उमेदीची पुरचुंडी खिशात ठेवणारा कवी उत्तम लोकरे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 06:42 PM2017-08-13T18:42:29+5:302017-08-13T18:46:12+5:30
ही आहे एका वेड्या कवीची शहाणी व्यथा! काव्याचे माहेरघर हृदय... कवीचा सगळा मनोव्यापार तिथूनच चालतो. सतत नवनिर्मितीचा ध्यास त्याला लागलेला असतो. त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याला त्याच्या कल्पनेचे कोंभ फुटलेले दिसतात. त्याच्या या अशा वागण्याने व्यवहारी जगासाठी तो ठार वेडा असतो. कारण हृदयापेक्षा आमचे डोकेच आमच्या सर्व व्यवहारांच्या मुळाशी असते. त्यामुळेच की काय, जगभरातल्या कवींना माणसांपेक्षा निसर्ग जवळचा वाटतो. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!’ म्हणणारे तुकोबा असतील किंवा इतर सगळ्या कवींसारखेच ‘लगडून असतो नेहमीच माझ्याशी गावाभोवतीचा शिवार’ म्हणणारे कवी उत्तम लोकरे!
- डॉ. संजीवनी तडेगावकर
मु. पो. घुगी, ता. जि. उस्मानाबाद, अशी बापजाद्यांच्या आधार कार्डवरची ओळख देणारे लोकरे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले. त्यामुळे गावशिवार हे त्यांच्या कवितेचे मुख्य सूत्र आहे. फाटक्या संसाराची विणतूण करणारी आई वारसाहक्कात लेकाच्या हाती सुई-दोरा देते, जी पुढच्या आयुष्यात सततच कवीच्या कामी येते. कधी उधडलेला संसार, तर कधी मनाला शिवत बसण्यासाठी! वेगवेगळ्या अर्थाचा ‘मुक्का’ मार सोसताना त्यांची जेव्हा दमछाक होते, तेव्हा ते व्याकूळ होऊन म्हणतात, ‘माझा देह! जखमांचं एक अढळ साम्राज्य! आणि! आतल्या वेदनांचा मी अजिंक्य सम्राट.’
सततच्या दुष्काळात होरपळलेला मराठवाडा आणि इथला शेतकरी... प्राणपणाने जतन केलेल्या हिरव्या कोंभांनी माना टाकताना पाहून कासावीस होतो, तेव्हा जन्माचा उन्हाळा त्याच्या डोळ्यात दाटून येतो. अशावेळी किती दिवस उसनं अवसान आणून त्यानं रोजचं मरण दाराच्या तोरणात लपवावं? असा प्रश्न कुठल्याही शेतीनिष्ठ मनाला पडल्यावाचून राहत नाही. यासंदर्भात लोकरे लिहितात, ‘चिमूटभर सुखाच्या प्रतीक्षेत/ मुक्या भविष्यावर/ भरवसा ठेवून/ अशी किती उगाळावीत कुणब्यानं/ आपली हाडं रानातल्या उन्हात.’
निराशाग्रस्त वर्तमान मनाला पांगळं करतो म्हणतात, ते उगाच नाही. पंक्चरलेल्या फुग्यासारखं मरगळून गेलेलं आयुष्य भूतकाळाचा आधार घेऊन हिरवळीच्या दिवसांचा मागोवा घेऊ पाहातं, तेव्हा रानवाºयासारखं अवखळ पोरसवदा वय सांभाळत मोठ्या होत जाणा-या शेतक-याच्या ‘पोरी’ मोठ्या समंजस वाटतात. विव्हळणा-या मनावर दगड ठेवून येणाºया प्रसंगाला कसं निभावून न्यायचं? याचं बाळकडू त्यांनी लहानपणापासूनच आजी-आई-मावशी यांच्याकडून घेतलेलं असतं. घरात आल्या-गेल्या पै-पाहुण्यांपासून ते झाडं-झुडपं, जीव-जित्राबांसोबत दगडा-धोंड्यांवरही त्या मनापासून प्रेम करतात. रीतिभाती... देवभोळ्या आणि दैवभोळ्या श्रद्धा जिवापाड जपतात. देण्या-घेण्याच्या, खाण्या-पिण्याच्या दैनंदिन जीवनात स्वत:ला सगळ्यात शेवटी ठेवतात. स्वत:ला वगळून हे असं केवळ इतरांसाठीच आजन्म निमूटपणे जगणं, कसं जमतं त्यांना? त्यांच्या या बेदखल त्यागाचं केविलवाणं रूप पाहून मन तुटत राहातं... त्यामुळेच तर उत्तम लोकरे लिहितात;
माझ्या गावच्या पोरी
कालचं मरण आज
चुलीत जाळतात नि
भरून घेतात उरात
उद्यासाठी
‘शिळ्या’
भाकरीतली नवी ऊर्जा...
अगदी तल्लीनतेनं सांगावं मन लावून ऐकणा-याला... इतक्या प्रामाणिक भावनेनं लोकरे कवितेतून व्यक्त होतात. जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करताना कमालीचे हळवे होतात. ‘सपन’ आणि ‘व्हावं लगे नवं नवं’ हे त्यांचे कवितासंग्रह निटनेटकी कविता घेऊन रसिकांच्या भेटीला आलेले आहेत.
(लेखिका जालना येथील ज्येष्ठ कवयित्री आहेत.)