दशावतार : ८00 वर्षांचा ठेवा

By सचिन खुटवळकर | Published: April 1, 2019 11:18 PM2019-04-01T23:18:12+5:302019-04-01T23:21:49+5:30

कोकणातील दशावतारी कला आज सातासमुद्रापार पोहोचली असली, तरी या कलेला आठशे वर्षांची परंपरा आहे. अनेक आव्हाने पचवून ही कला जुन्याजाणत्या कलाकारांनी टिकवून ठेवली. पारंपरिक बाज जपून ठेवताना साचेबद्धतेला छेद देत हल्लीचे कलाकार नावीन्याच्या आविष्कारासाठी झटत असतात. दशावताराची पार्श्वभूमी इतकी रोचक आहे की, लिहिताना शब्द कमी पडावेत. या कला प्रकाराचा वेध घेण्याचा प्रयत्न...

Dashavatar : Keep 800 years old | दशावतार : ८00 वर्षांचा ठेवा

दशावतार क्षेत्रातील तरुण कलाकार प्रेक्षकांत प्रचंड लोकप्रिय आहेत.

गारठलेल्या मध्यरात्री मंदिराच्या प्राकारात हार्मोनियमचे सूर उमटले, पखवाजावर थाप पडली व झांजेने ताल धरला की दशावतारप्रेमींच्या हृदयातील तारा झंकारतात आणि रंगमंचावर प्रतिसृष्टी अवतरते. मध्यभागी एक बाकडे, त्याच्या मागे एकच पडदा व समोर मोजकेच माइक, बल्ब इतकाच काय तो नेपथ्याचा सरंजाम. मग गणपती, सरस्वती, ब्राह्मण, ब्रह्मदेव, शंखासुर व महाविष्णू येतात. याला ‘आड-दशावतार’ म्हणतात. त्यानंतर नाटक स्वरूपात ‘आख्यान’ होते व पहाटे दहीकाल्याने समाप्ती. ‘दशावतारी जत्रा’ म्हणतात ती हीच.
पारंपरिक दशावतार नाट्यकलेचा हा ठेवा ८00 वर्षे जुना आहे. कर्नाटकातील गोरे कुटुंबीयांनी दैवी संकेताच्या आधारे मजल दरमजल करत कोकणात येउन दशावतारी नाट्यकला रुजवली. या गोरे कुटुंबाचा वारसा बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे आज चालवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दशावतारी कंपनीचा ‘पेटारा’ ही कलाकारांसाठी संवेदनशील गोष्ट. यात कलेचे दैवत गणेशाचा मुखवटा, दशावतारी नाटकासाठी लागणाऱ्या तलवारी, गदा, इतर शस्त्रे, विणा, मयूर, नागाची प्रतिमा वगैरे असतात. रंगभूषा, वेशभूषेसाठी जिथे या कलाकारांचा डेरा असतो तिथे हा पेटारा लावला जातो. प्रत्येक कलाकार प्रथम त्या पेटाऱ्यातील गणेशाला मनोभावे शरण जाउन मगच आपली कला सादर करण्यासाठी रंगमंचावर जात असतो. या पेटाऱ्याशी निगडीत अनेक दंतकथा, अनुभव दशावतार वर्तुळात चर्चिल्या जातात. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या कलाकाराला आधी त्या पेटाऱ्याचे पावित्र्य व त्या संदर्भात घ्यावयाची काळजी याचे मार्गदर्शन केले जाते. श्री दत्तात्रेयांची ‘नवल गुरूरायाची...’ ही पारंपरिक दशावतारी आरती म्हटल्याशिवाय पात्रे रंगमंचाकडे फिरकत नाहीत.
ग्रामदैवतांचा वार्षिक उत्सव म्हणजे जत्रा. जत्रेला ‘कालो’ किंवा ‘धयकालो’ असेही म्हटले जाते. सुरुवातीच्या काळात गावोगावी जत्रा करण्यासाठी कलाकार पायपीट करायचे. ‘रात्री राजा व सकाळी डोक्यावर बोजा’ अशी स्थिती होती. स्वत:च्या पात्रासाठी लागणारी वस्त्रे, अलंकार व वस्तू एका ट्रंकेत भरून हे कलाकार एका गावातून दुसऱ्या गावात जात असत. केवळ लोकाश्रयावर ही कला टिकून होती. कलाकारांना अर्थप्राप्तीची अपेक्षा नव्हती. कलेच्या पुण्याईवर उदरभरण करणे हेच लक्ष्य होते. ही स्थिती ९0च्या दशकापर्यंत होती. शक्य होईल तिथे टेम्पो, बसच्या माध्यमातून प्रवास होत असे. मात्र अनेक दुर्गम गावांत पायी जावे लागत असे. नंतर रस्ते आले, वाहतुकीची साधने आली, दशावतारी कलाकारांची पायपीट थांबली. पण सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या कलाकारांवर लक्ष्मी मात्र प्रसन्न होत नव्हती. जत्रा करण्याच्या बदल्यात जी रक्कम गावकरी कंपनीला द्यायचे ती अगदीच तुटपुंजी होती. त्यातून खर्च वगळता अगदीच किरकोळ रक्कम शिल्लक राहत असे. तरीही मोठे कष्ट उपसून, प्रतिकूल स्थितीशी दोन हात करून कलाकारांनी दशावतारी कला जिवंत ठेवली व पुढच्या पिढीकडे सक्षमपणे सुपूर्द केली.
ज्या गावात जत्रा असते, त्या गावाशी दशावतारी कंपनीचा अलिखित ‘करार’ असतो. जत्रंची तारीख, तिथी कळविण्यासाठी कंपनीतर्फे गावकºयांना पत्र पाठविण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत कायम आहे. जिथे जत्रा असेल, त्या गावातर्फे कलाकरांच्या भोजनाचीही व्यवस्था केली जाते. याला ‘शिधा’ असे म्हणतात.
लिखित संहिता नसतानाही केवळ पुराणे व इतर संदर्भ ग्रंथांच्या वाचनातून मिळविलेली माहिती, गायन कौशल्य व भाषाप्रभुत्वच्या जोरावर कलाकारांनी आजतागायत दशावताराची सेवा केली. ज्या ‘आख्याना’वर आधारित नाटक करायचे आहे, त्यातील पात्रे, प्रसंग, गाणी या संदर्भात मोजकीच चर्चा करून थेट रंगभूमीवर नाटक सादर करण्याची कुवत हे कलाकार राखून असतात. अर्थात, अलीकडच्या काळात व्यावसायिक उद्दिष्ट्ये समोर ठेवून काही प्रमाणात लिखित संहिता व तालमी करण्याची पद्धत रूढ झाल्यामुळे दशावतारी नाटके अधिक आटोपशीर, सकस व दर्जेदार बनली आहेत. स्मार्टफोनच्या जमान्यात मनोरंजनाची शेकडो साधने हातात असतानाही त्यांना पुरुन उरत दशावताराने आपला दबदबा कायम राखला आहे.

