भूमीज शिखरयुक्त शक्ती मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:56 PM2017-10-08T12:56:58+5:302017-10-08T12:59:10+5:30
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद जिल्ह्यातील लहानशा जागजी गावातील पूर्वमध्ययुगीन मंदिर जगजाई देवीशी जोडले आहे. जाकासुर नामक दैत्याचा वध करणारी जागजाई देवी हिला स्थानिक ग्रामस्थ महालक्ष्मीचे स्वरूप मानतात व कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी तिचा संबंध जोडतात. हे आडगावाचे मंदिर, मराठवाड्यातील धर्म, स्थापत्यरचना व कला विकासातला महत्त्वाचा टप्पा म्हणून याकडे बघता येते.
- साईली कौ. पलांडे-दातार
जागजीचे देवी मंदिर पश्चिमाभिमुख, उंच पीठावर व एका प्रशस्त पुष्करणीलगत बांधलेले आहे. आज आढळणारे गर्भगृह, अंतराळ व शिखर मूळचे यादव काळातील असून, पुढील सभामंडप हा नंतरच्या काळात अनंत नेणुदास यांनी बांधला, अशी आरतीत उल्लेखल्यानुसार नोंद मिळते. गाभा-याच्या विधान चौरस असून सप्तरथ आहे. तसेच, विटांनी बनलेले सातचमजले, भूमींचे भूमीज प्रकारचे शिखर आहे. ही वैशिष्ट्ये ‘सप्त रथ सप्त भूमीज प्रसादा’ची आहेत. पूर्वी शिखरावरचे आमलक व कलश पडले होते; पण काही वर्षांपूर्वी पुरातत्व खात्याने मूळ स्वरूपात आणण्यासाठी डागडुजी केली आहे. संपूर्ण चौकोनी तलविन्यासामध्ये चार पट्टे चैत्य गवाक्षाच्या आकाराच्या नासिकेत संपतात. शिखराच्या समोरील बाजूला असलेल्या शुकनास या भागात शिखरावरच एक मजला आहे. विटांचे हे शिखर पोकळ असून, माऊल्डेड विटांचे कमानयुक्त काम केले आहे. पूर्ण शिखरावर चुन्यात सुंदर नक्षी होती जी संवर्धन करताना परत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बाकी, मंदिरावर बाहेरून मूर्तिकाम नाही. सभामंडप चौरस असून, आडव्या घडीव दगडांचा आहे. त्याला दोन प्रवेशद्वारे आहेत व मूळ मंदिरालाही सभामंडपाबरोबर ३ मुखमंडप असण्याची शक्यता आहे.
सभामंडपातील खांब हे उत्तर यादवकालीन आहेत. छत हे समतल वितानाचे आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर शैव द्वारपाल आहेत, तर मंडपाची शाखा वैष्णव द्वारपालांची आहे. गर्भगृहात मधील चार खांबांमध्ये आज देवीची आसनस्थ मूर्ती बसवली आहे व तिच्या जोडीला पायापाशी गरुड आणि लक्ष्मी असलेली विष्णूची त्रिविक्रम (गदा, चक्र, पद्म , शंख) आहे. ही बहुधा पुष्करणीतील असावी. देवीची मूळ मूर्ती विलक्षण घाटदार असून, मुकुटामध्ये नरमुंड आहेत. डावीकडून हातात खड्ग, डमरू, त्रिशूळ, नरमुंड आणि कापाल आहे व बसलेल्या पीठावर नरमुंड आणि एडक्याचे तोंड कोरले आहे.
या सर्व लक्षणांवरून मूर्ती विशिष्ट प्रकारच्या भैरवीची वाटते व पूर्वीच्या काळात तिला बळी दिला जात असावा. दोन्ही मूर्ती सुबक व ठाशीव आहेत व कल्याणी चालुक्यशैलीचा प्रभाव जाणवतो. मूर्तीसमोर एका दगडी आसनावर कमलदलावर पादुका कोरल्या आहेत. जागजी येथे सर्वात महत्त्वपूर्ण शिल्पे आहेत, ते अंगणात ठेवलेले वतुर्ळाकार यंत्र अथवा चक्र! या वर्तुळाकाराच्या खाली दुस-या दगडावर बसवण्यासाठी एक खाच आहे, तसेच पाणी वाहून जाण्यासाठी मार्गही कोरलेला आहे. एका जाड वतुर्ळात पादुकासदृश शिल्पे असून, चार दिशांना प्रत्येकी दोनप्रमाणे २ देवतामूर्ती अशा ८ मूर्ती कोरल्या आहेत. ज्या निश्चित ओळखणे कठीण आहे. बाहेरील बाजूस देवतांबरोबर सिद्ध योगींच्या ९ मूर्ती अंकित आहेत. प्रथमदर्शी हे एखाद्या तांत्रिक पूजा विधीचे यंत्र वाटते. गाभा-यातील देवता आणि स्त्री-पुरुष योगी मूर्तीची संख्या पाहून हे संयुक्तिक वाटते. काही स्थानिकांच्या आणि ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पाठक यांच्या मते हे आकाशयंत्र आहे व ते मूळ मंदिराच्या शिखरावर ध्वजकाठीसारखे लावलेले असावे, तसेच फिरवता येत असावे. या कुतूहलजनक शिल्पयंत्राचे मूळ प्रयोजन काय हे अभ्यासणे गरजेचे आहे.
देवी मंदिरासमोरील पुष्करणीला लक्ष्मी बारव असून तो मंदिर समूहाचाच भाग आहे. या देखण्या बारावीला तीन बाजूंनी पाय-या उतरून प्रवेश आहे व ६ टप्प्यांत ती बांधली गेली आहे. दुस-या टप्प्यात प्रवेशाच्या ३ बाजूस प्रत्येकी २ व चारी बाजूस ४, असे २२ देवकोष्ठे आहेत. काही देवकोष्टांची शिखरे फांसना प्रकारची असून, काही नागर व भूमीज प्रकारची आहेत. उरलेल्या बाजूला मध्ये मंडपासारखी जागा आहे. जिथे आधी मूर्ती असाव्यात. आज देवकोष्ठांमध्ये विष्णूची २४ पैकी रूपे (विभव), मोरावरील कार्तिकेय, बटू भैरव, अनंत, कूर्म शिल्पे, सूर्य, गरुडारूढ लक्ष्मी नरसिंह, विविध योगी व योगिनी, महिषासुरमर्दिनी ही प्रमुख शिल्पे ठेवली आहेत. येथे सापडलेली बरीचशी शिल्पे आज औरंगाबाद येथील विद्यापीठ संग्रहालयात नेण्यात आली आहेत. बारवेच्या बाहेरील बाजूने योगी, योगिनी, विविध प्राणी, दम्पती, युद्ध शिल्पे, नक्षीयुक्त शिल्पपट, कोरलेले दिसतात. मंदिर परिसरात काही आसनपीठ, एक तीर्थंकराचे आसन, विरगळी, नंदी, शिवलिंगे, मध्ययुगीन समाध्या इत्यादी अवशेष विखुरलेले आहेत. अशा ऐतिहासिक मंदिराला सर्वांनीच जपले पाहिजे. हे नक्की.
(लेखिका पुरातत्वज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक आहेत.)