विज्ञानाचे अडाणी गोळे
By सुधीर लंके | Published: September 9, 2017 12:00 AM2017-09-09T00:00:13+5:302017-09-09T00:00:24+5:30
मेधा खोले या विज्ञानात नेमक्या काय शिकल्या असतील? असा प्रश्न पडतो राहून राहून. त्याच नाही अशापद्धतीने सनातनी प्रथांचे समर्थन करणारी मंडळी विज्ञान नावाचा विषय केवळ तोंडी लावण्यापुरता व पोटापाण्यापुरता वापरतात की काय? असाही एक मोठा प्रश्न या घटनेतून प्रस्तुत होतो. विज्ञानाचे असे अडाणी गोळे या देशाला व समाजव्यवस्थेला कोठे नेऊन ठेवणार आहेत?
मेधा खोले या विज्ञानात नेमक्या काय शिकल्या असतील? असा प्रश्न पडतो राहून राहून. त्याच नाही अशापद्धतीने सनातनी प्रथांचे समर्थन करणारी मंडळी विज्ञान नावाचा विषय केवळ तोंडी लावण्यापुरता व पोटापाण्यापुरता वापरतात की काय? असाही एक मोठा प्रश्न या घटनेतून प्रस्तुत होतो. विज्ञानाचे असे अडाणी गोळे या देशाला व समाजव्यवस्थेला कोठे नेऊन ठेवणार आहेत?
जातीने ब्राम्हण नसताना घरात येऊन गणपतीचा प्रसाद केला म्हणून पुण्यातील हवामानशास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला. पुण्यातील या घटनेने समाजस्वास्थ ढवळले आहे. सोशल मीडियावरील भिंती या घटनेबाबत भरभरुन बोलत आहेत. कायद्यात काही गुन्हे हे दुर्मीळातील दुर्मीळ समजले जातात. तशाच पद्धतीचा हा प्रकार आहे. असाही काही गुन्हा एखादा शिकलेला माणूस दाखल करु शकतो हे पाहून डोके चक्रावून जाते.
विकिपीडियावर खोले यांचे प्रोफाईल वाचायला मिळाले. खोले या पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. पदार्थविज्ञानात एम.एस्सी आहेत. हवामानशास्त्र विषयात विद्यावाचस्पती आहेत. स्पर्धा परीक्षेतून त्या हवामानशास्त्र विभागात आल्या व उच्च पदावर पोहोचल्या. अशा बाई आपल्या व्यक्तिगत जीवनात सोवळेओवळे पाळतात.
पदार्थविज्ञान हे अजैविक शास्त्र आहे. हे शास्त्र द्रव्य, ऊर्जा आणि ऊर्जारुपांतर यांचा अभ्यास करते. प्रत्येक वस्तूत एक ऊर्जा सामावलेली असते. ही ऊर्जा म्हणजेच आपला भवताल. पदार्थरुपी ऊर्जा आणि उत्सर्जित होणारी ऊर्जा या दोनच गोष्टी विश्वात आहेत. या दोन्ही ऊर्जा एकमेकांत रुपांतरित होतात म्हणून ही सृष्टी फुलते, असे आईनस्टाईनचा सिद्धांत सांगतो. उदाहरणार्थ प्रकाशाच्या रुपाने मिळणारी ऊर्जा ही सृष्टी अनंत कारणांसाठी वापरते. सृष्टीतील ही ऊर्जा सर्वांसाठी समान आहे. ती जात-धर्म-व्यक्ती असा भेद करत नाही. थोडक्यात विज्ञान हे सर्वांसाठी समान आहे. जात, धर्म हे नंतर मानवाने आपल्या सोयीसाठी निर्माण केले. हिंदुत्त्ववादी व सर्वच धर्मांचे ठेकेदार हे आपणा स्वत:ला प्रचंड ताकदवर मानत असले तरी, चंद्र, सूर्य, पाणी या गोष्टी ते निर्माण करु शकलेले नाहीत. आपली ही मर्यादा ओळखून सर्वांनी जात-धर्म याबाबत अभिमान बाळगण्याची गरज आहे.
प्रश्न असा आहे की पदार्थविज्ञान व विज्ञानाची कुठलीही शाखा जर जात-धर्म मानत नाही, तर खोले का मानतात? ते नेमके कुठले पदार्थविज्ञान शिकल्या? शाळा, महाविद्यांलयातून विज्ञान शिकविले जाते. विज्ञान ही एक विद्याशाखाच आपणाकडे आहे. तिच्या प्रवेशासाठी झुंबड उडते. मग हा वैज्ञानिक दृष्टिकोन पुढे कोठे जातो? कोणत्याही महिलेने शिजविलेल्या अन्नात सारखीच प्रथिने असतात हा साधा सिद्धांत खोले यांना का समजत नाही? खोले या विज्ञानाचा आधार घेऊन हवामानाचे अंदाज सांगत होत्या की पंचांग पाहून? असा प्रश्न काही नेटिझन्सने उपस्थित केला आहे, तो रास्तच आहे.
खोले यांचे याही परिस्थितीत समर्थन करणारी मंडळी आहेत. सोशल मीडियावर ते खोले यांच्या कृतीचे समर्थन करत आहेत. एका महाशयांनी तर लिहिले आहे, ‘ब्राम्हणांना धार्मिक भावना आहेत हे खोले यांनी दाखवून दिले.’ एका वाहिनीवर बोलताना एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणाला ‘हा जातींमधला वाद नाही. कामगार व मालक यांच्यातील झगडा आहे’. दुसरे एक गृहस्थ म्हणाले, ‘पुजाविधीत दुसºया जातीच्या हातचे खायचे नाही हा ब्राम्हण कुटुंबात नियमच आहे’.
आपण विज्ञान घरात घेतले व जाती घराबाहेर भांडण्यासाठी काढल्या आहेत. विज्ञानाच्या या अडाणी गोळ्यांचे करायचे काय? हा मोठा प्रश्न व्यवस्थेसमोर आहे. देशाच्या संरक्षणमंत्रीपदी महिलेला संधी मिळाल्याचे सर्व स्तरातून स्वागत झाले. लष्कर हे देखील आज विज्ञानाचा आधार घेऊनच सज्ज झाले आहे. पण, याच संरक्षणमंत्री पुरोहिताच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारतात तेव्हा काय संदेश जातो?
एक महिला ट्रिपल तलाकपासून मुक्ति मागते आहे, दुसरी महिला आपल्याच भगिनीच्या हातचे अन्न नाकारते आहे, या सर्व बाबींचा अर्थ कसा लावणार. धर्म ही अफूची गोळी आहे, असे मार्क्स म्हणतो. धर्माने जगण्याचे तत्वज्ञान द्यायला हवे. पण, धर्म हा विवेक गहाण टाकायला शिकवितो आहे. परजातीच्या मुलामुलींशी विवाह करु नका, असे ठराव आता जातीच्या संमेलनांतून होतात. अमूक जातीचा व गोत्राचा वर-वधू हवी अशा जाहिराती बिनदिक्कत छापून येतात. विज्ञाननिष्ठा नावाची संकल्पना आपण गुंडाळून ठेवल्याची ही सगळी उदाहरणे आहेत. विज्ञान शिकण्याऐवजी आपण अडाणी गोळे तर तयार करत नाहीत?