दशावतारी मंडळाची असते ‘कंपनी’...
‘कंपनी’ म्हणजे कलाकारांचा संच. एका कंपनीत कलाकर व साहाय्यक मिळून सुमारे १५ पुरुष असतात. रात्रीची नाटके व गावोगावी भटकंती करण्यावाचून पर्याय नसल्यामुळे स्त्रियांना हे क्षेत्र खुले झाले नाही. परिणामी स्त्रीची भूमिका पुरुष कलावंताला करावी लागते. गोव्याचे सूर्यकांत राणे, कोकणचे बालगंधर्व ओमप्रकाश चव्हाण, प्रशांत मेस्त्री, सुधीर तांडेल, बंटी कांबळी, गौतम केरकर, विजय झोरे, निळकंठ सावंत या जुन्या-नव्या कलाकारांची नावे स्त्री भूमिकेसाठी कोकणात आदराने घेतली जातात. उत्तम रंगभूषा, साजेशी वेशभूषा, आवाजातील मार्दव व भूमिकेशी तादात्म्य होण्याची लकब यामुळे हा पुरुष आहे की स्त्री हे नवख्या प्रेक्षकाला ओळखता येणे अशक्य. गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग व उत्तर गोव्यातील काही महिला कलाकरांनी पुढाकार घेउन पूर्ण स्त्री संचात दशावतारी नाट्यप्रयोग करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यावरून स्त्री वर्गावरही या कलेचे गारूड किती आहे, याची प्रचिती येते.

