जन्म-मृत्यूचा फेरा : समाज काय म्हणेल, या भीतीच्या बेड्या अजूनही घट्टच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:58 PM2020-02-19T13:58:23+5:302020-02-19T14:04:44+5:30
कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही.
कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही.
शुभ-अशुभाच्या साखळ्या अजूनही लोकांच्या मनांत घट्ट रुतून बसल्या आहेत. दु:खद प्रसंग असल्याने त्यामध्ये कोण काही सुचवू, बदल करू म्हटले तर ते सहजासहजी शक्य होत नाही. यामध्ये समूहाची विशेषत: भावकीची मानसिकता महत्त्वाची असते. समाज काय म्हणेल, ही भीतीही या विधींमध्ये सगळ्यांत जास्त असते. निधनानंतर पार्थिवास घराच्या दारात आणून गरम पाण्याने अंघोळ घातली जाते. त्यावेळी पार्थिवाच्या डोक्यावर दही घातले जाते.
माणूस जन्माला आल्यावर त्याच्यावर पहिला संस्कार हा अंघोळीचाच असतो. तसाच त्याचा शेवटचा संस्कारही अंघोळीचा केला जातो. घरातून काही कार्यासाठी माणूस निघाला तर त्याच्या हातात दही-साखर दिली जाते. तसा तो इहलोकीची यात्रा संपवून परलोकीच्या यात्रेला निघाला म्हणून त्याच्या डोक्यावर दही घातले जाते.
दही हा पदार्थ गारवा देणारा असतो. इथे तो गारवा म्हणजे समाधान, शांतता या अर्थाने वापरला जातो. म्हणजे निधन झालेली व्यक्ती सुखासमाधानाने व शांततेने हे जग सोडून जात आहे, ही भावनाही त्यामागे आहे. पत्नी जिवंत असेल तर तिच्या मंगळसूत्रातील एक सोन्याचा मणी तोडून तो पार्थिवाच्या डोळ्यात घातला जातो.
ज्यांच्याशी लग्न केल्याने तुम्हांला सौभाग्यपण आले, त्यानेच तुमच्या गळ्यात लग्नात मंगळसूत्र घालून तुम्हांला आयुष्याची सोबती म्हणून वरले, तोच आता या जगातून निघून जात आहे. त्यामुळे तुमचे सौभाग्यपण त्याच्यासोबत जात आहे. त्याचे प्रतीक म्हणून हातातील बांगड्या फोडून व मंगळसूत्र तोडून त्यातील सोन्याचा मणी पार्थिवाच्या डोळ्यात घालण्याची प्रथा आहे. ती पत्नीला वैधव्य प्राप्त करून देणारी आहे. त्यातही मंगळसूत्रातील हळदी-कुंकवाच्या वाट्या असे ज्याला समजले जाते, असा मणी काढून तोच डोळ्यांत घातला जातो. म्हणजे छोट्या-छोट्या कृतींतूनही धार्मिक संस्कारांचा किती खोलवर विचार केला आहे, याचेच प्रत्यंतर येते. म्हणूनच तर या प्रथा व संस्कारांचा पगडा घट्ट आहे. तो हळूहळू किलकिला होत आहे.
अविवाहित तरुणाचे निधन झाले तर त्याच्यासाठी हा विधी नाही. खरे तर त्याचे निधनही तितकेच नव्हे तर जास्त दु:खदायक असते; कारण एक उमलणारे आयुष्य कोमेजून जाणारे असते. परंतु अशा तरुणाचे निधन झाल्यास त्याचे धार्मिक विधी मर्यादित आहेत. पूर्वी त्याला तिरडीवर बांधूनही नेले जात नव्हते. त्यामुळेच आपल्याकडे ज्याचे लग्न लांबले आहे, त्याला आजही चेष्टेने असे म्हटले जाते की, लेका, काहीतरी पुढे-मागे होऊन लग्न करून टाक, नाहीतर मेलास तर घोंगड्यातून न्यावे लागेल.
अंत्ययात्रा जेव्हा घरापासूून सुरू होते, तेव्हा हातात शितोळी घेऊन कुटुंबातीलच कोणीतरी व्यक्ती पुढे असते. मातीच्या भांड्यात भात किंवा जोंधळे असे तुमच्या घरी पिकलेले धान्य असते. कृषिसंस्कृतीत माहेरवाशीण असेल किंवा शेताकडे जाताना सोबत काहीतरी शिदोरी देण्याची पूर्वापार परंपरा आहे. शिदोरी देण्यामागेही एकमेकांकडील चांगल्या पदार्थांचे आदानप्रदान होण्याचा विचार असे. तोच विचार मृत्यूपर्यंत जोपासला गेला आहे.
