मंदिरांचा मराठवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:30 PM2017-08-07T15:30:54+5:302017-08-07T15:44:21+5:30
मराठवाडा हा मंदिरांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशामध्ये पुरातन काळापासून मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये विविध काळातील राजा-महाराजांनी हातभार लावला. या मंदिरांना श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व असते. या महिन्यामध्ये अनेक मंदिरांमध्ये भाविक मनोभावे ईश्वराची पूजा करतात. यातील काही मंदिरांची ही ओळख.
-सुधीर महाजन
हजार वर्षांपूर्वीची मंदिरे आजही मराठवाड्याच्या सुदूर भागात दिसतात किंबहुना ती पर्यटकांचे आकर्षण बनली आहेत. इसवी सनाच्या दुसºया शतकापासून महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शिल्पकला बहरली, अजिंठा, वेरूळसारखी कलाकृती साकारली, ती पुढच्या १४ व्या शतकापर्यंत छन्नी-हातोड्याच्या घावातून अप्रतिम शिल्पे साकारली गेली. हजार-बाराशे वर्षे ही कला येथे बहरली. पुढे यादवांच्या काळात मुस्लिमांच्या आक्रमणानंतर तिचा -हास झाला. त्या काळातील ही मंदिरे आजही श्रद्धेची ठिकाणी आहेत आणि पर्यटन केंद्रे बनली. हा काळानुरूप झालेला बदल आहे. अशी जवळपास सव्वासे मंदिरे आजही चांगल्या-वाईट अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे यातील बहुसंख्य शिवमंदिरे आहेत. शिवमंदिरांचा विचार केला, तर औंढा नागनाथ, होट्टल, निलंगा, बीड, अन्वा, अंबाजोगाई ही देवस्थाने आणि शिल्पे या दोन्ही अर्थाने प्रसिद्ध; परंतु याशिवाय मराठवाड्यातील खेडोपाडी अशी अनेक दुर्लक्षित मंदिरे आहेत. त्यांचे महत्त्व पंचक्रोशीपुरते मर्यादित राहिले. अशा मंदिरांमध्ये अंभई, रहिमाबाद (जि. औरंगाबाद), पाली (बीड), तेर (उस्मानाबाद), भोकरदन (जालना), केसापुरी (बीड) अशा अनेक मंदिरांचा उल्लेख करता येईल.
या हजार-बाराशे वर्षांच्या मंदिरांच्या इतिहासात ११ आणि १२ वे शतक उल्लेखनीय म्हणता येईल. चालुक्य आणि यादव ही दोन राजघराणी या काळात मराठवाड्यात होऊन गेली. त्यांच्याच काळात ही मंदिरे अस्तित्वात आली. धार्मिकदृष्ट्या विचार करता सातवाहनांच्या पूर्वीपासून या प्रदेशावर बौद्ध धर्माचा पगडा होता, तो वाकाटकांपर्यंत. पुढे चालुक्यांनी शैव पंथाची कास धरली आणि पुढे यादवही शिवभक्तच होते. त्यामुळे या दोन राजवटींमध्ये शिवमंदिरांची निर्मिती झाली आणि मंदिरांवरील शिल्पकला बहरली, ती आजही दीड हजार वर्षांनंतर आपण अनुभवतो. आडमार्गांवरील गावांमध्ये आजही काही शिवमंदिरे आहेत. अंभई हे सिल्लोड तालुक्यातील गाव अजिंठा डोगररांगांमध्ये वसलेले. १२ व्या शतकातील शिवमंदिर हे तेथे चांगल्या स्थितीत आहे. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींवरील कोरीव कामाप्रमाणेच प्रवेशद्वारही कोरीव आहे. बाह्य भागावर काही मिथुन शिल्पे आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भगृहे असणारे मंदिर आज कळस वगळता चांगल्या स्थितीत आहेत. हा कळस नव्याने बांधल्याचे आढळते. १२ व्या शतकात अजिंठ्याच्या डोंगररांगांत अंभईशिवाय हट्टी आणि मुर्डेश्वर या दोन ठिकाणी शिवमंदिरे आहेत.
याच परिसरातील आणखी एक मंदिर रुद्रेश्वराचे. हे मंदिर नसून लेणी आहे; मात्र हे स्थान गणपतीचे, ही गणेश लेणीच. गणपतीची भव्य कोरीव मूर्ती आणि शेजारी नृसिंहाची मूर्ती. या ठिकाणी शिवाची स्थापना नंतर केली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. १८ व्या शतकात गणेशभक्त यदू माणिक याने या लेणीमध्ये अडीच वर्षे तपश्चर्या केली आणि गणेश पुराणावर टीकाग्रंथ लिहिला होता. पुढे त्याचे वास्तव्य वेरूळ येथे राहिले. असे असले तरी ही हिंदू लेणी आज गणपतीऐवजी महादेवाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. दुर्गम ठिकाणी असल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. याच रांगेत पुढे अजिंठा लेणीनंतर आमसरी येथील शैवलेणी आहे. याच परिसरात सिल्लोडजवळ रहिमाबादचे शिवमंदिर हे याच काळातील. विशेष म्हणजे हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे.
परभणी जिल्ह्यातील चारठाण हे खरे तर मंदिरांचे गाव म्हणायचे. कर्नाटकातील ऐहोलेसारखे त्याचे स्वरूप राहिले असते; पण कालौघात या वास्तू जतन झाल्या नाहीत. येथील नृसिंह मंदिर चांगल्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्यातील पालीचे नागनाथ मंदिर, चकलंबाचे शिवमंदिर, पाटोदा, माणूर, केसापुरी, साकोळ, अणदूर, नेर गंगाखेड, करंजखेड अशा वेगवेगळ्या भागांत ही मंदिरे आहेत. श्रद्धास्थाने असली तरी कालानुरूप बदल म्हणून पर्यटनस्थळे म्हणून त्यांचे महत्त्व वाढत आहे. श्रावण महिन्यात भक्तीबरोबर पर्यटनाचा आनंद लुटता येईल अशी किमान १०० ठिकाणे मराठवाड्यात आहेत; परंतु त्यांच्या जपवणुकीकडे स्थानिक लोक आणि प्रशासनाचे लक्ष नाही. स्थानिकांसाठी तर तो त्या गावचा ऐतिहासिक वारसा म्हणता येईल; पण तो जतन करण्याचे भान फारसे दिसत नाही.