आठ भावांनी केले दशावताराचे बीजारोपण
आठशे वर्षांपूर्वीची गोष्ट. कर्नाटकातील गोरे नामक ब्राह्मण कुटुंबातील सदस्यांना मिळालेल्या दैवी दृष्टांतानुसार त्यांनी रामायण-महाभारत ग्रंथांतील प्रसंगांचा गावोगावी प्रसार करून भक्तीमार्गाचा महिमा वाढवावा, असे ठरविले. या कुटुंबात आठ बंधू होते. केशव, माधव, मुकुंद, मुरारी, हरी, राम, कृष्ण, गोविंद या भावांनी दैवी संकेत पाळण्याच्या उद्देशाने स्वस्थानाचा त्याग केला. तेथून ते गाणगापूर येथे दाखल झाले. मात्र त्यांना पुरेसा प्रतिसाद लाभला नाही. तेथून ते पंढरपुरात गेले. मात्र तिथे काही प्रवृत्तींनी या अष्टबंधूंना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे बंधू विवंचनेत पडले असता, त्यांना पुनश्च दृष्टांत झाला. तो असा की, या बंधूंनी पंढरपुराचा त्याग करून परशुरामभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात जावे आणि आपल्या ज्ञानाच्या जोरावर भक्तीमार्गाचे तेज वाढवावे. या दैवयोगाला अनुसरून या बंधूंनी कोकणात जावे असे ठरविले. तळकोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात वालावल येथे ते दाखल झाले व तेथेच त्यांनी निवास केला. स्थानिकांच्या सहकार्याने रामायण महाभारतातील बोधप्रद संदर्भ घेउन त्यांनी पात्ररचना केली व त्या आधारे समाजात भक्तीमार्गाच्या प्रसाराबरोबरच प्रबोधनाचे कार्यही केले.
अर्थात, कलाप्रिय कोकणवासीयांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी अल्पावधीतच आपला दबदबा कला क्षेत्रात निर्माण केला. संगीतप्रधान नाट्यछटांची गोडी सर्वसामान्यांना लागली. नाट्यप्रयोगांची मागणी वाढू लागली. गोव्याच्या उत्तरेकडील भागातही दशावतारी जत्रांचे सादरीकरण होऊ लागले. परकीय आक्रमणे, शिवकालीन धामधुमीतही या कलेचे तेज वाढत गेले. वर्षामागून वर्षे गेली आणि गोरे कुटुंबीय कोकणच्या सांस्कृतिक संचिताचा एक भाग बनले. कुटुंबविस्तार झाला. परंतु एकाच गावात राहून कोकणातल्या गावोगावी संचार करणे अशक्यप्राय बनू लागले. त्यामुळे या बंधूंनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आठ बंधूंपैकी एका भावाने वालावल येथेच राहण्याचा निर्णय घेतला, तर इतर खानोली, चेंदवण, आरवली, परुळे, आजगाव, मोचेमाड आदी ठिकाणी वास्तव्यास निघून गेले. दशावताराचा आवाका वाढला. स्थानिक कलाकारांना कलाप्रदर्शनासाठी हक्काचे व्यासपीठ मिळू लागले. वर्षागणिक नवनवे कलाकार गावोगावी उदयास येउ लागले. त्यातून आठ भावांनी आठ वेगवेगळे नाट्यमेळ (कंपनी) स्थापन केले. जसजसे नाट्यप्रयोग होऊ लागले, तसतसे त्यात अनेक चांगले बदल होऊ लागले. दशावतार अधिक प्रगल्भ होत गेला. ग्रामदैवताचा उत्सव म्हणजे जत्रा. ही जत्रा पूर्वी देवतांची ओटी भरणे व मंदिराभोवती मध्यरात्री काढली जाणारी प्रदक्षिणा यापुरती मर्यादित होती. दशावतारी नाटकांमुळे जत्रेचे स्वरूपच बदलून गेले. ग्रामीण भागातील लोकांना वर्षातील काही रात्री जत्रांच्या निमित्ताने मनोरंजनाचा विरंगुळा मिळू लागला. आपल्या गावाची जत्रा कधी येते, याची चातकासारखी वाट पाहिली जाऊ लागली. (अजूनही हे गारूड कोकणात जशास तसे आहे!) 
परंतु या वाटचालीत असंख्य अडथळे होते. प्रवासाची साधने नसल्यामुळे पायी चालण्याचा एकच मार्ग होता. त्यासाठी स्वत:च्या साहित्याची ट्रंक स्वत: डोक्यावर घेऊन कलाकार पायपीट करत असत. तुटपुंजे मानधन व ग्रामस्थांकडून मिळणारी अन्नसामग्री याच्या बदल्यात नाटके सादर होत. या प्रतिकूल परिस्थितीत नाटक कंपनी सांभाळणे खूपच जिकिरीचे होऊन बसले होते. पण कर्तव्यापुढे भौतिक मर्यादा कलाकाराला झुगारून द्याव्याच लागतात. त्याप्रमाणे गोरे बंधूंनी अनेक आपत्ती सोसून ही नाट्यसेवा अखंडित चालू ठेवली.
नंतरच्या काळात गोरे बंधूंना हा व्यवसाय चालविणे अशक्यप्राय होऊन बसले. जमा व खर्चाचा ताळमेळ बसेना. प्रतिवर्षी आर्थिक तोटा सहन करण्यापलीकडे गत्यंतर नव्हते. पदरमोड करण्यालाही मर्यादा येऊ लागल्या. याच विवशतेतून त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. या कंपन्या चालविण्यासाठी इतरांना द्याव्यात! अर्थात हे काम सोपे नव्हते. विघ्नहर्ता गणरायाचा मुखवटा असलेला पेटारा ठरलेल्या दिवशी त्या त्या गावात पोहोचून जत्रा सादर व्हायलाच हवी, हा दंडक पाळणे क्रमप्राप्त होते. ही जबाबदारी सांभाळण्याचे कार्य करण्यास सहजासहजी कोणी धजावेना. त्यामुळे गोरे बंधूंनी ज्या ज्या गावात निवास केला होता, तेथील मंदिरांच्या पूजापाठाची जबाबदारी वाहणाºया, देवकार्य करणाऱ्या समाजाला विश्वासात घेतले. हा समाज प्रत्येक गावात होता. त्यामुळे केवळ त्यांच्याच पाठिंब्याच्या जोरावर हे कार्य पुढे नेणे शक्य होते, हे ओळखून गोरे बंधूंनी दशावताराची पताका त्यांच्या खांद्यावर दिली. यातूनच प्रत्येक दशावतार कंपनी त्या त्या गावाच्या नावासह ओळखली जाऊ लागली. आरवलीचे आरोलकर, आजगावचे आजगावकर, खानोलीचे खानोलकर, मोचेमाडचे मोचेमाडकर, चेंदवणचे चेंदवणकर, वालावलचे वालावलकर अशी नावे रूढ झाली. या आठ गोरे बंधूंपैकी एकाच भावाने कवठी-कुडाळ येथून कंपनी चालविण्याचा निर्णय घेतला. ते गोरे दशावतार नाट्यमंडळ. आजमितीस बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळ म्हणून ख्यातकीर्त आहे. या कंपनीचे मालक बाळकृष्ण उर्फ दिनेश गोरे यांनीच ही समग्र माहिती ‘लोकमत’ला दिली.
दिनेश गोरे हे स्वत: एक कसलेले दशावतारी कलावंत. सिंधुदुर्गातील अष्टपैलू दशावतारी कलाकारांत त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आठव्या वर्षी पितृछत्र हरपलेल्या गोरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. त्यानंतर शिक्षणाला रामराम करून वाडवडिलांचा परंपरागत वारसा सांभाळण्यासाठी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी दशावतार क्षेत्रात उडी घेतली. दशावतारी कंपनीची पुनर्बांधणी केली. आर्थिक तंगीचा सामना करत मोठ्या हिमतीने नाट्यमंडळ नावारूपास आणले. नाटकातून नवनवे विषय हाताळत वेगळेपणाची चुणूक दाखविली. सिंधुदुर्गातील दिग्गज नाटक कंपन्यांच्या तोडीस तोड नाटके सादर करत लौकिक मिळविला.
दशावतारी कंपन्यांचे हस्तांतर करून गोरे कुटुंबातील इतर सदस्य चरितार्थाच्या मागे गेल्यामुळे त्यांची दशावताराशी नाळ तुटली ती कायमचीच! मात्र दशावताराची सेवा करून दिनेश गोरे याला अपवाद ठरले.

