मरणमार्ग! जबाबदार कोण? अफवा, प्रवासी की रेल्वे प्रशासन
By Balkrishna.parab | Published: September 29, 2017 04:12 PM2017-09-29T16:12:27+5:302017-09-29T16:24:22+5:30
नवरात्रीमधील हा शुक्रवार मुंबईतील उपनगरीय रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने काळा शुक्रवार ठरला. मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेनंतर आता सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थितीत झालाय.
वेळ सकाळी दहा साडे दहाच्या सुमाराची... ठिकाण मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील परळ स्टेशन... मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे स्थानकांप्रमाणेच येथेही चाकरमान्यांची लगबग सुरू होती.... त्यात दसऱ्याआधीचा दिवस असल्याने लोकलमधील, ऑफिसमधील सेलिब्रेशनमुळे सारेजण उत्सवाच्या मूडमध्ये होते... पण क्षणात होत्याचे नव्हते झाले... एक अफवा उडाली आणि दोन स्थानकांना जोडणारा, इच्छित स्थळी पोहोचवणारा चिंचोळा ब्रिज या प्रवाशांना थेट मरणमार्गावर घेऊन गेला. अफवेमुळे झालेल्या 22 जीव हकनाक प्राणास मुकले. नवरात्रीमधील हा शुक्रवार मुंबईतील उपनगरीय रेल्वे आणि रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने काळा शुक्रवार ठरला. मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेनंतर आता सार्वत्रिक संताप व्यक्त होतोय. या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थितीत झालाय.
मुंबईतील उपनगरीय लोकलसेवेची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कधीच संपली आहे. वाढती प्रवासी संख्या आणि मर्यादित साधने यातून मार्ग काढत ती चालली आहे. प्रवासीही अन्य पर्याय नसल्याने डब्यात गुराढोरांप्रमाणे रेटून, डब्यांना वटवाघळांप्रमाणे लटकून प्रवास करताहेत. मुंबईतील रेल्वेची स्थिती सुधारण्यासाठी अनेक घोषणा होतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. परिस्थिती जैसे थेच राहते. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करण्यापलीकडे प्रवाशांकडे अन्य मार्ग नाही. अशा तुडूंब गर्दीत एखादी अफवा, थोडीशी बाचाबाची, रेटारेटी प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी होणे तर उपनगरीय रेल्वे मार्गावरील नित्याची बाब बनली आहे. आजही तेच झाले. परळ आणि एल्फिन्स्टन रोड या स्थानकांना जोडणाऱ्या ब्रिजवर शॉर्टसर्किट होऊन ब्रिज कोसळल्याची अफवा उडाली. त्याबरोबरच गर्दीत रेटून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये जीव वाचवण्यासाठी धावपळ झाली. त्यात चेंगराचेंगरी होऊन हा अनर्थ घडला.
मुख्य मुंबईतील दादर, परळ, करी रोड चिंचपोकळी स्थानकांत सकाळ संध्याकाळ चेंगराचेंगरीच्या घटना घडत असतात. गिरणगावात गिरण्यांच्या जागी उभ्या राहिलेल्या मोठमोठ्या टॉवरमधील कॉर्पोरेट ऑफिसमुळे परळ, करीरोड, चिंचपोकळी आदी स्थानकांवरील प्रवाशांची वर्दळ लक्षणीय प्रमाणात वाढली आहे, पण या स्थानकांमधील पायाभूत सुविधा त्याप्रमाणात विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे येथू ये जा करताना प्रवाशांना जीवावर उदार होत गर्दीतून मार्ग काढावा लागतो. हे चित्र सर्वसामान्य, प्रवासी यांना रोजच दिसते. पण रेल्वे प्रशासनाला मात्र त्यातील काहीच दिसत नाही. दिसले तरी थातुर मातूर उपाययोजना केल्या जातात. प्लॅटफॉर्मवर गर्दी होणारी जागा सोडून चुकीच्या जागी फूट ओव्हर ब्रिज उभारले जातात. त्यामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरच्या समस्या वर्षांनुवर्षे तशाच आहेत.
एखादी घटना घडली की त्याची जबाबदारी झटकायची हा आपल्या सरकारी खात्यांचा पारंपरिक दुर्गुण. आजही दुर्घटना झाल्यावर रेल्वे प्रशासनाने नेहमीच्या शैलीत स्वतःवरील जबाबदारी झटकली. दुर्घटनेचे खापर पाऊस आणि अफवांवर फोडले. पण तिकीट, पास आणि अन्य मार्गातून प्रवाशांकडून कोट्यवधीचा महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाची ही भूमिका निव्वळ बेफिकीरपणाचीच म्हटली पाहिजे. उपनगरीय रेल्वे मार्गांवरील अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे जैसे थे आहेत. काही ठिकाणी प्लॅटफॉर्मची उंची अद्याप वाढवण्यात आलेली नाही. रेल्वे स्थानकांमध्ये रूळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी कुंपण घालण्याचे काम पूर्ण झालेले नाही. परळमधील दुर्घटनेमुळे फूट ओव्हरब्रिजचा प्रश्न समोर आलाय. पण अशा पायाभूत व्यवस्था सुधारण्यासाठी नेहमीच अपघातांची वाट पाहत बसायचे का?