मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून

By अोंकार करंबेळकर | Published: July 18, 2018 11:34 AM2018-07-18T11:34:27+5:302018-07-18T18:16:48+5:30

आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, एक निर्जीव वस्तू आहे, असं समजून त्याचा मसाज सुरू झाला. यथेच्छ नाचून झाल्यावर माझ्या दोन्ही हातापायांची भेट घालण्यासाठी त्याचा आटापिटा! वाटलं, आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? 

My visit to Hamamkhana and community Salons of Mumbai | मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून

मुंबईच्या हमामखान्यातील कुस्ती आणि कामाठीपुऱ्यातील सलून

googlenewsNext
ठळक मुद्देआता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे. पण असं असतानाही मुंबईतला एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे. हे कळल्यावर या हमामखान्याला भेट द्यायची उत्सुकता आणखीच वाढली.

टर्किश आणि इराणी बाथच्या हमामबद्दल भरपूर ऐकले होते. नाटक-सिनेमा आणि प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतही त्याची भरपूर वर्णनं वाचलेली होती. मध्य-पूर्वेतले देश, ग्रीस, इराण, मोरोक्को इथल्या हमामांचे भरपूर फोटो इंटरनेटवर सापडतात. लख्ख चकचकीत संगमरवर, निळ्या-जांभळ्या काचांच्या खिडक्या, निळेशार पाणी वगैरे भरपूर वर्णन इंटरनेटवरही वाचायला मिळतं. घासून-पुसून अंघोळ झाल्यावर, अशा हमामच्या बाहेर गाद्यागिरद्या घातलेली जागा असते, तेथे तुम्हाला आराम करता येतो. आता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे. पण असं असतानाही मुंबईतला एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे. हे कळल्यावर या हमामखान्याला भेट द्यायची उत्सुकता आणखीच वाढली. मुंबईतल्या इमामवाडा या इराणी लोकांच्या वस्तीमध्येच हा हमामखाना आहे. या हमामखान्याबद्दल इंटरनेटवर एखाद-दुसरा लेख वाचायला मिळाला; पण फारशी माहिती नव्हती. स्वत: गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून इमामवाडा गाठला.

( जुनाटपण जागोजागी मिरवत शिल्लक राहिलेला हमामखाना)                                                                         छाया- दत्ता खेडेकर

इमामवाडा व भेंडीबाजारचा परिसर महंमद अली रस्त्यालाच लागून आहेत. एरव्ही रमजान आणि संक्रांतीच्या काळात हा परिसर गर्दीने गजबजून जातो. पतंगांच्या दुकानांमुळे इमामवाड्याला वेगळी ओळख मिळाली आहे. साधारणत: १९०५च्या आसपास इराणमधील दुष्काळी परिस्थितीमुळे इराणी लोकांनी जगभरात स्थलांतर सुरू केले. त्यातील भारतात आलेल्या लोकांनी इमामवाड्यात इराणी (मुघल) मशिदीजवळ जागा घेऊन राहायला सुरुवात केली. मग त्यांची हळूहळू रेस्टॉरंट्स, बेकऱी, स्वीटमार्ट्स शहरात सुरू झाली. भेंडीबाजार पोलीस स्टेशनपासूनच हमामचा पत्ता विचारायला सुरुवात केली; पण कोणालाच काही सांगता येईना. एक-दोन हॉटेलात विचारले, तरी फारशी माहिती मिळेना, शेवटी एका बुजुर्ग माणसाने सांगितले, सरळ गेल्यावर मुघल मस्जिद विचारा, त्याच्या शेजारी ‘नीम का पेड’ आहे, तोच इराणी हमाम. थोडंसं अंतर चालत गेल्यावर मुघल मशीद लागली. मशिदीला लागूनच, निळ्या-जांभळ्या फरशांचे तुकडे जोडून मोझेक केलेली ‘इराणी हमाम’ अशी अरबी आणि इंग्रजी अक्षरातली पाटी दिसली; पण खुद्द इराण आणि तुर्कस्थानातल्या हमामांच्या रूपाशी ही अजिबात मिळती-जुळती नव्हती. जुनाटपणा आणि थोडीशी अस्वच्छता, यामुळे ती उगाचच जास्त ऐतिहासिक वगैरे वाटायला लागली. 