सरस्वतीचा वरदहस्त; पण लक्ष्मी रुसलेलीच!
‘पर डे’ किंंवा ‘पर नाईट’ हे शब्दप्रयोग कला क्षेत्रात परवलीचे. दशावतारी कलाकारही त्याला अपवाद नाहीत. सरस्वतीच्या कृपेचे धनी असलेले हे कलाकार व त्यांच्या कंपन्या लक्ष्मीच्या कृपाकटाक्षासाठी मात्र तळमळत असतात. वर्षानुवर्षे चाललेली ही शोकांतिका केवळ कलेच्या प्रेमापोटी उराशी कवटाळून दशावतारी कलाकार चरितार्थ चालवतात.
बहुतेक कलाकार दशावतारी कंपनीसोबत वार्षिक, द्वैवार्षिक करार करतात. त्यानुसार मानधन ठरते. आश्चर्य वाटेल; पण अवघ्या २00-३00 रुपयांच्या मोबदल्यात हे कलाकार काम करत असतात. त्यात जेवण बनविणाºयांपासून ते वादकांपर्यंत सर्वजण येतात. दोन वेळचे जेवण व प्रतिदिन ठरविली गेलेली रक्कम एवढाच काय तो परतावा. नावाजलेल्या मोजक्याच कलाकारांना ४00-५00 रुपये मिळतात. कलाकार मुरलेला, व्यासंगी असेल, गायनात प्रवीण असेल व शब्दफेक करण्यात तरबेज असेल, तर प्रेक्षकांतून बक्षिसे मिळतात. २0, ५0 रुपयांपासून ५00 रुपयांपर्यंत बक्षिसे देणारे कलारसिक आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच कलाकारांच्या आर्थिक प्राप्तीचा आलेख किंचित उंचावतो, असे सध्याच्या काळातील आघाडीचे कलाकार महेंद्र कुडव यांनी सांगितले. ही रक्कम त्या त्या कलाकाराला वैयक्तिक स्वरूपात मिळत असते. नाटक चालू असताना मध्येच संवाद थांबवून प्रेक्षकांनी दिलेली बक्षिसाची रक्कम कलाकार जाहीर करून त्याचे आभार मानतात. नंतर पुन्हा नाटकाशी तादात्म्य पावतात.
नाटकांची संख्या जितकी जास्त, तितकी कमाई अधिक असे सोपे गणित असते. मोजक्याच कंपन्यांना वार्षिक १५0 ते १८0 नाटके मिळतात. ही कमाई सहा महिने चालते. असे असले, तरी तुटपुंजी मिळकत, गावोगावची भटकंती, रात्रीची जागरणे यातून जो तरला, तो दशावतार क्षेत्रात टिकला. खरे तर लोकांकडून मिळणारी कौतुकाची थाप दशावतारी लोकांसाठी सर्वांत मोठी देणगी असते. अनेक कलाकार जनमानसात लोकप्रिय आहेत, ते कलेवरील निष्ठेमुळे व व्यासंगामुळे. पण, केवळ लोकप्रियतेच्या जोरावर प्रपंच साधता येत नाही. त्याला अर्थप्राप्तीची जोड असावी लागते. आणि इथेच दशावतारी कंपन्यांना व कलाकारांना तडजोड करावी लागते. काही चांगले कलाकारही चरितार्थाच्या शोधात या कलेपासून दूर होतात.

