संघर्षमय जीवनाच्या दु:खाची ठणक : भोगवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:49 PM2017-09-10T13:49:52+5:302017-09-10T13:50:16+5:30

बुकशेल्फ : साहित्य हा समाजमनाचा आरसा असून, समाजात प्रतीत होणारे चित्रण साहित्यात प्रतिबिंबित होत असते. म्हणूनच समाजमनात साहित्याला अत्यंत महत्त्व आहे. साहित्यामधून ग्रामसंस्कृतीपासून, तर देशापर्यंतचे संस्कृतीचे चित्रण आपल्याला वाचायला आणि पाहावयास मिळते. साहित्यामुळेच मानवाच्या सुखदु:खाचा आलेख आपल्याला वाचायला मिळतो.  

Hardships of struggling life: Bhogvata | संघर्षमय जीवनाच्या दु:खाची ठणक : भोगवटा

संघर्षमय जीवनाच्या दु:खाची ठणक : भोगवटा

Next

- प्रा . देवानंद पवार 
 

झोपडपट्टीत राहणारी आणि महालात राहणारी माणसे यात जमीन-अस्मानचा फरक आहे. झोपडीतील दु:ख पचवणारी माणसे ही वेगळीच असतात. जीवनाचा मथितार्थ त्यांनाच कळतो ज्यांना प्रत्येक वेळी संघर्ष करावा लागतो. दु:खाची कारणे अनेक आहेत, जातीयता, दारिद्र्य हे तर आमच्या पाचविलाच पुजल्यासारखे आहे. तरी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड संघर्षमय जीवनातून आजचा आणि कालचा दुबळा माणूस सबळ झाला. यामुळे येथील बहुजणांची जीवन जगण्याची पद्धत बदलली आणि आम्हीही माणसे आहोत म्हणून येथील पिचलेला, दबलेल्या द-याखो-यांतील माणसाला शिक्षणाच्या माध्यमातून जागे केले आणि आजरोजी तो माणूस म्हणून स्वाभिमानाने जीवन जगतो; परंतु आजही जर अशा काळजाला पीळ आणणा-या साहित्यकृती निर्माण होत असतील, तर आम्ही कुठे आहोत? हा प्रश्न चिंतन करायला लावतो.  

जीवन जगताना काळ-वेळ ही सारखी नसते. म्हणून कुणाचा भूतकाळ चांगला असतो, तर कुणाचा रक्तबंबाळ. रक्तबंबाळ भूतकाळात डोकावताना मन करपून जाते आणि आपण भोगलेल्या वेदना या दुस-याच्या जीवनात कधीच येऊ नयेत, असे आपण मनोमन म्हणतो. याच दु:खाची क्षमता कमी व्हावी म्हणून आपण लिहून मोकळे होतो. याच प्रकारे कवी, लेखक सुदाम मगर यांनी भोगलेले जीवन ऑटोरिक्षा चालवण्यापासून ते ब्रेड विक्रीपर्यंतचा आलेख त्यांच्या जीवनवृत्ताचा एक्स-रे म्हणजे ‘भोगवटा’ हे स्व-कथन होय.

‘भोगवटा’ हे सुदाम मगर यांचे स्व-कथन असून, त्यांनी जीवन जगतानाचे दैनंदिन सूक्ष्म पैलू रेखाटलेले आहेत आणि ते या लिखाणात यशस्वी झाले. त्यांनी जे भोगले ते रेखाटले. या जीवनवृत्ताच्या लेखनात दैनंदिन वास्तव रेखाटून ते मोकळे झाले. सांगायचे तात्पर्य म्हणजे त्यांच्या मनातील खदखद कानात सांगायच्या गुजगोष्टी त्यांनी मंचावर येऊन सांगितल्या. काहींना त्या नको वाटतात; पण लेखक या नात्याने त्यांनी निर्भीड लिहून मन मोकळे केले म्हणून या भोगवटा जीवनवृत्तात स्व-कथनात आलेली काही नात्यागोत्यातील पात्रे त्यांनी जिवंत रेखाटून मराठी साहित्याला जिवंत आणि वास्तवतेचे भान निर्माण करून दिले. 

भोगवटा हे स्व-कथन जिवंत, जातिवंत आणि प्रतिभावंत असल्यामुळे येथे ओढूनताणून शब्दांची कळा पाहावयास मिळत नाही. हा जिवंत माणसाचा आलेख वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्व-कथनातील बोली ही अस्सल मराठवाड्यातील असल्यामुळे भाषेची लय, संवादशैली काळजावर गोंदून ठेवते. ग्रामीण भागातील आलेले चित्रण मनाला बहरून टाकते. लेखकाची निवेदनशैली प्रभावी आहे. या स्व-कथनाचे विशेष म्हणजे व्यक्तिरेखांतील जिवंतपणा हा दिसून येतो. 

लेखक सुदाम मगर यांची माय सकूबाई, काका शिवाजी, दादा भीमराव, अन्सामाय, भाचा शांताराम, मित्र डुब्या, घरमालकीण केशरबाई, पत्नी पुष्पा, नाटकवेडा सिद्धार्थ, मैत्रीण वैशाली, लेखकमित्र योगिराज, भाचा दादाराव, शालिकराम, अशा ठसठसीत व्यक्तिरेखा निर्भीडपणे चितारलेल्या आहेत. त्यांच्या सहवासातील कडू-गोड आठवणींनी लेखक भारावलेले आहेत.  मायेचे मायपण रेखाटत असताना लेखकाची आई ही त्यांची आई सर्वव्यापी आई होऊन जाते आणि आई म्हणजेच सर्व काही. मायबद्दलची भावना मगर यांनी खूपच सुंदर पद्धतीने रेखाटली म्हणून मी त्यांना सलाम करतो.  
 

Web Title: Hardships of struggling life: Bhogvata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.