जन्म-मृत्यूचा फेरा : सडोलीमध्ये पडले बदलाचे पहिले पाऊल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 10:59 AM2020-03-10T10:59:40+5:302020-03-10T11:08:39+5:30
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले.
व्यक्तीचे निधन झाल्यानंतर आपल्या समाजात त्यासंबंधी असलेल्या विविध परंपरा, चालत आलेल्या रूढी यांच्याबाबत ‘लोकमत’मध्ये जानेवारीपासून सुरू असलेल्या या सदराला लोकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकमत’ या सदरातून मांडत असलेली भूमिका लोकांनाही भावत आहे.
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले.
त्याचे झाले असे, गेल्या सोमवारच्या अंकात या सदरात रक्षाविसर्जनानंतर जे नैवेद्य ठेवले जातात, त्याचे पुढे काय होते.. हे मांडले होते. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत ठेवले जाणारे नैवेद्य स्मशानभूमीची स्वच्छता करणारे कर्मचारी गोळा करून ते झूम कचरा प्रकल्पात नेऊन टाकतात; कारण त्यांना त्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. या नैवेद्यांचे काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढेही आहे.
ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी हाच प्रश्न आहे. शिरोळसारखा एखादा तालुका घेतला तर तिथे ५५ गावे आहेत. त्यांपैकी किमान २० गावांत एकाचे रोज निधन होते, असे विचारात घेतले आणि एका निधनाला किमान दहा नैवेद्य असे गणित मांडले तरी रोज किमान २०० नैवेद्य नदीत सोडले जातात. त्यातून नदीचे होणारे प्रदूषण हा प्रश्न तर गंभीर आहेच; परंतु अन्न किती वाया जाते, हा जास्त वेदना देणारा प्रश्न आहे.
जुन्या कर्मकांडात अडकून पडल्याने आपणच आपले कसे नुकसान करतो आहोत, याचेच हे उत्तम उदाहरण आहे. ते रोज आपण सारेच अनुभवतो; परंतु त्यात बदल करायला हवा, असे कुणाला वाटत नाही. आता हे थांबायलाच हवे.
नैवेद्याची नासाडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ती टाळण्यासाठी राज्यातील अनेक शहरांत काही चांगले पर्याय पुढे आले आहेत; परंतु मूळ लोकांची मानसिकता बदलण्याची जास्त आवश्यकता आहे. बदल झाला पाहिजे, असे अनेक लोकांना वाटते; परंतु त्याची सुरुवात कुणापासून होणार, याचीच ते वाट पाहतात, असे सार्वजनिक चित्र दिसते.
नवी पिढी जुन्या काही प्रथा-परंपरांबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. मात्र, ज्येष्ठ मंडळींपुढे त्यांचे काही चालत नाही, असे अनुभव अनेक ठिकाणी आहेत. करवीर तालुक्यातील सडोली खालसा गावातील अनुभवही तसाच आहे. भोगावती नदीच्या काठावर वसलेले, दोन आजी-माजी आमदारांचे आणि एकेकाळी डोझर व्यवसायात दबदबा निर्माण केलेले हे समृद्ध गाव. या गावातील मनोज महादेव पाटील यांच्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकल्याचे हृदयाच्या दोन्ही झडपा खराब झाल्यामुळे रविवारी निधन झाले. त्याचे रक्षाविसर्जन सोमवारी झाले.
भावकी मोठी असल्याने त्यांनी रक्षाविसर्जनासाठी आलेल्या लोकांसाठी जेवणही जास्त केले होते; परंतु शंभराहून जास्त लोकांना पुरेल इतके जेवण शिल्लक राहिले. आपल्याकडे रक्षाविसर्जनादिवशी किंवा बाराव्या दिवशी जेवण शिल्लक राहिले, तर ते कुणाला खाऊ घालण्याऐवजी नदीत सोडण्याची प्रथा आहे. हे दोन्ही दु:खद प्रसंगांचे विधी समजले जातात. त्यामुळे अशा प्रसंगांत शिजविलेले अन्न दुसऱ्यांना कसे द्यायचे, अशी मानसिकता त्यामागे असते. त्यामुळे भांडी भरून हे जेवण नदीत सोडले जाते.
सडोलीमध्येही जेवण शिल्लक राहिले आहे म्हटल्यावर गावातील ज्येष्ठ चार-दोन लोकांनी ते भांड्यात भरून भोगावती नदीत सोडून यावे, असे सुचविले. गावातील काही तरुणांनी त्याच दिवशी ‘लोकमत’मधील सदरातून ‘नैवेद्य कसे कोंडाळ्यात जातात,’ यासंबंधी वाचले होते. आपण जेवणाची किती नासाडी करतो, हे वाचून ते अस्वस्थ होते. त्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकांना जरा थांबा, अशी विनंती केली.