ट्रिकसीन नाटकांनी बदलला ट्रेंड
टीव्ही, स्मार्टफोनच्या जमान्यात दशावताराचेही मॉडिफिकेशन झाले. प्रेक्षकांची नस ओळखून पारंपरिक नाटकांच्या सादरीकरणाला फाटा देऊन ट्रिकसीनयुक्त नाटकांचा ट्रेंड गेल्या दशकभरात बराच रुळला आहे. सुरुवातीच्या काळात काही कलाकारांनी या नव्या बदलांना विरोध केला. मात्र, तो फार काळ टिकला नाही. प्रेक्षकांना दशावताराकडे खेचण्यात ट्रिकसीन नाटकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासाठी इतर तंत्रज्ञांची मदत घेतली जाते. दशावतारी नाटकांत पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य, कृत्रिम देखावे आदी गोष्टी सर्वमान्य झाल्या आहेत. स्टेजवर अधांतरी देवतांचे आगमन होणे, बंद दाराचे कुलूप आपोआप तुटणे, आकाशातून जेवणाची ताटे येणे, मगर, गरूड, हंस, मोर आदी पशुपक्षी अशा कित्येक गोष्टी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून दशावतारी नाटकांमध्ये आल्या व लोकांच्या पसंतीस उतरल्या. प्रेक्षकांना अपरिचित असणारे पौराणिक संदर्भ घेऊन ही नाटके सादर केली जातात. या ट्रिकसीनयुक्त नाटकांसाठी जास्त रक्कम मोजावी लागते. पारंपरिक नाटक १0-१२ हजारांत होत असताना ट्रिकसीनयुक्त नाटकासाठी २५ हजार ते ३५ हजार मोजावे लागतात. यातील बराच पैसा सामग्रीच्या जुळवाजुळवीवरच खर्च होतो. परिणामी कलाकार नेहमीप्रमाणे उपेक्षित राहतात. त्यांच्या नशिबी ठरलेली कराराची रक्कमच उरते! कंपनी चालकांना या नाटकांतून थोडाफार फायदा होतो. मात्र, बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फायदा क्षणिक असतो. कंपनी चालविणे तारेवरची कसरत बनली आहे. या कसरतीत कंपनी चालकांना पदरमोड तर करावी लागतेच; शिवाय कर्जबाजारीही व्हावे लागते, ही वस्तुस्थिती आहे.

