उपरोधिक चिमटे काढणारी दासू वैद्यांची मिश्कील कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:40 PM2017-10-15T12:40:13+5:302017-10-15T12:48:13+5:30

रसगंध : ‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’ या कवितासंग्रहाचे कवी, कंदिलकाजळी हा ललित लेखसंग्रह व इतर नाट्य लेखनाचे लेखक, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘सावरखेड एक गाव’, ‘आजचा दिवस माझा’ व ‘तुकाराम’ या चित्रपटांचे गीतकार आणि विद्यार्थ्यांसाठी एक संवेदनशील प्राध्यापक म्हणून दासू वैद्य सर्वांना परिचित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गांभीर्याने काव्यलेखन करीत असल्यामुळे नव्वदोत्तर पिढीचे महत्त्वाचे कवी म्हणून त्यांची नोंद मराठी कवितेत घेतली जाते.

Mishkel poem of Dasu Vaidya | उपरोधिक चिमटे काढणारी दासू वैद्यांची मिश्कील कविता

उपरोधिक चिमटे काढणारी दासू वैद्यांची मिश्कील कविता

googlenewsNext

- डॉ. संजीवनी तडेगावकर

मानवी स्वभावाच्या मानसिक गुंतागुंतीचा नेमका आविष्कार करताना वैद्यांची कविता कधी तिरकस सूर लावताना दिसते, तर कधी मिश्कील होत जाते आणि कधी-कधी तर ढाळजात बसलेल्या आजोबाच्या धीरगंभीर दुख-या आवाजात हरवलेलं सत्य शोधण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी ते लिहितात, 
हे अनामिका! आकाशस्थ दयाळा,
तुझ्या कृत्यांचा रंग का रे काळा?
का हरवतो पाऊस एखाद्या प्रदेशातून
का तोडतोस हिरवं पान देठातून...

एकीकडे समाजामध्ये होत जाणारी मूल्यांची घसरण, वाढत जाणारी उथळवृत्ती, तर दुसरीकडे केविलवाणे दीनदुबळे कारुण्य. या कोंडीत सापडलेला संवेदनशील माणूस पुरता हैराण झाला आहे. कुणाचं काही ऐकावं, कुणाला काही सांगावं, यापासून घेतली जाणारी फारकत सगळं जागच्या जागी ठप्प करणारी असून, ही मानसिकता एकमेकांचा निर्मळ संवाद संपविणारी आहे. आजघडीला आजूबाजूला जरा बारकाईने पाहिल्यास कुठल्याही क्षेत्रात अगदी घरातसुद्धा जाणत्यांनी हाताची घडी करून तोंडावर बोट ठेवलंय आणि अजानत्यांनी जणू हैदोस मांडलाय. हे चित्र इतक्या विचित्र पद्धतीने बदलताना पाहून वैद्य म्हणतात,

लहानपणी टोचलेल्या कानाची भोकं
हळूहळू बुजून जावी
तशी संवादाची रंध्रं सपाट झाली
कशामुळे ठेवले गेले शब्दांचे आत्मे?
नुसतीच ओठांची हालचाल
शब्द काही पाझरेनात.

आशया-विषयाचे सर्व आयाम ओटी-ओच्यात घेऊन मराठी कविता समृद्ध झालेली असताना स्त्रीविषयक कवितांमधून आजपर्यंत निरागस मुलगी, त्यागी आई, समंजस, प्रेमळ आजी, सोशीक बायको, अल्लड प्रेयसी, भाबडी मैत्रीण आदी रूपात ती वाचकांना भेटली आहे. दासू वैद्यांच्या कवितेतील स्त्री मात्र आधुनिक विचारसरणीचा सुतोवाच करणारी आहे. करकच्चून बांधलेल्या व्यवस्थेच्या अंबाड्यातून सैल, मोकळी होत जाणारी आजची स्त्री जशी त्यांच्या कवितेत भेटते तशीच सुट्टीचं निमित्त साधून /न्हालेले ओले केस/खसाखसा पुसत। ती दरवाज्यात निवांत। वस्तूंवरची धूळ झटकली जाते। पसरलेली वर्तमानपत्रे-मासिकं । शिस्तीत लागतात पंख्याच्या एकसुरी वा-यात । डोलून थकलेल्या झाडांना । पोटभर पाणी मिळतं. अशी घर आणि नोकरी लीलया सांभाळणारी कर्तबगार ‘बायको’ ही अनुभवायला मिळते.

व्यसनाधीनतेनं अवेळीच मेलेल्या नव-याची तरुण बायको रात्रभर जागून शरीर, मन, भावना यांची मूठमाती करतानाही तिथेच भेटते. जेव्हा प्रेमाची गोष्ट संस्कृतीच्या नावाखाली दबून जाते तेव्हा सगळ्या शक्यतांचे अर्थ गळून पडतात. बहरलेल्या पळस-फुलाच्या लाल सावलीत पे्रयसीला उभं करून सूर्यफुलाच्या रानातली हळद तिच्यावर उधळण्याचा अतिशय रोमँटिक विचार करताकरताच झाडखोडाला मुळांचा आधार कसा नि किती महत्त्वाचा आहे याचं वास्तवभान कवी आपल्या कवितांमध्ये जपतो.

वास्तव परिस्थितीतून येणा-या संवेदना, स्मृती, कल्पना, विचार याची संगती मेंदू तीन प्रकारे लावण्याचा प्रयत्न करीत असतो. मानसशास्त्रीय, तर्कशास्त्रीय आणि सौंदर्यात्मक यापैकी तटस्थपणाने उपरोधिक, पण मिश्कील  शैलीत नोंदवलेल्या मानवी मनातील अंतर्गत विरोध हेच दासू वैद्य यांच्या कवितेतील मुख्य सूत्र आहे आणि तेच वेगळेपणसुद्धा!
(लेखिका जालना येथील प्रसिद्ध कवयित्री आहेत.)

Web Title: Mishkel poem of Dasu Vaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.