वनपर्यटन हे दुधारी शस्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:06 PM2017-08-07T18:06:54+5:302017-08-07T18:07:20+5:30
वनश्री प्रत्येक ऋतूत वेगवेगळे रूप धारण करीत असते. फाल्गुनातील निष्पर्ण जंगल असो, की चैत्रातील नवी पालवी, वैशाखातील वणवा असो, की आषाढातील हिरवाईचा आरंभ, मार्गशीर्षातील हाडांपर्यंत पोहोचणारी थंडी असो, की फाल्गुन मासातील वसंतोत्सव, जंगल आपल्या नादात बेधुंदपणे वाटचाल करीत असते. श्रावण मासात मात्र वनराई ‘वनराणी’ बनून सौंदर्याचा जो आविष्कार करते तो माणसाच्या मनात खोलवर दडलेल्या वनसंवर्धकाला आव्हान देत असतो.
-राजेंद्र धोंगडे
वनश्री प्रत्येक ऋतूत वेगवेगळे मोहक रूप धारण करीत असली तरी श्रावण मासातील सौंदर्याचा आविष्कार औरच असतो. तो माणसाच्या मनात खोलवर दडलेल्या वनसंवर्धकाला साद घालत असतो. आज जिथे सुंदर निसर्ग तेथे पर्यटकांची अफाट गर्दी असे चित्र सर्वत्र दूर दिसते आहे. कान्हा, जीम कॉर्बेट, बंदीपूर, ताडोबा ही वन्यजीव क्षेत्रे असोत किंवा अमरनाथ, केदारनाथ, भीमाशंकर ही निसर्गाच्या कुशीत वसलेली धार्मिक स्थळे असोत. निसर्गाच्या सौंदर्याचा हळुवार आस्वाद घेण्याऐवजी स्थानिक परिसंस्थेची तोडमोड करून ते ओरबडून घेण्यातच ‘आनंद’ मानला जात आहे.
वनातील पर्यटनाचा विचार करावयाचा झाल्यास तेथील प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, सूक्ष्म जीव या घटकांची क्लिष्ट परिसंस्था सुरक्षित ठेवून पर्यटनाला चालना देणे सर्वसाधारण निसर्गातील पर्यटनापेक्षा अधिक आव्हानात्मक आहे; परंतु गेल्या दशकात राज्य सरकारने वन पर्यटनाचे ‘निसर्ग पर्यटन’ असे ढोबळ नामकरण करून अलीकडेच ‘महारष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळ’ स्थापन केल्याने सरकार या बाबत कितपत गंभीर आहे अशी शंका येऊ लागते.
राज्यात सुमारे साठ हजार चौरस किलोमीटर वनक्षेत्र पंधरा हजार गावांलगत पसरलेले आहे. त्यापैकी सुमारे ४ टक्के क्षेत्रात सहा राष्ट्रीय उद्याने व बेचाळीस अभयारण्यांचा पसारा आहे; परंतु मोजकी राष्ट्रीय उद्याने आणि दहा-बारा अभयारण्ये येथेच पर्यटकांचा ओघ दिसून येतो. इतर वन्यजीव संरक्षित क्षेत्रे ओस पडली आहेत. वन पर्यटन क्षेत्रांचा विकास म्हणजे मैलोन्मैल लोखंडी कठडे करणे, ‘व्ह्यू पॉइंट’चे सपाटीकरण करून तेथे ‘पेविंग ब्लॉक’चे मैदान करणे, निसर्ग निर्वचन केंद्राच्या नावाखाली अवाढव्य इमारती वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या कोर क्षेत्रात उभारणे आणि वनाला अनुरूप नसणारे मोठ मोठे फलक लावणे या दुष्टचक्राच्या बाहेर वन विभाग कधी पडणार? तो सुदिन असेल. खाजगी वाहनांची वर्दळ, उद्यानाच्या गाभा क्षेत्रात होणारी घुसखोरी, नजीकच्या हॉटेल मालकांनी केलेले नियमभंग, हॉटेल मॅनेजमेंटचा गंध नसलेल्या वन विकास महामंडळाकडे दिलेले विश्रामगृह व्यवस्थापन हे सारेच चिंतित करणारे विषय आहेत.
आज संचार प्रणालीमधील क्रांतीमुळे पर्यटन हा जागतिक उद्योग झाला आहे. रोजगार निर्मितीचे साधन, स्थानिकांचा व्यवस्थापनात सहभाग यामुळे पर्यटनाला राजमान्यतेबरोबर लोक मान्यता मिळत आहे.या जनशक्तीचा प्रवाह वनसंवर्धनाकडे वळविण्यासाठी वन विभागाला सज्ज होणे गरजेचे आहे. प्रशिक्षित वाटाडे, स्थळनिहाय माहिती आणि चित्रांनी सुसज्ज कल्पक निर्वचन केंद्रे, उत्तम प्रतीच्या विपुल माहिती पुस्तिका व व्यवस्थापनाचे सौजन्यशील वर्तन ही काळाची गरज आहे. अन्यथा वन पर्यटन दुधारी शस्त्र ठरणार आहे.
दुसरीकडे वन हक्क कायद्यामुळे वन पर्यटनाला बाधक ठरणाºया घटनांमध्ये वाढ होत आहे. वन्यजीव कोअर क्षेत्रातही जमिनीचे पट्टे अतिक्रमण करणाºयांना मिळत असून, वन उत्पादने गोळा करण्याचे अधिकार मिळाल्यामुळे लोकांचा जंगलामधील मुक्तसंचार वाढला आहे. या मानव केंद्रित कायद्यामुळे वनातील मुक्या जिवांनाही हक्क असतात याचा विसर पडला आहे. परिणामत: पर्यटकांची आकर्षण केंद्रेच धोक्यात आली आहेत. जिल्हास्तरीय समिती, उपविभागस्तरीय समिती आणि ग्रामसभा यांना वनाबद्दल संवेदनशील होण्याची
गरज आहे.