‘संयुक्त दशावतार’ लोकप्रिय
साधारणपणे नाव्हेंबर ते एप्रिल हा सहा महिन्यांचा काळ कराराची नाटके, जत्रा यासाठी राखीव असतो. या काळात नावाजलेले, नवखे असे सर्वच कलाकार, वादक करारबद्ध असल्यामुळे ते एकत्र येणे कठीण असते. मात्र, मे महिन्यापासून त्यांना थोडी मोकळीक मिळते. मग काही कंपन्यांचे मालक एकत्र येऊन संयुक्त दशावतारी नाटकांचे प्रयोग सादर करतात. हे प्रयोग कोणत्याही एका कंपनीकडून सादर होत नाहीत. तर ते विविध कंपन्यांच्या माध्यमातून साकार होत असतात. नावाजलेले कलाकार अशा नाटकांमधून आपला व्यासंग, कला अजमावतात. अर्थात, या नाटकांना तुडुंब गर्दी असते. विशेष आयोजन होत असल्यामुळे नाटकांचे दरही चढेच असतात. या वेळी मात्र कलाकाराला थोडाफार फायदा होतो. एरव्ही ३00-४00 रुपयांत राबणारा कलाकार संयुक्त दशावतार नाटकात एक हजार रुपये या समाधानकारक मानधनात कला सादर करतो; परंतु अशी नाटके मोजकीच होत असल्यामुळे कलाकारांना त्याचा तेवढ्यापुरताच उपयोग होतो. हल्ली तर चक्क पावसाळ्यातही दशावतारी नाटके होतात. नवरात्रीत अनेक कंपन्यांची नाटके आगाऊ बुक केलेली असतात. लोकप्रियतेची वाढत जाणारी कमान ही कला टिकवून ठेवण्यासाठी ज्येष्ठ दशावतारी कलाकारांनी केलेल्या त्यागामुळेच असल्याचे अनेक कलाकार नम्रपणे कबूल करतात.

