श्रमातून मिळणा-या आनंदातच जीवनसौंदर्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:30 PM2017-09-10T13:30:07+5:302017-09-10T13:35:12+5:30
प्रासंगिक : महाराष्ट सीटूच्या वतीने जालन्यात १० व ११ सप्टेंबर रोजी पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह.साळुंखे यांच्या भाषणातील संपादित अंश.
- डॉ. आ. ह.साळुंखे ( संमेलनाध्यक्ष, पहिले राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलन )
सन्मान्य बंधुभगिनींनो,
श्रमाचं स्वरूप जी स्त्री वा पुरुष व्यक्ती ‘श्रम’ करते, ती ‘श्रमिक’ होय. काही तरी उत्पादन करण्याच्या हेतूनं केलेल्या बौद्धिक आणि मानसिक प्रयत्नांना देखील ‘श्रम’ म्हणणं शक्य आणि आवश्यकही असलं, तरी उत्पादन करण्याच्या हेतूनं केलेल्या शारीरिक हालचालीलाच प्राधान्यानं श्रम म्हटलं जातं. विचार, चिंतन, मनन, संकल्पनांचं आकलन, सिद्धान्तांची मांडणी, सिद्धान्तांच्या उपयोजनाचं मार्गदर्शन इ. प्रकारच्या कामांना सामान्यत: बौद्धिक-मानसिक श्रम म्हणता येईल. शेतीतील विविध कामं, मजुरी, दगड फोडणं, इमारती बांधणं, विहिरी खोदणं, धातुकाम करणं, कारखान्यांतून विविध प्रकारच्या यंत्रांवर काम करणं इ. स्वरूपाच्या कामांना स्थूलमानानं शारीरिक श्रम म्हणता येईल. ही मांडणी प्रामुख्यानं भारतीय समाज नजरेसमोर ठेवून केली आहे. श्रमिकांचा प्रश्न हा काही एखाद्या विशिष्ट गटाचा, समूहाचा, राष्ट्राचा आहे, असं नाही. तो जगातील सर्वांना आपल्या कवेत घेणारा आहे. मी प्रामुख्यानं भारतीय समाजाचा विचार मनात ठेवूनच ही मांडणी करीत आहे. ही मर्यादा प्रारंभीच नोंदवून ठेवतो.
भारताचा विचार करताना सिंधु संस्कृतीच्या आधीपासूनच इथं आदिम समाजानं संस्कृतीच्या निर्मितीसाठी खूप श्रम केले होते. या काळात तर फार मोठा विकास झाला. प्रचंड इमारती, उत्तम जलाशय, धान्याची कोठारं, सभागृहं, शिस्तबद्ध रस्ते, गटारांची व्यवस्था इत्यादींच्या निर्मितीमागं किती प्रचंड परिश्रम आवश्यक आहेत, हे वेगळ्या शब्दांत सांगण्याची गरज नाही. याचा अर्थ, या देशाला श्रमाचा फार प्राचीन इतिहास आहे. या श्रमामधून जे उत्पादन, जी संपत्ती, ज्या सुखसोयी निर्माण होत असत, त्याचा लाभ सर्वांना व्हावा, असा प्रयत्न करणारे काही महामानवही आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेले आहेत. सम्राट बळी हे त्याचं उत्तम उदाहरण होय. समाजात निर्माण झालेल्या संपत्तीची सम्यक रीतीनं आणि न्याय्य पद्धतीनं वाटणी करणं, हे त्याच्या राज्यकारभाराचं सूत्र असल्यामुळं त्याच्या अगदी विरोधकांनीही ‘संविभागी’ म्हणजेच संपत्तीची ‘सम्यक रीतीनं विभागणी करणारा’असा त्याचा गौरव केला आहे.
आदिम काळापासूनच माणसाला अगदी किमान प्राथमिक गरजा भागविण्यासाठी देखील म्हणजेच आपलं अस्तित्व टिकविण्यासाठीही कोणत्या ना कोणत्या प्रकारचे श्रम करावे लागत होते. खरं तर केवळ माणसालाच नव्हे, तर सर्व सजीवांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या गरजा भागविण्यासाठी असे दुहेरी श्रम करावेच लागतात.श्रम म्हटल्यानंतर प्राधान्यानं, प्रामुख्यानं शारीरिक श्रम डोळ्यांपुढं येतात, हे खरं आहे. परंतु बौद्धिक आणि मानसिक श्रमांचं महत्त्व आपण सर्वाथार्नं आणि पूर्णांशानं नाकारू शकत नाही. शारीरिक, बौद्धिक, मानसिक श्रमांच्या स्वरूपात काही अंतर असलं, तरी त्यांना एकमेकांपासून सर्वस्वी अलग करणं योग्य नव्हे. माणसाचा मेंदू विकसित होत गेला, तसतसा त्याचा बौद्धिक-मानसिक विकास होत गेला. त्यातून ज्या मेंदूचा विकास झाला, तो मेंदू देखील अखेरीस शरीराचा भाग असतो, हे काही नाकारता येत नाही. याचा अर्थ शरीर, बुद्धी आणि मन यांच्या कमी-जास्त सहकार्यातून मानवानं बाह्य सृष्टीवर प्रचंड ताबा मिळवला, तिला अनुकूल करून घेतलं, स्वत:ची कार्यक्षमता वाढवली, स्वतच्या किती तरी मयार्दांचं उल्लंघन करून यशाच्या आणि आनंदाच्या भरा-या मारल्या. तात्पर्य, माणसाचा विकास होत असताना हे तिन्ही घटक त्याला वेगवेगळ्या स्वरूपात उपयोगी पडले आहेत.
