Gudi Padwa विशेष: 'प्रेमा'ची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 04:45 PM2018-03-16T16:45:34+5:302018-03-16T16:45:34+5:30
गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'लोकमत डॉट कॉम'वर सुरू होतंय... प्रेमकथांचं नवं सदर 'दिल-ए-नादान'! :)
गुढीपाडव्याच्या निमित्ताने 'लोकमत डॉट कॉम'वर सविनय सादर करीत आहोत, प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी प्रेमकथांचं नवंकोरं, टवटवीत सदर... 'दिल-ए-नादान'! :)
>> कौस्तुभ केळकर नगरवाला.
श्याम.
श्याम वसंतराव कुलकर्णी.
श्याम म्हणजे प्रेमाचा नवरा.
दोघांचं अरेंज्ड मॅरेज झालेलं.
नुकताच हनीमून पिरीयड संपलेला.
आत्ता खरी मॅरीड लाईफला सुरुवात झालेली.
आपला श्याम.
बी. फार्म झालाय.
हुश्शार आणि मेहनती.
साध्या एम. आर. पासून सुरुवात केलेली.
आज दवा बाजारात एस. के. फार्माचं नाव फेमस.
डोक्यात फक्त धंदा एके धंदा.
धंदा सुरू करताना घेतलेलं बँकेचं लोन.
आता जवळ जवळ फिटत आलेलं.
फिटे अंधाराचे जाळे...
तरीही श्यामच्या कपाळावर, आठ्यांची जळमटं आहेतच.
नुकताच कोथरुडला टू बी एच के घेतलेला.
हाऊसिंग लोन डोक्यावर.
दुकानात पाच सहा पोरं कामाला.
त्यांना सांभाळून घेत, धंदा करायचा.
श्यामच्या मते एकही कामाचा नाही.
उगाच पोसतोय पोऱ्यांना.
तरीही त्यांच्यावाचून श्याम हेल्पलेस.
कुणीतरी हटकून, न सांगता दांडी मारायचा.
श्यामची चीडचीड.
दिवस अंगावर यायचा.
दिवसाचा कचरा व्हायचा.
दुकानात शिरलं की, श्यामचा बाजीप्रभू व्हायचा.
एकटा खिंड लढवायचा.
ईन्फानाईट टेंशन्स डोक्यात.
टारगेट , वसुली , डिलीव्हरी , डॉक्टर्स व्हिजिट , सेमिनार्स, चलन, ट्रान्सपोर्ट..
डोक्याचा नुसता मेतकूट भात व्हायचा.
वसंतराव.
श्यामचे बाबा.
रिटायर्ड हेडमास्तर.
वत्सलाबाई.
श्यामची प्रेमळ आई.
डिट्टो श्यामची आई.
आणि आता प्रेमा.
श्यामची अतिप्रेमळ नवीनवी बायको.
श्यामच्या घरच्या त्रिकोणाचा, नुकताच चौकोन झालेला.
पास्ट टेन्समधे, श्यामच्या घरी, काटकोन त्रिकोण असायचा.
स्वतः श्याम.
या त्रिकोणाचा चावरा काटकोन.
काट खाणारा.
दुकान आणि घर यातला फरक विसरलेला.
सतत वचवच.
वसकणं.
खेकसणं.
अगदी उलटून नाही तरी..
कुजकं नक्कीच बोलायचा.
थोडी 'ग'ची बाधा झालेली.
मी किती करतो, रक्त आटवतो, वगैरे डायलॉग फेकायचा.
वसंतराव आणि वत्सलाबाई.
खरं तर पोराचा अभिमान वाटायला हवा.
वाटतो तर.
हल्ली जरा भीतीही वाटते.
कधी सटकेल ?
भरोसा नाही.
खरंच रक्त आटवतोय हो पोरगा.
सकाळी नऊ ते रात्री नऊ.
विठोबासारखा उभा असतो सतत.
होते चीडचीड.
साहजिक आहे.
आपलं माणूस आहे.
सांभाळून घ्यायला हवं.
सांभाळून घेत होते.
श्याम नऊ वाजता घराबाहेर पडला की, घर रिलॅक्सायचं.
मोकळा श्वास घेतला जायचा.
वसंतराव दोन मित्रांबरोबर, रमीचा डाव मांडायचे.
वत्सलाबाईंची गँग भजनं म्हणायची.
हसणं.
खिदळणं.
चहा , पोहे.
घर निवांत.
रात्रीचे साडेआठ वाजत आले की..