माणूस मेला म्हणजे तो आता शेवटच्या प्रवासाला निघाला आहे. त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नये यासाठीच शिदोरी म्हणून सुपातूनही भात देण्याची प्रथा आहे. माहेरवाशिणीला गावाच्या वेशीपर्यंत घरातील कर्ती बाई सोडायला जात असे. तिथे उभे राहून ती तिला निरोप द्यायची. तसाच निरोप गावाच्या वेशीपर्यंत पार्थिवास दिला जातो. म्हणून भाताने भरलेले सूप म्हणजेच शिदोरी गावाच्या वेशीवर ठेवले जाते. तिथे शितोळी धरणारी व्यक्ती तोंडावर हात घेऊन शंखध्वनी करते. म्हणजे तो शेवटचा आक्रोश करतो. ज्याचे निधन झाले, त्याने घर सोडले, गाव सोडले व आता स्मशानात गेल्यावर तो हे जगच सोडून जाणार आहे. त्यासाठीचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी विविध प्रतीके वापरली जात असल्याचे आपल्याला दिसते.
निधन झालेल्या व्यक्तीचे पार्थिव जिथे ठेवलेले असते, तिथे पिठावर ज्योत लावून ठेवण्याची प्रथाही अनेक ठिकाणी आहे. त्या पिठावर जी पावले उमटतात, त्या योनीत त्या निधन झालेल्या व्यक्तीचा प्रवेश झाला, अशी समजूत आहे; परंतु तिला कोणताही शास्त्रीय आधार नाही. तरीही लोक चिमणीची पावले उमटली, अमूक पक्ष्याची पावले उमटली, अशी समजूत करून घेतात.
कुणीही पीठ पसरून ठेवले आणि काही वेळ ते तसेच राहू दिले तर वाऱ्याने किंवा पायांच्या हादऱ्याने त्यामध्ये विशिष्ट रेषा उमटतात. त्यावरून हा ठोकताळा बांधला जातो. जिथे माणसाचा मृत्यू होतो तिथे त्याचे आयुष्य थांबते. त्यानंतरच्या सगळ्या कथा, प्रथा, परंपरा या नंतर माणसाने त्या-त्या परिस्थितीत समाजाला वळण लावण्यासाठी, बांधून ठेवण्यासाठी केलेल्या आहेत. त्यांतील काही नक्कीच चांगल्या आहेत. जे चांगले आहे ते नक्कीच पुढे न्यायला हवे व जे टाकून द्यायला हवे, ते टाकूनच दिले पाहिजे, असेच सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
समाज बदलास अनुकूल
माझ्या भावाचे अपघाती निधन होऊन अजून बारावेही झालेले नाही. रक्षाविसर्जनादिवशी त्याचा नैवेद्य कावळ्याने शिवला नाही; त्यामुळे आमच्या घरी भेटायला येणाऱ्या महिला घरात आल्या की हा विषय काढतात. आमचे सांत्वन करण्यापेक्षा काहीतरी वाईट घडेल, अशी भीती घालतात. त्यामुळे मन सुन्न झाले होते. परंतु आज लोकमतमधील सदर वाचून मनाला थोडे बरे वाटले, अशी प्रतिक्रिया एक महिलेने लोकमतकडे व्यक्त केली.
लोकमतमध्ये गेल्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या जन्म-मृत्यूचा फेरा या सदरास वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी ७.५२ वाजल्यापासूनच वाचकांचे फोन सुरू झाले. ते दिवसभर सुरू होते. दिवसभरात ४८ हून अधिक वाचकांचे फोन आले आहेत. किमान १४ लोकांनी व्हॉट्स अॅपवर मेसेज पाठविले आहेत. या सर्वांचे मोबाईल नंबर मी नोंद करून घेतले आहेत. त्यांमध्ये कांही महिलांचाही समावेश आहे. या सर्वांच्या भावनांची या सदरात नक्कीच दखल घेतली जाणार आहे.
वाटंगी (ता. आजरा) पासून ते साळशी (ता. शाहूवाडी), शिरोळ, म्हसवे (ता. भुदरगड), यमगे (ता. कागल), कुडित्रे (ता. करवीर) यांसह आर.के. नगर, मंगळवार पेठ, साने गुरुजी वसाहत अशा विविध भागांतूनही अनेक लोकांचे फोन आले. हे बदल झाले पाहिजेत, असाच सर्वांचा प्रतिसाद होता. अनेकांनी त्यासंबंधीचे व्यक्तिगत अनुभव सांगितले.
गुजराती, मारवाडी, जैन, लिंगायत, कोळी अशा विविध समाजांतील लोकांनी त्यांच्या समाजात काय प्रथा आहेत, याबद्दलची माहिती दिली. विषय चांगला असेल तर तो लोकांना भावतो, याचा अनुभव पुन्हा आलाच; परंतु लोकमत लोकांमध्ये किती रुजला आहे, याचेही प्रत्यंतर यातून आले.
- विश्र्वास पाटील
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आहेत. संपर्क : ९७६३७२५२४४)