जन्म-मृत्यूचा फेरा : प्रथा पाळण्यासाठी उधळपट्टी; पण अंत्यसंस्कार मात्र मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:43 PM2020-03-12T15:43:50+5:302020-03-12T16:06:31+5:30
जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो.
जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो. कोणत्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार मोफत करणारी कोल्हापूर ही राज्यातील तरी एकमेव महापालिका असावी.
कोल्हापुरात पंचगंगा, कसबा बावडा, बापट कॅम्प आणि कदमवाडी अशा चार ठिकाणी स्मशानभूमी आहेत. पंचगंगा स्मशानभूमीत एका वेळेला ४६, बावड्यात १४ आणि अन्य दोन ठिकाणी प्रत्येकी सहा लोकांवर एकावेळी अंत्यसंस्कार होतात.
एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ४५० शेणी व तीन मण लाकूड लागते. शेणी व लाकडांसाठी महापालिकेला एका व्यक्तीसाठी सरासरी दीड हजार रुपये खर्च पडतो. त्याशिवाय मृताचे साहित्य म्हणून जे कुटुंबाकडून आणले जाते, त्यासाठी सरासरी दीड हजार रुपये खर्च केले जातात.
महापालिका वर्षाला शेणी व लाकडांवर सुमारे ३० लाखांहून अधिक रक्कम खर्च करते. या चारही स्मशानभूमींमध्ये ३६ लोक तीन पाळ्यांमध्ये दिवसरात्र काम करतात. त्यांच्या पगारासह वर्षाचा खर्च किमान एक कोटीच्या वर जातो. महापालिकेकडे देणगी पेटी व प्रत्यक्ष पावत्यांच्या माध्यमातून कसेबसे सहा ते सात लाख रुपये जमा होतात.
रक्षाविसर्जन असो की बाराव्याचा विधी; त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करणारा समाज अंत्यसंस्कारांसाठी मात्र ते मोफत मिळतात म्हणून एक रुपयाही खर्च करण्याची मानसिकता ठेवत नाही हे दुर्दैवी आहे. म्हणजे जी गोष्ट आवर्जून करायला हवी त्याकडे दुर्लक्ष आणि जी करायला नको, त्यावर मात्र पैशांची उधळपट्टी असा हा व्यवहार आहे.
समाजानेच तो योग्य आहे का, याचा विचार करायला हवा. महापालिकेने केले म्हणजे काय बिघडले? अशीही लोकांची त्यामागील मानसिकता असते. या महापालिकेने ती आपली नागरी व्यवस्थेतील महत्त्वाची जबाबदारी म्हणून सांभाळली आहेच; परंतु ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, घरी चार-चार गाड्या आहेत, रोजच्या जगण्यात हॉटेलिंगवरचा खर्चही लोक हजारांत करतात आणि कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तेही पाच-पंचवीस वर्षांतून एकदा, मात्र पाचशे-हजार रुपये स्मशानभूमीसाठी आपण द्यावेत, असे लोकांना वाटत नाही किंवा अशी रक्कम तिथे दिली तर चालू शकते, याचीही जाणीव अनेक लोकांना नसते.
आपण अन्य अनेक प्रथा-परंपरा जशा पाळतो, तशी यामध्ये का एखादी स्वत:हून पैसे देऊन अंत्यसंस्कार करण्याची प्रथा सुरू करीत नाही, हेच आश्चर्य आहे. मोफत अंत्यसंस्कार केले तर नैवेद्य शिवला जात नाही, असे कुणीतरी जोडले तर मग लोकांमध्ये निधी द्यायला ईर्ष्या लागेल.
कोल्हापूर महापालिकेतर्फे सुरू असलेले मोफत अंत्यसंस्कारांचे काम हे मानवतेचे आहे. त्या कामाला बळ दिले पाहिजे म्हणून रोनित अमोल लाहोटी हे प्रत्येक महिन्याला ५०० रुपयांची पावती करतात. ते शिवाजी पार्कात राहतात. शिरोली औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात.
दरमहा पगार झाला की ते थेट स्मशानभूमीत येतात आणि पावती करूनच मग पगार स्वत:साठी वापरायला सुरुवात करतात. व्रत म्हणून त्यांनी हे अंगीकारले आहे. एलआयसीमध्ये नोकरी करणारे प्रशांत कुलकर्णी हे दरमहा किमान अडीच ते तीन हजार रुपयांची पावती स्वत: येऊन करून जातात. त्यांनाही आपल्या मिळकतीतील काही रक्कम या सेवाभावी कामासाठी कारणी लागावी, असे वाटते.