जत्रांच्या माध्यमातून सांस्कृतिक जडणघडण ज्याची झाली, दशावतारी नाटके ज्याने लहानपणापासून पाहिली, मनात साठविली, अशा माणसाला दशावताराची भुरळ पडतेच. हे गारुड कोकणातल्या काही भागांत इतके प्रचंड आहे की, आपण एकदा तरी दशावतारी नाटकात छोटी का असेना, एखादी भूमिका साकारावी, तो रोमांच अनुभवावा अशी उर्मी अंत:करणात दाटलेली असते. कुडाळ, वेंगुर्ले या भागात दशावताराचा मोठा बोलबाला. तिथल्या आबालवृद्धांत दशावताऱ्यांची मोठी क्रेझ. शाळांमधून अगदी लहान वयातच दशावताराची गोडी लागते. आता अनेक शाळांमध्ये लहान मुले वार्षिक स्रेहसंमेलनात दशावतारी नाटके सादर करतात. जत्रांमध्ये नावाजलेल्या कलाकारांमध्ये त्यांना आपली छबी दिसते. अशी मुले पुढे वयात येताना जवळपासच्या एखाद्या दशावतारी कलाकारांच्या संपर्कात येतात. एखाद्या कंपनीच्या मालकाशी ओळख होते. गावातल्या नाटकांतून अभिनय करता करता एखाद्या नवख्या कंपनीत छोटीशी भूमिका मिळते, अनेकांना ‘ब्रेक’ मिळतो. प्रेक्षकांना भूमिका पसंत पडली तर सहकलाकार प्रोत्साहन देतात. मग त्या नवख्या कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो आणि अन्य कोणतेही क्षेत्र न अनुभवता दशावताराला तो वाहून घेतो. अर्थात यात भावनेचा भाग असला, तरी विचारपूर्वक व्यावहारिक गणिते गृहीत धरूनच हे निर्णय घेतले जातात. 
अनेक नवतरुण कॉलेज जीवनातच केस वाढवतात. दशावतारी कलाकार असल्याची ती एक खास ओळख असते. सिंधुदुर्गात केस वाढविलेल्या व्यक्तीला दशावतारी कलाकार म्हणून मोठा मान मिळतो. गावोगावी ओळखी होतात. मित्र परिवार वाढतो. अमुक एका कंपनीत कामाला आहे, हे अभिमानाने ते सांगतात. एखाद्या दिग्गज अनुभवी कलाकारासमवेत काम करत असल्याचे सांगण्याची एक आगळीच मौज व समाधान त्यांच्या मुखावर असते. या क्षेत्रात स्वत:चा दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक पुराणे, ऐतिहासिक संदर्भ, अभंगवाणी, संस्कृत सुभाषिते, काव्यपंक्ती, गीतरचना, वाक्प्रचार, म्हणी मुखोद्गत केल्या जातात. पूर्वीपासून चालत आलेली जुगलबंदीची परंपरा आजही पाहायला मिळते. एखाद्या कलाकाराने चालू असलेल्या आख्यानाशी निगडित प्रश्न विचारला तर समोरच्याला त्याचे उत्तर देता आले पाहिजे. अन्यथा त्याला वेळ मारून न्यावी लागते आणि चाणाक्ष प्रेक्षक ते अचूक हेरतो. अशा वेळी अर्थातच ज्याने प्रश्नावली उभी केली किंवा कोणी समर्पक उत्तरे दिली, त्याला प्रेक्षकांतून बक्षिसे मिळतात. ती ज्ञानसाधनेला मिळालेली पोचपावती असते. या क्षणासाठी प्रत्येक दशावतारी कलाकार झटत असतो. सध्या दत्तप्रसाद शेणई, नितीन आशियेकर, पप्पू नांदोसकर, सीताराम उर्फ बाबा मयेकर, विलास तेंडोलकर हे कलाकार अशा जुगलबंदीमध्ये भाव खाऊन जातात.
मध्यंतरी नवे कलाकार दशावतारी क्षेत्रात येत नाहीत, असा गैरसमज पसरला होता. त्यात तथ्य नाही; कारण अनेक दशावतारी कलाकारांच्या दुसऱ्या, तिसऱ्या पिढीतील युवक आज हे क्षेत्र गाजवताना दिसतात. भरत नाईक, सिद्धेश कलिंगण, आबा कलिंगण, नितीन व नारायण आशियेकर, नीळकंठ सावंत, गौतम केरकर, चारुदत्त मांजरेकर, संजू घाडीगावकर, महेंद्र कुडव, बळी कांबळे असे तरुण तडफदार कलाकार रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. पप्पू घाडीगावकर-बाबा मेस्त्री, अमोल मोचेमाडकर-अर्जुन सावंत या वादकांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. कलाकारांसोबत फोटो काढून घेण्यासाठी काही ठिकाणी प्रेक्षक गर्दी करताना दिसतात, इतके ग्लॅमर दशावताराने कमविले आहे. त्यामुळेच गावोगावी नवनवे कलाकार या क्षेत्रात नाव कमविण्यासाठी आटापिटा करताना दिसतात. परिणामी कलाकारांची संख्या वाढते व दशावतारी नाटक कंपन्यांच्या संख्येत वर्षागणिक भर पडते. आजमितीस सिंधुदुर्गात ८६ कंपन्या सरकारकडे नोंदणीकृत आहेत. तर जवळपास ५० कंपन्या अजून नोंदणीकृत झालेल्या नाहीत. मुंबईत सुमारे १० दशावतारी कंपन्या आहेत. हे सर्वजण आपला व्यवसाय, नोकरी सांभाळून कला जोपासत आहेत. दशावतारी कलेचा वाढता पसारा आणि रसिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहाता ही कला संस्कृतीचे बंध अनादी कालापर्यंत समृद्ध करेल, यात शंका नाही.

