
साडेअकरा वाजता कॉटेजकडे निघालो.
तरंगत तरंगत.
लॉनवरून पलीकडे बघितलं.
खोऱ्यातलं मिणमिणतं दार्जिलिंग थंडीत कुडकुडत होतं.
एखादा टुक्कार कापशी पांढरा ढग डोंगर चढून वर यायचा.
आमच्या गालांवर टिचकी मारून त्यांना अजून गुलाबी करून जायचा.
रातकीडे कुठलं तरी लेटनाईट साँग वाजवत होते.
कुऽऽऽ.
कर्कश्श शिट्टी मारत ती टॉय ट्रेन डोंगर पोखरत निघाली.
अंधाराच्या काळ्या कॅनव्हासवर मारलेली उजेडाची रेघ.
काही वेळ टिकली.
मग विझली.
ट्रेनची शिट्टी घाबरवणारी.
मधु फेविकॉलसारखी चिकटली मला.
गुदगुल्या.
लॅच उघडलं.
आत शिरलो.
वो घडी आ चुकी थी... जिसका बरसोंसे इन्तजार था.
काय घाई आहे?
पूरी रात बाकी है!
मधुचा हात हातात घेत मस्त गप्पा मारल्या.
तिच्याविषयी मला काहीच माहिती नव्हतं.
तिचा प्रत्येक शब्द.
प्रेमाच्या पाकातून बुडवून काढलेला गुलाबजामून.
खुशनसीब.
मी माझ्यावरच जेलस फील करत होतो.
एक वाजत आलेला.
" आलेच हं मी.."
मधु बाथरूममधे पळाली.
मस्त आंघोळून बाहेर आली.
कुठला तरी मंद सेंट फवारलेला.
तिचे ओले केस.
डीम लाईट.
धुंद माहौल.
या केसांनीच गळा कापला जायचा माझा.
मी अधीर.
सर्कन मिठीत खेचली तिला.
क्षणभरच नजरानजर.
मी हादरलो.
एलईडीसारखे चमकणारे तिचे डोळे.
एखाद्या खूँखार वाघिणीसारखे चकाकले.
क्षणभरच.
माझ्या बॉडीतून करंट पास झाला.
वाटलं ही मधु नाहीच.
दुसरीच कुणीतरी.
"थांब जरा.."
घोगरा आवाज.
माझे कान चिरत गेला.
शक्यच नाही.
हा मधुचा आवाज?
पुढच्या क्षणी.
मधु पुन्हा लाडात आली.
त्याच नेहमीच्या नाजूक आवाजात रिक्वेस्ट.
"प्लीज, मला थोडी भीती वाटतीय रे..."
गोड लाजली.
मगाशी मला भास झाला असावा बहुधा.
होता है...
चलता है..
टी. व्ही. लावला.
'मेरे सपनों की रानी' गाणं लागलेलं.
इथंच दार्जिलिंगला शूट केलेलं.
मधुनं हात हातात घेऊन मला डान्स करायला लावला.
सुपर डान्सर.
आम्ही दोघंच.
तिचा हात खांद्यामागनं माझ्या मानेवर.
क्षणभरच.
असं वाटलं हाताच्या बोटांनी ती माझ्या गळ्याचं माप घेतेय.
अचानक बोटांचं प्रेशर वाढू लागलं.
श्वास अडकू लागला.
मला जोरदार ठसका.
मधुनं पटकन् पाणी आणलं.
काळजीचं पाणी तिच्या डोळ्यात दिसलं.
मला कळेना.
कुठली मधु खरी?
आधीची की ही आत्ताची.?
काही तरी विचित्र घडतंय नक्की.
मलाच भास होतायेत.
नक्की.
डान्स अचानक संपला.
अचानक मधु म्हणाली, चल बाहेर लॉनवर चक्कर मारू.
मी घड्याळ बघितलं.
चार वाजत आलेले.
ओक्के.
चलते है.
शाल गुंडाळून आम्ही बाहेर.
दरीतलं दार्जिलिंग झोपलेलं.
सगळीकडे अंधार.
धुरकट चंद्र.
दरीतून वर येणारे पांढरे ढग.
आम्ही लॉनच्या कोपऱ्यात.
खाली गर्द अंधारी दरी.
अचानक माझा पाय घसरला.
घसरला?
मला वाटलं मधूनं मला नक्की ढकललं असावं.
मी सावध होतो.
पकटन एका झाडाचा आधार घेतला.
वाचलो.
थोडक्यात.
मधुकडे बघितलं.
ती तर फार घाबरलेली.
मंतरल्यासारखे खोलीत परत आलो.
रात्र संपत आलेली.
मधु शेजारी झोपलेली.
माझी झोप उडालेली.
मधु अशी विचित्र का वागतेय ?
माझ्याच जीवावर उठलीय ?
तसं नसेलही कदाचित.
माझ्याच मनाचे खेळ.
काय कळेना.
कुणाशी बोलावं का?
काय सांगणार?
हनीमूनलाच बायको जीवावर उठलीय?
असह्य झालं.
मेंदूचा भुगा.
पहाटे साडेपाचला पशाला फोन.
पशा.
मला समजून घेणारा सख्खा मित्र.
त्याला सगळं सांगितलं.
"मी बघतो...
डोन्ट वरी."
त्यानं फोन फिरवले असणार.
कुठून तरी ओळख काढली.
पटापटा सूत्रं हलवली.
सुरंजन बोस.
सात वाजता आमच्या रूमवर.
त्यांचा पलीकडच्या डोंगरावर बंगला होता.
आम्ही बॅगा उचलून तिकडे.
त्यांच्याकडचा होम स्टे बढिया.
पुढचे दोन दिवस तरंगतच.
कुठलाच त्रास नाही.
तिसऱ्या दिवशी दार्जिलिंग बाय बाय.
गाडी निघाली.
"डार्लिंग"पाशी गडबड.
पोलिसांच्या गाड्या.
एक नवी नवरी धाय मोकलून रडणारी.
कॉटेज नं 5
डाऊन फ्लोअर 6.
अरे ही तर तीच कॉटेज जिच्यात आम्ही थांबलो होतो
तिचा नवरा रात्री दरीत पडून मेला म्हणे.
ड्रायव्हरने हॉटेलच्या नावाने कचकचीत शिव्या हाणल्या.
"हरामके, पैसों के गुलाम.
ओर एक को मरवा दिया सालोंने.
साब भूतिया जगह है वो.
एक मर्द ने अपने औरत को धक्का मारके मार दिया था उधर.
बस वही बदला लेती है.
मर्द को ही मारती है ..
गलतीसे भी उधर नही ठेहरना."
गोठऱ्या थंडीत मला घामाची आंघोळ.
मी गाडीच्या आरशात बघितलं.
मी होतो.
हुश्श.
"चलो, जल्दी चलो."
मधुला जणू काहीच माहिती नव्हतं.
मधुचंद्र न विसरणेबल.
(ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे.)
रेखाचित्रः अमोल ठाकूर