महाप्रसादासाठी काय सारेच मदत देतात; परंतु अशा कामाला दिलेली मदत ही लोकांच्या अंतिम क्रि येसाठी लावलेला हातभार, असा विचार त्यामागे असतो. याशिवाय आपण कुणाच्याही अंत्यविधी किंवा रक्षाविसर्जनाला स्मशानभूमीत गेल्यास किमान १०० रुपयांची पावती केल्याशिवाय घरी परतायचे नाही, असा नंदकुमार मराठे व शिवशाहीर राजू राऊत यांचा शिरस्ता आहे.
गेली अनेक वर्षे त्यांनी त्यात खंड पडू दिलेला नाही. तुमच्या-माझ्यासारख्या शेकडो लोकांना हे करणे शक्य आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला व रक्षाविसर्जनाला सरासरी किमान १५० तरी लोक उपस्थित असतात. त्यांनी घरी जाताना खिशातील दहा रुपयांची एक नोट जरी देणगी पेटीत टाकली, तरी त्यातून वर्षाचा खर्च निघेल, एवढा निधी उभा राहू शकतो.
माणसांतील भुते...
अमावास्या असेल तर स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. तो काटा भूतपिशाच्च काहीतरी करील म्हणून नक्कीच नसतो; कारण त्यांना त्याची भीती वाटत नाही. त्यांना जास्त भीती माणसांतील भुतांची वाटते. त्यादिवशी काहीजण पेटत्या सरणामध्ये लिंबूमध्ये टाचण्या, सुया खोचून त्यावर कुंकू आणून टाकतात. सरणामध्ये दहीभाताचा नैवेद्य टाकण्याचेही प्रमाण आहे. त्यामुळे अमावास्येदिवशी या कर्मचाऱ्यांना स्मशानभूमीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पहारा द्यावा लागतो.
कुणीतरी मांत्रिक लोकांना अमावास्येला अमुकतमुक करा म्हणजे तुमच्यामागची पीडा कमी होईल असे सांगतो. लोकही तेवढेच मनात घेतात आणि स्वत:च्या वागण्यात काही बदल करण्यापेक्षा पेटत्या सरणामध्ये अशा काही गोष्टी आणून टाकण्यात आनंद मानतात.
रक्षाविसर्जन करताना लोकांना चुकून असे काही हाताला लागले तर त्यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते; कारण रक्षाविसर्जन हादेखील अत्यंत भावनिक विधी असतो. त्यामध्ये सुया-बिब्बे आले कुठून, अशी नवीनच भानगड मागे लागू शकते. म्हणून आम्ही त्या दिवशी डोळ्यांत तेल घालून जागरूक असतो, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
जन्म-मृत्यूचा फेरा या सदराबद्दल महासंघाकडेही अनेक तरुण मुलांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या समाजाने या गोष्टींमध्ये बदल केला पाहिजे, असा नव्या पिढीचा आग्रह आहे. आम्ही महासंघातर्फे सोशल मीडियावरही ही माहिती मोठ्या प्रमाणावर शेअर करीत आहोत; परंतु त्याशिवाय रक्षाविसर्जन तिसऱ्यां दिवशीच करा, बाराव्याच्या विधीचा कालावधी कमी करा, कुुटुंबातील एकानेच फक्त नैवेद्य आणा... अन्नाची नासाडी करू नका... अंधश्रद्धा, जुन्या कालबा' प्रथा-परंपरा मागे टाका, अशा स्वरूपाचे फलक कोल्हापूर शहरातील चारीही स्मशानभूमींत लावण्यात येतील.
वसंत मुळीक,
राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ
कावळा लवकर शिवतो म्हणून...
कुठली जागा अगोदर धरली तर आपल्याला एखादा कार्यक्रम चांगला बघायला मिळतो किंवा लग्नात भोजन कक्षाजवळच उभे राहणारे काहीजण असतात. शेवटच्या अक्षता पडण्यापूर्वीच ते धावत जाऊन खुर्च्या पकडतात. तसेच काहीसाअंत्यसंस्कारांसाठी बेड मिळवितानाही काहींचा प्रयत्न असतो. गेल्या वेळेल्या आमच्या नातेवाइकाचे अमुक बेडवर अंत्यसंस्कार केले होते, तिकडे जरा कावळा लवकर शिवतो, त्यामुळे अमुकच बेड आम्हांला द्या, असा आग्रह करणारेही लोक आहेत.
मराठा महासंघ फलक लावणार
मराठा समाजातील विविध अनिष्ट प्रथांबाबत लोकमतमधून सुरू असलेले प्रबोधन समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. या समाजाने अनेक बाबतींत जुन्या प्रथा-परंपरेच्या बेड्या काढून टाकण्याची गरज आहे. त्यासाठीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी सांगितले.
-विश्र्वास पाटील