Valentine's Day: लोकलमधली लव्हस्टोरी; ते आले, कडाडून भांडले, अन्...
By अमेय गोगटे | Published: February 14, 2018 01:55 PM2018-02-14T13:55:11+5:302018-02-14T14:01:44+5:30
मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमध्ये फुललेल्या, बहरलेल्या प्रेमकहाण्या आपण बाॅलिवूड पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिल्यात. पण, ही कथा थोडी वेगळी आहे.
मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमध्ये फुललेल्या, बहरलेल्या प्रेमकहाण्या आपण बाॅलिवूड पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिल्यात. पण, ही कथा थोडी वेगळी आहे.
......
रात्री ९.५५ वाजता अंबरनाथ स्टेशनातून लोकल सुटली आणि 'ती'ही. एके ४७ मधून गोळ्या सुटतात तशीच काहीशी.
ती: काडीची अक्कल नाहीए तुला!
तो: (मान खाली घातलेली. आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या केलेल्या गुन्हेगारासारखा) आता काय झालं बाई?
ती: चारचौघांत कसं वागायचं हेही कळत नाही.
तो: केलं काय पण असं?
ती: पार्टीला सँडल्स घालून येतात? एवढे नवे शर्ट कपाटात असताना हा कुठला शर्ट शोधलास? तो इन करायचा, तर तेही नाही. बावळटपणाचा कळस आहे.
तो: (डोळे मिटून आवंढा गिळतो.)
ती: बोल ना आता.
तो: (शांत स्वरात) काय बोलू?
ती: याचाच संताप येतो मला. दरवेळी माझ्या घरच्यांपुढे शोभा करतोस तू. मुद्दाम करतोस का? माझी इज्जत जावी म्हणून.
तो: वाट्टेल ते काय बोलतेस गं (सुरात थोडा राग, उद्वेग. कदाचित तिने तिच्या घरच्यांचा उल्लेख केल्याने...)
ती: मग काय तर. तो समिधाचा नवरा बघ आणि स्वत:कडे बघ. कसा आला होता टकाटक. वागणंही किती रुबाबदार. नाहीतर तुझा अवतार...
तो: (तुलना केल्याने तीळपापड झालेला. पोह्याचा पापड तळल्यानंतर लाल होतो, तसा लाल होऊ लागलेला...)
ती: (आगीत आणखी तेल ओतते) आता चिडून काय उपयोग? आधी विचार करायला हवा होता.
तो: हो बाई, चूक झाली माझी. यायलाच नको होतं इथे.
ती: तू नाही रे, मी घोडचूक केलीय. तुझ्याशी लग्न करून.
तो: झालंss आली गाडी मूळ पदावर.
ती: (आता एके ४७ ठेवून तिने एके ५६ हातात घेतलीय) येणारच ना. नेहमीचं आहे रे तुझं. तरी सांगून निघाले होते. वेळेत ये, नीट तयार होऊन ये. पण नाही. मीच थांबायला हवं होतं. एकत्रच यायला हवं होतं. आणि हो, अशा कार्यक्रमांना येताना थोडे जास्तीचे पैसे जवळ ठेवायला काय त्रास होतो रे तुला? बघावं तेव्हा तुझा खिसा फाटका. जावयाचा मान म्हणून तुला आणि संदीपला (समिधाचा रुबाबदार नवरा) ओवाळलं तर तिथेही आपण आपली कुवत दाखवलीत. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात १०० रुपये ओवाळणी ठेवतात का रे? संदीपने बघ ५०० ची नोट ठेवली. त्याला कळतं ते तुला का नाही कळत रे?
तो: (आता इतका वेळ खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा उद्रेक होतो) हो गं बाई... तू मोठी, तुझे आई-बाबा मोठे, बहीण मोठी आणि तो संदीप तर प्रातःस्मरणीय सदावंदनीय. त्याच्यापुढे मी पामर, तुच्छ, कस्पटासमान. १०० रुपयांची ओवाळणी घालून मी मोठ्ठं पातक केलं आहे. आता या पापाचं पायश्चित्त म्हणून उडी मारतो लोकलमधून...
तीः (फणकाऱ्याने) होss, असा बरा उडी मारशील. तू या दारातून उडी मारलीस तर मी या बाजूच्या दारातून उडी मारेन, पण तुझा पिच्छा सोडणार नाही.
तो तिच्याकडे चिडून बघतो. तिच्या डोळ्यातही राग. पण ही नजरानजर युद्धविरामाचे संकेत देऊन गेली. बॉलिवूड सिनेमाचा चाहता असल्यानं या 'हॅप्पीज् एन्डिंग्ज'ने मी सुखावलो आणि म्युझिक प्लेअर सुरू करून अरिजीतच्या धुंद सुरांमध्ये रमून गेलो.
जाता जाताः हा प्रसंग अजिबातच काल्पनिक नसून तो वास्तवात घडलेला आहे. (माझ्या बाबतीत नाही हं.) अर्थात, त्या प्रसंगात रंग भरण्यासाठी मी थोडंसं स्वातंत्र्य घेतलंय. पण, संजय लीला भन्साळीच्या 'सिनेमॅटिक लिबर्टी'इतकंही नाही. भांडणामुळे प्रेम वाढतं, हा आपला सगळ्यांचाच अनुभव असल्याने, ट्रेनमधल्या या वादानंतर त्या जोडप्यातलं प्रेमही बहरलं असेल आणि त्यांचा संसार सुखात सुरू असेल, अशी आशा करू या. भांडत भांडत सुखाने नांदणाऱ्या जोडप्यांना Happy Valentine's Day!