महादेव टाका डोंगर : लोंज्याचा किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:18 PM2017-08-27T14:18:49+5:302017-08-27T14:25:10+5:30
स्थापत्यशिल्पे : मराठवाड्यातील किल्ल्यांचे वर्गीकरण करताना किल्ल्यांचे आकार, रचना आणि भौगोलिक स्थान यावरून काही ढोबळ स्वरूपाचे आराखडे बांधता येतात. काही किल्ले आकाराने मोठे वैशिष्ट्यपूर्ण व लढाऊ रचनांचे आणि गडावर जास्त शिबंदी मावेल असे आहेत. यात कंधार, उदगीर, धारूर, अशा दक्षिण मराठवाड्यातील किल्ल्यांचा समावेश होतो. वैशागड, वेताळवाडी, अंतूर हे उत्तरेकडील सीमा बांधणारे किल्ले हे याच श्रेणीत येतात. त्यात देवगिरी तर दुर्गश्रेष्ठच. काही छोटे, कमी शिबंदी मावेल असेल, टेहळणीसाठी जास्त उपयोगी असे आहेत. अशा किल्ल्यांमध्ये पेडका आणि सुतोंडासारखे किल्ले तर येतीलच; पण औरंगाबाद जिल्ह्यात त्याहूनसुद्धा छोटे असे काही किल्ले आहेत. आज त्यातील एक लोंज्याचा किल्ला किंवा स्थानिक भाषेत महादेव टाक्याचा डोंगर.
- तेजस्विनी आफळे
मराठवाडा आणि खान्देशाच्या सीमेवर कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात लोंझा गावाजवळ हा महादेव टाक्याचा डोंगर आहे. येथील शिवलिंगामुळे स्थानिकांमध्ये या डोंगराला धार्मिक ओळख प्राप्त झाली आहे. डोंगररांगेतून सुटून एकलकोंडा उभ्या असलेल्या या डोंगराची उंची पायथ्यापासून सुमारे २८० फूट आहे. काही वर्षांपूर्वी अंतूर किल्ला व या परिसराची गुगल नकाशांद्वारे माहिती घेत असताना अंतूर किल्ल्याच्या पश्चिमेला उभ्या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष असल्याचा शोध ठाणे-नाशिक येथील राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर या गिरीप्रेमींना लागला. दोघांनी प्रत्यक्ष डोंगराला भेट देऊन मोजमापे व छायाचित्रे घेत किल्ला व येथील अवशेषांना प्रकाशात आणले. लोंझा गावाच्या सान्निध्यामुळे, स्थानामुळे लोंज्याचा किल्ला, असे नामकरण झाले. हे आपल्या ऐतिहासिक ठेव्याच्या शोध-संशोधनामध्ये आधुनिक साधनांच्या वापराचे अगदी सोपे आणि उत्तम उदाहरण मानता येईल.
तिस-या दुर्ग साहित्य संमेलनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या दुर्गप्रेमीच्या अंकात नि.रा. पाटील यांनी या किल्ल्याबद्दल अधिक माहिती प्रसिद्ध केली. त्यांच्या मते या डोंगराच्या दक्षिणेला असलेली गौताळा डोंगररांगेची सोंड आणि डोंगर यामधल्या खिंडीतील बांधीव पाय-या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला परिसरातील भिल्ल पुंडाईचा नायनाट करण्यासाठी ब्रिटिश फौजेतील भिल्ल बटालियन गौताळा डोंगररांगेत वास्तव्याला असताना बांधलेल्या असाव्यात. आज तिथे सिमेंट मध्ये बांधलेल्या पाय-याही दिसतात.बांधून काढलेल्या पाय-यांनंतर खोदीव पाय-यांनी डोंगर चढून जाताना माथ्याला पोहोचण्याआधी डावीकडे एक लहान आकाराचे आणि एक चार खांबांवर तोललेली प्रशस्त अशी लेणी दिसते.
प्रशस्त लेणीपलीकडे तीन मोठी खांबटाकी आहेत. आज प्रशस्त गुहेत शिवलिंग स्थापलेले असून, एक साधूबाबा वास्तव्याला असतात. या शिवलिंगाचा काळ फार जुना नसावा. खिडक्या, दारांना बसवलेल्या सिमेंटच्या चौकटी आणि लोखंडी जाळ्यांमुळे लेण्याला आधुनिक स्वरूप आले आहे.गडमाथ्यावर पाण्याची अनेक टाकी आणि खांबटाकी सुटी किंवा समूहांमध्ये खोदलेली आढळतात. येथे इमारतींच्या जोत्यांचे अवशेष दिसतात. काही ठिकाणी घडीव दगडात बांधलेली तटबंदीचे अवशेष तग धरून उभे असलेले दिसतात, तर काही ठिकाणी ते काळानुरूप मातीच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. वरील अवशेषांव्यतिरिक्त उत्तरेला नागद गावाच्या दिशेला उतरणा-या खोदीव पाय-या, पिराची मजार वगळता इतर काहीही अवशेष दिसत नाहीत. पिराच्या अस्तित्वावरून गडाला पीरबर्डी किंवा पीर असलेली टेकडी म्हणूनही ओळखले आहे. आज किल्ल्याच्या निर्मितीविषयी अंदाज बांधणे अवघड आहे.मात्र, अभ्यासक नि.रा. पाटील तटबंदीच्या बांधकामावरून किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन शाही कालखंडाच्या ही आधीची असावी, असा तर्क आपल्या लेखात मांडतात. तसेच एकंदर भौगोलिक स्थान व रचनेवरून किल्ल्याची निर्मिती कदाचित टेहळणीसाठी झाली असावी, असा विचार संयुक्तिक वाटतो. पुरातात्विक संशोधनाअभावी आपल्याला या किल्ल्याचा इतिहास, त्याचे कार्य आणि तेथे घडून गेलेल्या घटनांविषयी काहीही पुरावा अजून तरी मिळालेला नाही. मात्र, हा किल्ला आणि असे अनेक इतिहासाचे शिलेदार आपल्या भेटीची आणि पुढील संशोधनाची आस बाळगत उभे आहेत.
(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)