‘लोकमत’ मागवून घेतला व त्यातील ‘जन्म-मृत्यूचा फेरा’ हे सदर वाचून दाखविले. ‘आता काय करायचे ते सांगा, त्यानुसार करूया... शिल्लक राहिलेले जेवण आम्ही रात्री खातो. तसे केल्याने काय होते हे एकदा बघूयाच...’ असे सांगितल्यावर त्या ज्येष्ठांचेही मतपरिवर्तन झाले. त्यांनी जेवण नदीत सोडण्याचा निर्णय बदलला आणि आपणच रात्री ते खायचे असे ठरविले. त्यानुसार ते शंभराहून जास्त लोकांना पुरेल एवढे जेवण ज्यांचे निधन झाले त्या पाटील भावकीतील लोकांनी गावातील इतर लोकांसमवेत खाल्ले.
कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या एका प्रथेला मूठमाती मिळाली. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. असा चांगल्या कामासाठी नव्या पिढीने पुढाकार घेण्याची गरज आहे. तो घेतला तर अंत्यसंस्कार, रक्षाविसर्जन, बारावे अशा विधींतील अनेक प्रथा बंद होण्यास मदत होईल. गरज आहे ती फक्त पुढाकार घेण्याची... त्याची सुरुवात तर झाली आहेच...
अन्नाची नासाडी टाळूया... गरिबांची भूक भागवूया...
कोल्हापुरात नवीन पिढी विविध सामाजिक कामांत अतिशय झोकून देऊन चांगले काम करीत आहे. क्षेत्र कोणतेही असो; लोकांना काही मदत हवी आहे आणि कोल्हापूरकर त्याच्या मदतीला धावला नाही, असे कधी होत नाही. असेच कार्य मंगळवार पेठेतील प्रशांत मंडलिक हे करीत आहेत. मुख्यत: माणसाच्या मृत्यूनंतर तेरा दिवसांत होणारी अन्नाची नासाडी टाळावी यासाठी ते धडपड करीत आहेत. ज्यांच्या घरी निधन झाले आहे, त्यांना आधार द्यावा म्हणून नातेवाईक त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊन येतात.
भावकीतील लोक जेवायला एकत्रित येतात. ग्रामीण भागात भावकीतील लोक प्रत्येकजण स्वत:च्या घरातून ताट भरून जेवण घेऊन जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरातून आलेले हे जेवण मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहते.
असे जेवण असेल किंवा रक्षाविसर्जन व बाराव्याच्या विधीनंतर जेवण शिल्लक राहिल्यास तुम्ही प्रशांत मंडलिक यांना (मोबाईल : ७३८५७९७९००) या क्रमांकावर एक फोन करा... ते येऊन ते जेवण घेऊन जातात आणि जे खरोखर गरजू, भुकेले आहेत, त्यांच्या मुखात घालण्याचे मानवतेचे काम ते गेली अनेक वर्षे करीत आहेत. अन्नाची नासाडी टाळूया व गरिबांची भूक भागवूया यासाठीच त्यांचा सगळा आटापिटा आहे. मंडलिक हे काम सध्या कोल्हापूर शहरमर्यादित करीत आहेत.
‘लोकमत हॅलो’मधील १० फेब्रुवारी २०२० मधील विश्र्वास पाटील यांचा लेख आवडला. अजून किती वर्षे आपण रक्षाविसर्जनादिवशी कावळ्याने नैवेद्य शिवायची वाट पाहायची, याचा विचार समाजाने केला पाहिजे. माणूस जिवंत असताना आपण त्याला आवडेल ते खायला देत नाही; परंतु मेल्यानंतर मात्र पाच-पंचवीस पदार्थ ठेवून त्याला कावळ्याने शिवायची वाट पाहत बसतो.
-विश्र्वास पाटील
कावळा हा हुशार पक्षी आहे. त्याला जे आवडते तेच तो खातो. तो कधीच तेलकट पदार्थ खात नाही. तुमच्या बिडी-काडीला चोच लावत नाही; कारण ते त्याचे अन्न नाही. व्यसने माणसाला आहेत, ती प्राणी-पक्ष्यांना थोडीच आहेत का...? कावळ्याला माहीत आहे की, स्मशानभूमीत येणारे लोक आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. त्यामुळे माणसांच्या गर्दीतूनही तो अन्नाला शिवतो. नैवेद्य शिवला तर मेलेल्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, असा निष्कर्ष आपण काढतो; परंतु कावळा अनेकदा नैवेद्य शिवत नाही. त्याने धान्य, नदीतील मासे खाल्ले असतील तर तो अन्न खाणार नाही; कारण पोट भरल्यावरही खाण्याची प्रवृत्ती निसर्गात फक्त माणसांतच आहे. त्यामुळे नैवेद्य शिवण्यासारख्या अंधश्रद्धेने जखडलेल्या प्रथा आपण विज्ञानयुगात मागे टाकून दिल्या पाहिजेत.
- खंडेराव शं. हेरवाडे
शिरोळ