जन्म-मृत्यूचा फेरा : रक्षाविसर्जनादिवशीचे नैवेद्य जातात कोंडाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 02:51 PM2020-02-17T14:51:34+5:302020-02-17T15:11:24+5:30
कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन घडवून आणतो.
कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन घडवून आणतो.
कावळा शिवणे ही प्रथा अन्य धर्मियांमध्ये नाही. त्यामुळे व्यक्ती मृत्यूवेळी समाधानीही होती म्हणून कावळा शिवला असा जर तर्क मांडला जात असेल तर मग तो इतरांना का लागू होत नाही, याचा विचार करण्याची गरज आहे. व्यक्ती जिवंतपणी समाधानी राहणे याला जास्त महत्त्व आहे. मग ती जिवंतपणी समाधानी राहावी यासाठी कुटुंबीयांची जबाबदारी जास्त येते; परंतु त्याकडे फारसे लक्ष न देता मृत्यूनंतर त्याच्या समाधानाच्या चक्रात आपण अडकलो आहोत. त्यातूनच नैवेद्य ठेवण्याची प्रथा सुरू झाली.
हा नैवेद्य म्हणजे काय असतो? त्या व्यक्तीला जे काही आवडत होते, ते सगळे त्यामध्ये येते. या नैवेद्यात वरण-भात, दही-भातापासून ते अगदी चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, भडंग, फरसाण, खाजा, ब्रेड, बिस्किटांचे पुडे, भजी-पाव, फळे, बिडीबंडल, सिगारेट, चुना-तंबाखूची पुडी, मटण, मासे, उकडलेले अंडे, चिकन ६५, बिर्याणी, छोट्या बाटलीत दारू... असे अनेक पदार्थ ठेवले जातात. निधन झालेली महिला व्यक्ती वगळता इतरांच्या बहुतांश नैवेद्यात दारू असते; कारण प्रथेप्रमाणे तीदेखील आपल्या नैवेद्याचा भाग बनली आहे.
दहा गावचे दहा पाहुणे भल्या पहाटे उठून हा नैवेद्य करून केळीच्या पानांतून घेऊन येतात. एकदा नैवेद्य केला व घरातून तो हातात घेतला तर म्हणे तो खाली ठेवायचा नाही. तो थेट स्मशानभूमीत गेल्यावरच खाली ठेवायचा. खाली ठेवल्यावर तो अपवित्र होतो की त्या नैवेद्यामधील सत्त्व विरून जाते; तो का खाली ठेवायचा नाही, याचे कारण कोणीच सांगत नाही. हे नैवेद्याला ठेवलेले सर्व फळे व पदार्थ फोडून ठेवले जातात.
आलाच कावळा तर तो एखाद्या अंड्यावर चोच मारतो. त्याने एकदा चोच मारली की झाले आपले समाधान. मग त्या ठेवलेल्या नैवेद्याचे काय होते याचीशी आपले काही देणेघेणे नसते. एका रक्षाविसर्जनाला किमान सरासरी दहा ते पंधरा तरी नैवेद्य हमखास असतात. किमान पाव किलो धान्याचा हिशेब केला तर चार-पाच किलो शिजविलेल्या अन्नाची निव्वळ एका पूर्वीपासून चालत आलेली परंपरेच्या पायात नासाडी होते. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत तर फारच मनाला वेदनादायी चित्र पाहायला मिळाले. तिथे एकावेळी ३७ लोकांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. या आठवड्यात बुधवारी संकष्टी आल्याने त्या दिवशी रक्षाविसर्जन झाले नाही. गुरुवारी दुपारी प्रस्तुत प्रतिनिधीने स्मशानभूमीस भेट दिली तर सगळीकडे नैवेद्य पसरून पडले होते.
