Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन

By गौरी ब्रह्मे | Published: February 14, 2018 06:52 AM2018-02-14T06:52:33+5:302018-02-14T07:04:38+5:30

लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल?

valentines day special blog love hate relationship | Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन

Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन

खाऊ की नको? खाऊ की नको? करत घेतलीच शेवटी एक. माझी सातवी पाणीपुरी. खरं तर पोट सहाव्या पुरीत भरलं होतं. पण मन भरायला सातवी पुरी खावी लागते. तेव्हा कुठे मोक्षाचा मार्ग मोकळा होतो असं म्हणतात!

मग मात्र मला त्या गाडीवरच्या पुऱ्यांकडे बघवेना. किंचित रागही आला त्यांचा. इतकी काय आवडते ही मला? खाण्याआधी राहवत नाही मग मात्र बघवत नाही. माझ्या "लव्ह हेट" रिलेशनशिपची व्हॅलेंटाइन नंबर १ म्हणजे ही पाणीपुरी. एखाददिवशी अलोट प्रेम जडून येतं, खूप खावीशी वाटते, पण मग दुसऱ्या दिवशी वजनकाट्यावर उभं राहायच्या कल्पनेने तिचा राग येऊ लागतो. 

तर आजच्या दिवशी एकाच वेळी प्रचंड प्रेम-प्रचंड राग वाटणाऱ्या नात्यांबद्दल बोलू. ही लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल? मानवी मन अगम्य आहे म्हणतात ते काही खोटं नाही. या नात्यांचा ग्राफ काढायचा म्हटला तर भरपूर डोंगरदऱ्या असंच चित्र दिसेल. 

आपल्या जन्माचे जोडीदारही बरेचसे याच कॅटेगरीतले. व्हॅलेंटाइन नंबर २. बराच काळ आपण एकत्र घालवतो, एकमेकांचे गुणदोष ओळखतो, प्रेम तर असतंच, पण कधीकधी अगदी "हाच का तो माणूस ज्याच्यावर आपण प्रेम करतो" अशी शंका वाटण्याइतपत त्याचा/तिचा राग येतो. मग भांडण ठरलेलं. पण या "hate" फेज नंतर दाटून येणारं प्रेम हे अधिक आवेगाचं, उत्स्फूर्ततेचं असतं हे आपण सगळेच मान्य करू.

या लव्ह-हेटच्या यादीत तिसऱ्या नंबरचा व्हॅलेंटाइन म्हणजे आपला सर्वांचा लाडका सोशल मीडिया. इथे असू तोवर आपण याच्या प्रचंड प्रेमात असतो. काय पोस्ट करू आणि काय नको, लाइक, कॉमेंट, डिलीट, ब्लॉक असं करत तासन्तास आपण घालवतो. यात गुंतत जातो, कधीकधी नको इतके. मग सुरू होते हेट फेज. यातून बाहेर पडायचा प्रयत्न आपण करतो. कोणाला जमतं, कोणाला नाही. कधी जितक्या तिटकाऱ्याने आपण बाहेर पडतो, तितक्याच आवेगाने आपण इथे परत येतो. ऐंशीच्या दशकामधील हिरोइन जशी मनातून प्रेम करत पण बाहेरून रडत "I hate you, I hate you" म्हणत हिरोला हलके ठोसे मारत, त्याच्या मिठीत जाते, अगदी तसंच!

या नात्याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे सासू-सुनेचं असावं. याचं कारण दोघींचं आयुष्य मुख्यत्वे एकाच व्यक्तीभोवती गुंफलेलं असतं त्यामुळे असावं कदाचित. कितीही प्रेम असलं तरी थोडेफार ठसके या नात्याला लागतातच. उदाहरण म्हणून सांगते, माझ्या सासुबाई नुकत्याच एका मोठ्या ऑपरेशनमधून उठल्या होत्या. हळूहळू बऱ्या होत होत्या. एरवी आमचं गूळपीठ आहे. पण ज्या दिवशी त्यांनी किचनमधे येऊन वरणाचं पातेलं दुधाला का घेतलं आणि मेथी बारीक चिरली नाही असे हलके टोमणे मारले, तेव्हा कुठे मला पटलं की त्या आता संपूर्ण बऱ्या होण्याच्या मार्गावर आहेत! व्हॅलेंटाइन नंबर ४.

घ्या, मी इकडे मस्त लिहीत बसले आहे आणि तिकडे व्हॅलेंटाइन नंबर ५ माझी आतुरतेने वाट पाहतो आहे. कोण म्हणून काय विचारता? ते माझं कीचन! या कीचनचा कधी भयंकर राग येतो तर कधी अगदी इथे काय करू आणि काय नको असं वाटतं. पण आज प्रेमाचा दिवस आहे, काहीतरी मस्त बनवायला हवे. मनात आत्ता सहज एक विचार आला, आज व्हॅलेंनटाइन नंबर २ ला सुद्धा हेच वाटलं तर काय बहार येईल नाही? 

gaurirbrahme@gmail.com
 

Web Title: valentines day special blog love hate relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.