अटेंशन.
घर कोकरू व्हायचं.
हाताची घडी, तोंडावर बोट.
ऑपरेशन थिएटरमधे ढकललेल्या पेशंटसारखं, गप्प गुमान.
चलता है..
असा नव्हता हो श्याम आधी.
आधी काय, कधीच नव्हता.
घडाघडा बोलायचा.
नाटकात कामं करायचा.
छान बासरी वाजवायचा.
ट्रेकला जायचा.
भोवती सदैव, मित्रांचा वेढा पडलेला असायचा.
धंद्यात पडला आणि आमचा श्याम हरवला हो.
एकटा पडलाय बिचारा.
कुणीतरी जुन्या श्यामला शोधून काढा रे...
प्रेमा.
प्रेमाकडनंच अपेक्षा आहेत घराला.
एरवी गिऱ्हाईकाशी श्याम अगदी गोड बोलतो.
त्याचं गोड बोलणं ऐकून, एखाद्याला डायबेटीस व्हायचा.
या गोडबोल्या टेक्निकवर तर ,धंदा वाढवत नेला त्यानं.
जाऊ दे..
शोकेसमधे सगळं गोडच वाटतं.
शोकेस आणि गोडाउनमधे फरक असतो राव.
प्रेमाला विचारा.
तिचा विश्वासच बसायचा नाही.
आठ दिवस तरंगत होती दोघं.
श्यामचं मिठ्ठास बोलणं.
त्याचं केअरिंग नेचर.
गाणी म्हणणं.
हातात हात घेवून स्वप्नात हरवणं..
प्रेमा जाम खूष होती श्यामवर..
बरं...
आपण कुठं होतो ?
श्यामच्या घरी.
सकाळची साडेआठची वेळ.
आफ्टर दी हनीमून.
बॅक टू पॅव्हेलीयन.
प्रेमा तिच्या सासूबरोबर स्वयंपाकघरात.
सव्वाआठ झाले.
श्याम आवरून तयार.
अजून ब्रेकफास्ट नाही.
"घरातली घड्याळं झोपली का काय ?"
"पाचच मिनटं थांब.
नेमका गॅस संपला.
त्यामुळे उशीर झाला.
तू पेपर वाच.
पोहे होतायेतच."
शामच्या आईची शरणागती.
सटकली.
श्यामची सटकली.
"तुम्हीच खा ते.
नऊ वाजल्यापासून गिऱ्हाईकांची लाईन लागते.
जीव माझा जातो तिथे
तुमचं चालू द्या , निवांत"
तणतणत श्याम निघाला.
डबा न घेता.
दरवाजात वसंतराव.
"बाबा , टेलिफोनचं बिल भरलंत का?"
' काल निघालोच होतो.
नेमका जोश्या भेटला.
खूप वर्षांनी.
निवांत गप्पा झाल्या.
राहिलं काल.
आज नक्की भरतो.'
ती नजर.
श्यामच्या त्या कुत्सित नजरेनं,
सख्ख्या बापालाच गिळून टाकला.
श्यामची आई होती ती.
तळमळत होती.
"प्रेमा , तू जाशील का डबा घेऊन दुकानी?
उपाशीपोटी गेला पोर माझा."
प्रेमानं सावकाश स्वयंपाकघर आवरलं.
मनाशी काही तरी ठरवलं.
डब्याची पिशवी घेऊन ती दुकानात.
ती दुकानात शिरली.
प्रमोद, दुकानातला सगळ्यात जुना अन् विश्वासू.
"प्रमोद भाऊजी , जरा दुकान सांभाळा.
मला साहेबांबरोबर जरा बाहेर जायचंय.
अर्ध्या तासात परत येतो आम्ही."
'काळजी नको वहिनीसाहेब.
आम्ही नीट सांभाळतो सगळं'
प्रमोदचं आधारकार्ड.
अर्ध्या तासानं दोघं दुकानात.
तासाभरात प्रेमा घरी.
रात्री साडेआठ पावणेनऊ.
दारावरची बेल किंकाळते.
अहो आश्चर्यम्...
शिट्टी मारत श्याम घरात शिरतो.
आल्या आल्या आई-बाबांच्या पाया पडतो.
" चुकलंच माझं.
उगाच चीडचीड करतो मी.
यापुढे असं करणार नाही.
आई जेवायला वाढ लवकर.
जाम भूक लागलीय.
पटकन् जेवण करू यात.
मी सुजाताची मस्तानी घेवून आलोय.