रक्षाविसर्जन झाल्यावर अन्य काही धार्मिक विधी केल्यावर हे नैवेद्य ठेवले जातात व नैवेद्य कावळ्याने शिवल्यावर नातेवाईक आपापल्या घरी निघून जातात. त्यानंतर हे नैवेद्य खाण्यासाठी कावळ्यांची झुंबड उडते. त्यामुळे कावळे हे सगळे नैवेद्य पायाने पसरवून टाकतात. हे सगळे नैवेद्य स्मशानभूमीतील महापालिकेचे कर्मचारी एकत्र करतात. ते पूर्वी कचरापेटीत टाकले जात होते; परंतु आता अलीकडील काही दिवसांत ते कचरागाडीतूनच एकत्रित करून झूम प्रकल्पामध्ये नेऊन ओला कचरा म्हणून टाकून दिले जातात.
परवाच्या गुरुवारी तर एकाच दिवशी रक्षाविसर्जनाचे तब्बल २३ विधी होते. त्यामुळे तेवढे नैवेद्य ठेवले होते. एक छोटा टेम्पो भरेल एवढे अन्न गोळा झाले होते आणि ते सर्व कचरा म्हणून फेकून देण्यात येत होते. तेथील कर्मचारीही त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत होते; परंतु ते फेकून देण्याशिवाय त्यांच्यापुढेही अन्य दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हे नैवेद्य गोळा करून नेणारे किंवा तिथे खाणारे चार-पाच लोक आहेत; परंतु ते जोपर्यंत स्मशानभूमीतील सर्व लोक जात नाहीत, तोपर्यंत ते तिथे येत नाहीत.
ठेवलेला नैवेद्य आपण घेतला तर लोक आपल्याला मारहाण करतील, अशी भीती त्यांना वाटते. सर्व माणसे निघून जाईपर्यंत कावळे अन्नाची नासाडी करतात. नैवेद्यामध्ये सर्वांत जास्त भात असतो. मोठ्या पांढऱ्या धडप्यातून लोक नैवेद्य म्हणून हा शिजविलेला भात आणून ठेवतात. एखादे फळ असेल तर ते धुऊन खायला घेता येते; परंतु कावळ्यांनी पायांनी पसरलेला भात गोळा करून खायला घेता येत नाही. त्यामुळे या भाताची निव्वळ नासाडी आणि नासाडीच होते. त्याचा विचार आपण एक सजग माणूस म्हणून कधी करणार आहोत, हा खरा प्रश्न आहे.
भुकेलेल्यांना अन्न घालण्यात देवत्व
कोल्हापूर शहरात सरासरी तासाला एक अंत्यसंस्कार होतो. जिल्ह्यात सुमारे दीड हजार गावे आहेत. कोल्हापूर शहर, नगरपालिकांची शहरे व गावे यांतील वर्षाला होणारे अंत्यसंस्कार व त्यास पाच किलो हे प्रमाण ताडून पाहिले तर त्यातून शेकडो टन अन्नाची नासाडी होते, याचा अंदाज बांधता येईल. त्यामुळे खरे तर ही नैवेद्य ठेवण्याची प्रथा पूर्ण बंद व्हायला हवी. त्याऐवजी भुकेलेल्याला किंवा एखाद्या चांगल्या संस्थेला निधन झालेल्या व्यक्तीच्या आठवणीदाखल तुम्ही वर्षाला अन्नदान करू शकता. त्यातून जे समाधान मिळेल ते नदीवर नासाडी झालेल्या अन्नापेक्षा कधीही जास्त कारणी लागलेले असेल.
रक्षाविसर्जनादिवशी पै-पाहुण्यांनी भेटण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी जरूर यावे. नदीवर जाऊन सगळी राख एकत्र गोळा करावी. ती पोत्यात भरून आपापल्या शेतात नेऊन सर्वत्र पसरावी. म्हणजे आपल्या व्यक्तीच्या शरीराचा अंश त्या राखेच्या निमित्ताने आपल्याच शेतात कायमस्वरूपी विसावू शकेल. त्यासाठी अन्य कोणताही मंत्र, विधी, नैवेद्य, मुहूर्त या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजेत. मी हा जो विचार मांडत आहे, तो काहींना भावना दुखावणारा वाटेल; परंतु तसा विचार करणे व त्यानुसार व्यवहार करणे ही आजच्या समाजाची गरज आहे.
- विश्र्वास पाटील
(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आहेत. संपर्क : ९७६३७२५२४४)