हे एवढं मान्य करण्यात ऐतिहासिक वास्तवाच्या दृष्टीनं काही गैर वा आक्षेपार्ह नाही. परंतु मानवी इतिहासात खरी गफलत झाली, ती एका अतिशय गंभीर आणि विघातक दृष्टिकोनामुळं. बौद्धिक श्रम करणा-यांना माणूस म्हणून श्रेष्ठ मानणं आणि शारीरिक श्रम करणारांना माणूस म्हणून हलकं मानणं, ही विचारसरणी या दृष्टिकोणातून वाढीला लागली. या घटनेमुळं समाजरचनेचा तोल गेला आणि ख-याखु-या माणूसपणाचा -हास झाला. आपल्या देशात बौद्धिक श्रम आणि शारीरिक श्रम यांच्या संदर्भात एक गंभीर विघातक घटना घडली. एखाद्या व्यक्तीला प्राचीन काळी बौद्धिक श्रम करायची संधी मिळाली असेल, तर त्यानंतरच्या असंख्य पिढ्यांना मूळ पूर्वज व्यक्तीचा वारसा आयता मिळाल्यामुळं जन्मानंच बौद्धिक काम करण्याची संधी मिळत असे, हक्क मिळत असे. याउलट, प्राचीन काळी एखाद्या व्यक्तीला शारीरिक श्रम करावे लागले असतील, तर त्या व्यक्तीच्या पुढच्या असंख्य पिढ्यांनाही शारीरिक श्रम करण्याची सक्ती केली जात असे. हा जो प्रकार घडला, त्यामुळं अनेक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वं कधीच फुलू शकली नाहीत.
माणूस म्हणून प्रतिष्ठेचं जीवनही जगता आलं नाही आणि जीवनाचा आनंदही मिळवता आला नाही. खरं म्हणजे हे सगळं केवळ त्या व्यक्तींचं नुकसान नव्हतं, ते सगळ्या भारतीय समाजाचंच नुकसान होतं. या व्यवस्थेमुळं आपल्या समाजानं आपल्याच पायांवर धोंडा मारून घेतला, हा इतिहास मान्य करावाच लागेल. आनंदाची गोष्ट ही आहे, की आता हा काळ बदलला आहे. आता, ज्याच्यावर कितीही हलकं काम लादलेलं असेल, त्याच्या मुलांनाही समाजातील सर्वोच्च स्थानी पोचण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अर्थात, काही व्यक्तींना विशिष्ट कारणानं अशी संधी मिळाली, तरी समाजातील सर्वसामान्य अशा सर्वांसाठीच हे सहज साध्य झालेलं नाही.
समाजातील सर्वांनाच आपापल्या प्रयत्नांनी, कष्टांनी आपली व्यक्तिमत्त्वं पुरेपूर फुलवण्याची योग्य संधी मिळण्यासारखं वातावरण आणि वास्तव समाजव्यवस्था निर्माण करणं, हे आपलं स्वप्न असायला हवं. अर्थात, हे स्वप्न आपोआप साकार होऊ शकत नाही. ते साकार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची खरी गरज आहे.
आधुनिक काळातील प्रगत उद्योगधंद्यांच्या क्षेत्राकडं नजर टाकली असता कामगारांसाठी या प्रकारच्या सुविधा देणारे कायदे आपल्याला सर्वत्र आढळून येतात. सेवकांना दिलं जाणारं काम, कामाचे तास, योग्य ते वेतन, आजारपणाच्या रजा, आजारपणातील उपचारांसाठी दिले जाणारे भत्ते, वेळोवेळी दिल्या जाणा-या सुट्या या बाबतीत असलेले नियम आपल्याला ठाऊक आहेतच. पण इथं आवर्जून नोंद घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की तथागतांनी हे नियम अडीच हजार वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहेत. शिवाय, हे नियम राजानं केलेल्या कायद्याच्या स्वरूपात आलेले नसून धम्माच्या आणि नीतीच्या स्वरूपात आले आहेत. त्यामुळं लोकांच्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा अधिक दृढ होते. या नियमांचं पालन करण्यासाठी कोणावर बाहेरून सक्ती वा जबरदस्ती केली जात नाही, तर त्यांचं पालन करण्याची ऊर्मी माणसाच्या आतूनच उत्स्फूर्तपणे निर्माण होते आणि ती त्याच्या आचरणाचा स्वाभाविक आणि अविभाज्य भाग बनते.
शारीरिक श्रम आणि बौद्धिक-मानसिक कृती या दोहोंचा अतिशय मनोहर मिलाफ असलेली संयुक्त जीवनशैली, हे संतांच्या चरित्राचं आणि कायार्चं एक आगळं वैशिष्ट्य होय. संतांनी आपल्या आचरणानं आणि उपदेशानं आपल्या समाजाला अतिशय समृद्ध आणि उन्नत बनविलं आहे, यात काही शंका नाही. मालक आणि सेवक या दोघांनाही एकमेकांची गरज आहे, एकमेकांची मदत हवी आहे, दोघेही एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत आणि एकमेकांचे हितचिंतक आहेत, या धारणा घेऊन वागल्यास त्यांच्यामधे एक निकोप नातं निर्माण होऊ शकतं, दोघेही समाधानी आणि संतुष्ट राहू शकतात, दोघांचंही आणि पयार्यानं एकूण समाजाचंही हित होतं, स्वास्थ्य टिकून राहतं.