रंगभूषा, वेशभूषेची जबाबदारी स्वत:चीच...
- दशावतारी नाटकात काम करणे म्हणजे केवळ रंगमंचावर सादरीकरण करणे नव्हे. स्वत:ची रंगभूषा व वेशभूषा स्वत:लाच करावी लागते. क्वचित एखादा सहकलाकार थोडी-फार मदत करतो. 
- एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करताना शक्यतो पाणवठ्याजवळ किंंवा एखाद्या मंदिराच्या परिसरात कलाकार डेरा टाकतात. निसर्गाच्या सान्निध्यात आन्हिके उरकून आदल्या दिवशी गावकऱ्यांनी दिलेला कोरडा शिधा शिजवतात. दुपारी तो ग्रहण करून विश्रांती घेतात.
- दरम्यानच्या काळात हे कलाकार नाटकाचा विषय, प्रसंग, संवाद, पदरचना आदींची उजळणी करतात. कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या या भ्रमंतीत अनेक नवी पदे, नवे प्रयोग जन्म घेतात. हे थ्रिल अनुभवण्यासाठीही अनेक कलाकार कंपनीत रूजू होतात.

महाराष्ट्र सरकारकडून मिळते तुटपुंजी पेन्शन, अनुदान
- कवठी-कुडाळ येथील बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळाचे मालक दिनेश गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ कलाकारांना महाराष्ट्र सरकारतर्फे १५00, १८00 व २५00 अशा तीन स्तरा्रवर मासिक पेन्शन दिली जाते. मात्र, ही रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे.
- दशावतारी नाटक कंपन्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे अनुदान दिले जाते. मात्र, त्यात नियमितता व पारदर्शकता नाही. काही वेळा अगदी नवख्या व काही वेळा तर त्याच त्याच कंपन्यांना अनुदान मिळण्याचे प्रकार घडले आहेत.
- सध्या दशावतारी कंपनी चालविणे अशक्यप्राय बनले आहे. सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन ही लोककला टिकविण्यासाठी कंपनी व कलाकारांकरिता वार्षिक मानधन/अनुदान सुरू करणे निकडीचे बनले आहे.

चरितार्थ आणि भविष्याची चिंता...
कलेवरील प्रेमापोटी दशावतार क्षेत्राकडे नवयुवकांची पावले वळतात. तिथली शिस्त आणि त्यागभावना अल्प काळातच त्यांच्या अंगवळणी पडते. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. ती संधी अनेकदा साधूनही त्याचे समाधान होत नाही. दर वेळी काही तरी नवे करण्याची, नवे क्षितिज गाठण्याची उर्मी त्याच्या अंतरी दाटून येते. अल्प मानधनात ही कलेची पालखी ते खांद्यावर वागवतात. मात्र, चरितार्थाची आणि भविष्याची चिंता त्यांना सतावत असते. व्यावहारिक पातळीवर ते मागे पडतात. मात्र, त्यातही ते समाधान मानतात. अनेकजण नाटके नसतील, तेव्हा पर्यायी व्यवसायाच्या माध्यमातून चरितार्थाला हातभार लावतात. कोणी सुतारकाम करतो, कोणी मूर्तीकार, गवंडीकाम, रंगकाम, कोणी एखादे दुकान चालवतो, तर कोणी खासगी कंपनीत अल्प काळासाठी नोकरी करतो. काहीजण शेती, बागायतीत रमतात, तर काहींना मोलमजुरीवाचून पर्याय नसतो. अनेक कलाकारांची परिस्थिती इतकी गरीब असते, की दोन वेळचे जेवण व नाटकासाठी दिला जाणारा मोबदला त्यांच्यासाठी मोठा असतो.

Web Title: Dashavatar : Keep 800 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.