रस्त्यांचा औरंगाबाद पॅटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:35 PM2017-09-03T15:35:39+5:302017-09-03T15:37:39+5:30
या रस्त्यांचा पॅटर्न पाहता, मुख्यमंत्री महोदयांनी हाच पॅटर्न राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू करावा, असा फतवा काढल्याचे कळते, असो. नगरसेवक आणि वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्व गुत्तेदार, गल्लीतले पुढारी, महानगरपालिकेचे सर्व अभियंते या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन!
- मुशाफिर
औरंगाबाद शहरातील पामर नागरिकांना दररोज शहरातून अंतर्गत प्रवास करताना जे दिसते, जे अनुभवावे लागते ते फारच आल्हाददायी व सुखकारक आहे. विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांना व वयोवृद्धांना प्रवास करताना रस्त्याचा व ट्रॅफिकचा अत्यंत सुखकारक अनुभव येतो. एकंदर वाहतुकीच्या सुविधा, रस्त्यांची व खड्ड्यांची अवस्था, ट्रॅफिक सिग्नल्स, त्यावर नियंत्रण करणारे हवालदार हे सगळे पाहिले असता, नागरी सुविधांची अत्यंत नियोजनबद्ध व काटेकोरपणे व्यवस्था करण्यात आल्याची प्रचिती येते. हाडांच्या डॉक्टरांचे व वाहनांच्या गॅरेजवाल्यांचे चांगलेच भले झालेले पाहावयास मिळते. ती मंडळी अत्यंत खुशीत आहे व एक मिनिटाचाही वेळ न दवडता काम करतात. या सर्व बाबी अत्यंत उत्साहवर्धक व हुरूप आणणा-या आहेत असाच औरंगाबादवासीयांचा मागील ३ ते ४ वर्षांचा अनुभव आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
रस्त्यांचा, वाहतुकीचा व सिग्नल्सचा अनुभव पाहता हा एक निश्चितच महाराष्टातील इतर शहरांपेक्षा वेगळा पॅटर्न ठरेल. हे नक्की. हा पॅटर्न अंगीकारताना महानगरपालिकेची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, असे दिसून येते. यात कॉलन्यांचे ले-आऊट मंजूर करतानाच कुठल्याही परिस्थितीत कोणताही चौक काटकोनात राहता कामा नये. अशा चौकात सिग्नल लावलाच तर कोणत्या बाजूस जाण्यासाठी कोणता बाण आहे व तो पिवळा आहे की लाल आहे हे समजता कामा नये, अशा रीतीने चोहीकडे सिग्नल्सची व्यवस्था करण्यात यावी, महानगरपालिकेने आपल्या स्वत:च्या फंडातील पैसा वापरून कोणतीच दुरुस्ती करू नये.
दुरुस्तीसाठी शासनाकडे सदोदित वाडगा घेऊन मागणी करावी, रस्त्यांच्या निविदा मंजूर करताना कुठल्याही परिस्थितीत एक वर्षापेक्षा जास्त दिवस हा रस्ता टिकता कामा नये याची खबरदारी घेण्यासाठी निविदेमध्ये अट घालण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत जर हा रस्ता झाल्यानंतर तो एक वर्षाच्या आत जर पूर्णपणे नादुरुस्त झाला नाही, तर कंत्राटदाराला जास्तीत जास्त दंड लावण्याची तरतूद करण्यात यावी, रस्ता मेंटेन करताना रस्ता थोडाही चांगला असता कामा नये याची खबरदारी घ्यावी. रस्ता चांगला आहे असा वाहनचालकाला दिलासा मिळतो तोच त्याला पुढील खड्डा लागण्याची तरतूद करण्यात यावी. तो खड्डा संपल्याबरोबर रस्त्यावर नाली खोदण्यास सांगावे. ती नालीही किमान गाडीचे टायर पंक्चर होण्याच्या खोलीची असावी. नाली ओलांडल्याबरोबर थोडासा वेग घेण्याचा प्रयत्न केल्याबरोबर तेथे अवाढव्य स्पीडब्रेकर असावे. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत वाहनाचलकाला २० कि.मी.पेक्षा जास्त स्पीडवर जाता येऊ नये याची तरतूद करण्यात यावी, रस्त्याची दुरुस्ती आणि मेंटेनन्स करताना चौकातील रस्ता कधीही दुरुस्त असता कामा नये. पारंपरिक रीतीने तेथे खड्डे असलेच पाहिजेत.
किमान चार-दोन वाहने वर्षाला त्या चौकात क्षतिग्रस्त झालीच पाहिजेत, अशा रीतीने चौकातील रस्ते मेंटेन करावेत. रस्ते दुरुस्त करताना किंवा मेंटेन करताना कोणत्याही कंत्राटदाराला व अभियंत्याला मेजरमेंट बुक लिहिण्याचे व ते ठेवण्याचे बंधन नसावे. तसेच रस्त्याच्या कामाचे पेमेंट करताना संबंधित कनिष्ठ अभियंता किंवा वरिष्ठांनी कधीही त्या रस्त्याचे इन्स्पेक्शन करता कामा नये. वरील सर्व गोष्टी अत्यंत कटाक्षाने पाळल्याने व वर्षानुवर्षे सातत्याने त्यांचा अवलंब केल्यामुळे औरंगाबाद शहराचे रस्ते राज्यात सर्वात सुंदर रस्ते आहेत, असे अभिप्राय स्थानिक नेत्यांनी दिल्याचे ऐकिवात आहे व ते अत्यंत रास्त आहे. शहरातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी व अधिका-यांनी हे पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले आहे, अशी कुणकुण ऐकण्यात आली आहे.
या रस्त्यांचा पॅटर्न पाहता, मुख्यमंत्री महोदयांनी हाच पॅटर्न राज्यातील इतर सर्व शहरांमध्ये लागू करावा, असा फतवा काढल्याचे कळते, असो. नगरसेवक आणि वरिष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्व गुत्तेदार, गल्लीतले पुढारी, महानगरपालिकेचे सर्व अभियंते या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन! शहरातील इमानदारीने कर देणा-या सर्व नागरिकांनी व वयोवृद्धांनी वरील सर्वांचा नागरी सत्कार आयोजित केला नाही ही त्यांची घोडचूक आहे, असे वाटते. त्यामध्ये शक्य झाले तर वृत्तपत्रे व मीडियाने सहभाग नोंदविल्यास अधिक चांगले होईल आणि या शहराचा लौकिक जसे की, ऐतिहासिक शहर, पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी इ. बिरुदे तर आहेतच; पण महाराष्टातील सर्वोत्कृष्ट नागरी सुविधा पुरविणारे शहर असा औरंगाबाद शहराचा लौकिक झालेला पाहून देशातील मोठमोठे उद्योगपती डीएमआयसीमध्ये व वेरूळ, अजिंठा येथे पर्यटक आकृष्ट होतील, अशी अपेक्षा करण्यास काय हरकत आहे?