आई तुझी आवडती ड्रायफ्रुट.
बाबांची मँगो.
आणि आमच्या दोघांची केशरपिस्ता.
चलो ,खाना परोसो."
आई बाबा शॉकमधे.
तेवढ्यातल्या तेवढ्यात सूनबाई, सासूबाईला डोळा मारते.
अगदी त्या प्रिया प्रकाशसारखा.
मस्तानी ओरपली.
मग चौघांनी तासभर कॅरम कुटला.
श्यामनं माळ्यावरची बासरी काढली.
सूर लावला.
पाऊण एक तास वाजवत होता.
शेवटची धून त्याची आवडती.
मिले सूर मेरा तुम्हारा...
मजा आ गया.
हसणं , खिदळणं , टाळ्या , धप्पी..
किती तरी दिवसांनी घर ,आनंदाच्या उशीवर डोकं ठेवून झोपलं.
सकाळी.
श्यामचं चॅनल म्युट.
तसं सगळं वेळेतच चाललेलं.
पण आज श्यामची घाई गायब.
आईने केलेल्या शिऱ्याचं कौतुक.
प्रेमानं डब्यात दिलेल्या भाजीचं कौतुक.
बाबांना सांगितलेलं.
"संध्याकाळी तयार राहा.
मी जरा लवकर येतो.
तुम्हाला जोशीकाकांकडे घेऊन जातो."
अरे हे चाललंय काय?
श्याम बदल गया है क्या?
म्हणजे काय?
जुना श्याम परतलाय.
आई बाबांनी कधीच ओळखलंय.
हीच तर खरी 'प्रेमा'ची जादू.
शाम जिना उतरला असेल नसेल.
तेवढ्यात आईबाबा टुणकन् उडी मारून, प्रेमाशेजारी.
चेहऱ्यावर भलामोठ्ठा क्वश्चनमार्क.
'ये तूने कैसे किया ?'
बाबांची प्रश्नपत्रिका.
प्रेमा फॉर्मात.
"काही नाही. सोप्पय.
दुकानात शिरले, त्याला बाहेर काढला.
डायरेक्ट सुजातामध्ये.
दोन घोट मस्तानीचे पोटात गेल्यावर, तो जरा गार पडला.
त्याला व्यवस्थित समजावला.
'नवरोबा, तुम्ही खरंच हुशार आहात.
कर्तबगार आहात.
आम्हाला सगळ्यांना कौतुकच वाटतं त्याचं.
पण कर्तृत्वाला ,स्वभावाचं काटेरी कुंपण घालू नकोस, श्याम.
दुसऱ्याकडनं तू खूप अपेक्षा ठेवतोस.
तुझ्याकडनं आम्ही काही अपेक्षा ठेवाव्यात की नाही?
सगळ्यांशी गोडच बोलायला हवं.
आईबाबांशी तिरकं बोललेलं मला चालणार नाही.
त्यांना दुखावलंस तर मला त्रास होईल.
तेच दुकानात.
दुकानात माणसंच काम करतात.
त्यांच्याशी गोडच बोलायला हवं.
त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक कर.
त्यांच्यावर विश्वास ठेव.
चुकले की जरूर कान धर.
पण आपलेपणानं, गोड शब्दात समजाव.
अजून एक, समोरच्याचं कौतुक करायला शिक.
सगळीकडे मीच..
हा अट्टहास सोडून दे.
जबाबदारी वाटायला शिक.
पुढच्या आठवड्यापासून, मीही येत जाईन दुपारी चार तास दुकानात.
आतल्या आत कुढू नकोस.
मोकळा हो.
स्वतःचे छंद जोपास.
आनंदी राहा.
आनंद वाटत राहा.
धंदेवाला श्याम यापलीकडेही,
श्याम नावाचा चांगला माणूस आहे.
मला त्याच्याबरोबर राहायला आवडेल.
आणि जर हे झालं नाही तर मात्र.... ,
हॉलमधे टी व्ही बघत डोळे मीट.'
श्याम समझ गया.
खर सांगू का ,
श्याम 'प्रेमा'चा भुकेला होता.
आता फिकर नॉट.
सब कुछ ठीक हो जायेगा."
नुसता जल्लोष.
तिघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या.
अॅन्ड दे फोर लिव्हड हॅपीली..
फार टू मोअर ईयर्स.
देन दे फाईव्ह,
लिव्हड हॅपीली फॉर एव्हर.
प्रेमाची जादू.
चालणारच...
(रेखाचित्रः अमोल ठाकूर)