Nostalgia : दोन रुपयात दिवसभराचा आनंद
By अमेय गोगटे | Published: April 18, 2018 01:18 PM2018-04-18T13:18:35+5:302018-04-18T13:18:35+5:30
त्या दुकानात एका कोपऱ्यात पडलेली, हाडं खिळखिळी झालेली एक छोटी सायकल दिसली आणि माझी नजर एक बोर्ड शोधू लागली.
काल एक दृश्य बघून फार चिंता वाटली...
आपण हळूहळू काही गोष्टी विसरत चाललोय...
अहो, काल एका मुलाने ice-cream चा कप घेतला आणि त्याचं झाकण चक्क न चाटताच फेकून दिलं....!!
काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपवर आलेला हा मेसेज वाचून हसू आलं आणि बालपणीचा सुखाचा काळ आठवला. कपवरच्या पुठ्ठ्याला लागलेलं आईसक्रीम चाटून पुसून साफ करण्याची लहानपणीची सवय अजूनही कायम असल्याचा आनंदही झाला.
या मेसेजचा हँगओव्हर कायम असतानाच, सायकलच्या दुकानात जाणं झालं. मुलाच्या सायकलसाठी हवा भरायचा पंप घ्यायचा होता. त्या दुकानात एका कोपऱ्यात पडलेली, हाडं खिळखिळी झालेली एक छोटी सायकल दिसली आणि माझी नजर एक बोर्ड शोधू लागली. 'सायकल भाड्याने मिळेल. २ रुपये तास.'
इतक्यात सायकलवाल्याने माझ्या हातात पंप दिला. 'एकच कंपनी, बेस्ट क्वालिटी, २३० रुपये फिक्स', असं सांगून तो दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे वळला आणि मी हवेचा पंप या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केल्याच्या थाटात पंप न्याहाळू लागलो. वजन, मजबुती वगैरे तपासली. कंपनी भारतीय होती, वस्तू उपयोगाची होती आणि दुकानदार मराठी होता, त्यामुळे नकाराचं कारणच नव्हतं. थोडं टेक्निक समजून घेऊन मी पैसे दिले आणि पंप चिरंजीवांच्या हाती दिला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद मला पुन्हा भूतकाळात घेऊन गेला.
माझी नजर पुन्हा त्या अडगळीतल्या सायकलकडे गेली. भाड्याने सायकल मिळतात का रे आता?... मी तिशी-पस्तीशीतल्या सायकलवाल्याला विचारलं. त्यानं खेदाने नकारार्थी मान हलवली. आता जमाना बदलला, दोन रुपयांतला दिवसभराचा आनंद संपला, हे त्याचं वाक्य मनात घर करून राहिलंय.
शाळेला सुट्टी लागली की भाड्याने सायकल आणणं हा मोठा कार्यक्रम असायचा. सायकलवाले काका तेव्हा देवासारखे वाटायचे आणि त्यांच्या कृपादृष्टीसाठी आम्ही भक्तगण आतुर असायचो. ते कितीची वेळ देतात हे ऐकण्यासाठी सगळ्यांच्याच कानात प्राण गोळा व्हायचे आणि मग घड्याळावर नजरा खिळायच्या. म्हणजे बघा ना, बुकिंग करणं, अपॉइंटमेंट घेणं, वाट बघणं आणि वेळ पाळणं इतकं सगळं आम्हाला एका सायकलने शिकवलं, असं म्हणायला हरकत नाही. दिलेल्या वेळेआधीच सगळी मुलं सायकलच्या दुकानात पोहोचायची. बेस्ट कंडिशनमधील सायकल पटकावणं हे त्यामागचं कारण असायचं. एकदा का सायकल मिळाली की सगळ्यांचं मन भराऱ्या मारू लागायचं. तो आनंद शब्दातीत होता. खरोखरच दोन रुपयांत दिवसभर पुरणारा आनंद होता. सायकलशी असलेल्या या ह्रद्य नात्यामुळेच, कार रेसिंगच्या व्रुम व्रुम सिनेमांपेक्षा आम्हाला - तिशीतल्या तरुणांना आजही 'जो जिता वही सिकंदर' आणि त्यातलं 'मॉडेल कॉलेज' जवळचं, आपलंसं वाटतं.
आज काळ बदललाय. तो बदलणारच आणि आपणही कालानुरूप बदलायला हवं. पण छोट्या छोट्या गोष्टींत आनंद, समाधान मानण्याची वृत्ती हरवत चाललीय, हे दुःखद आहे. भाड्याने आणलेली सायकल चालवताना जे सुख मिळायचं ते आज स्वतःच्या पाच-दहा लाख रुपयाच्या कारमध्येही आपल्याला का मिळू शकत नाही?, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आनंद, समाधानाची बदललेली व्याख्या, परिमाणं पुढच्या पिढीला कुठे घेऊन जाणार?, ही सुद्धा काळजीची बाब आहे. मी कुणी तत्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ वगैरे नाही. मला जे दिसलं, जाणवलं, ते माझ्या वयाच्या सगळ्यांनाच रोजच्या छोट्या-छोट्या घटनांमधून जाणवतंय. पण कळत असूनही वळत नसल्यासारखं आपलं झालंय.
मागणी तसा पुरवठा, ही अर्थशास्त्रीय टर्म आपल्याला माहीत आहे. पण मुलांकडून मागणी यायच्या आधीच आपण त्या वस्तूचा पुरवठा केलेला असतो. त्यामुळेच हल्लीच्या मुलांना कुठल्या गोष्टीची किंमत राहिलेली नाही, असं बालमानसशास्त्रज्ञ सांगतात. आपली क्रयशक्ती - खर्च करण्याची क्षमता वाढलीय ही चांगलीच गोष्ट आहे. पण हा खर्च आपण कुठे करतोय? आपल्या लहानपणी आपल्याला जे मिळालं नाही, ते सगळं मुलांना द्यायचा अट्टहास कशासाठी? त्यापेक्षा आपल्याला आई-वडिलांनी जे दिलं - ते संस्कार, समाधान मानण्याची वृत्ती आणि वेळ - हे मुलांना द्यायची जास्त गरज आहे. आपण आज जे काही आहोत, ते याच पायावर उभे आहोत की... आपली पुढची पिढीही या पायावर नक्की भक्कम उभी राहू शकेल. बघा, विचार करून! :-)