लहानशा बोळातून आत गेल्यावर थेट हमामखान्याच्या हॉलमध्येच गेलो. इंटरनेटवरच्या इराणी हमामप्रमाणेच याची रचना होती; पण दोन्हींच्या रूपामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता. निळ्या, लाल, जांभळ्या, गुलाबी टाइल्सने चमचमणारे ते हमाम आणि इथला हमाम अगदीच वेगळा होता. अंघोळीची जागा असली, तरी इथल्या अनेक जागांना पाणी लागले नसावे, असे वाटले. काळवंडलेल्या, रंग उडालेल्या भिंती आणि सगळीकडे असणारा थोडासा ओशटपणा अंगावर येत होता. फोटोतले ते रंगीत प्रकाश पाडणारे दिवे, उन्हाची तिरीप पाडणारे झरोके, धुपदाण्या, कारंजे वगैरे इथे काही नव्हतं. चारही बाजूंनी मध्येच कापलेल्या अर्ध्या अंड्यासारख्या ओवऱ्या आणि मधोमध एक हौद होता. त्या हौदात एका  नळातून पाण्याची बारीक धार पडत होती, ओवऱ्यावरती चार-पाच पोरं अंग पुसत, भांग पाडत बसली होती. हमामच्या या बाहेरच्या हॉलला ‘सर्बिनेह’ म्हणतात.

कोणीतरी गिऱ्हाईक आलंय म्हटल्यावर, एका ओवरीतला पन्नाशीचा माणूस सावरून बसला आणि मसाज-अंघोळीचे दर सांगू लागला. देढसो, ढाईसो और पाचसो; पण थेट अंघोळ करण्यापेक्षा जरा माहिती मिळवावी म्हणून थोडे प्रश्न विचारू लागताच, त्याच्या कपाळावर आठ्या येऊ लागल्या. नाव काय, कोठून आलात, कधीपासून आहात, अशा प्रश्नांमध्ये त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता. इतक्या सगळ्या प्रश्नांसाठी त्याने फक्त ‘महंमद अतिक मेरा नाम’ एवढंच उत्तर दिलं. अतिकसाहेब चांगलेच मितभाषी निघाले. मी कसनुसं हसून त्याला मोकळा करायचा अपयशी प्रयत्न केला; पण तो मितहाशीसुद्धा असावा, असे वाटले. शेवटी जास्तीत जास्त तुच्छता चेहऱ्यावर आणत तो म्हणाला, ‘कितनेका मसाज करने का है.’  
इथला पहिलाच अनुभव असल्यामुळे, मी दीडशेचा मसाज करायला तयारी दाखवली. 

होकार मिळताच मात्र, अतिक एकदम प्रोफेशनल झाला. माझ्याशी बोलता-बोलता त्याने एक-दोन बाटल्यांमधील तेलं मिसळायला सुरू केली. मग एक अर्धगोलाकार ओवरी त्याने मला देऊ केली आणि कपडे बदलायला सांगितले. एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्यानं दिलेल्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो.

लहानसा पॅसेज ओलांडून त्याच्याबरोबर आतल्या तशाच एका हॉलमध्ये गेलो. गरम पाण्यामुळे तिथे थोडं उबदार वाटत होतं. याला ‘खाझिनेह’ म्हणतात आणि गरम पाण्याच्या जागेला ‘गर्मखाना’. गर्मखान्यात मोठ्या टाकीत कोमट पाणी साठवलेलं होतं. पोरं त्यात बादल्या बुचकळत आणि जरा बाजूला जाऊन अंघोळ करत होती. अशा चार-पाच लुकड्या पोरांची खाली मन लावून अांघोळ चाललेली. खसाखस अंग घासत आपल्याच नादामध्ये ती पोरं गुंग होती. आतल्या हॉलमध्ये गेल्यावर अतिकसाहेबाच्या वागण्यात थोडा हुकूम आणि जरबही जाणवायला लागली. मोठ्याने बोलणाºया पोरांना गेल्या-गेल्या त्यानं गप्प केलं आणि मला फरशीवर झोपायचा 'हुकूम' सोडला. तेव्हाच जाणवलं, आपला अधिकार आता चालणार नाही.  त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितले.

(हा मधोमध टाकीत पाणी ओतत राहणारा नळ आणि दोन बाजूंनी अर्धगोलाकृती ओवऱ्या)                               छाया- दत्ता खेडेकर

मीही त्याच्या आज्ञेबर निमूट तसे करत गेलो. मग त्याने तेलाच्या बाटलीतून डोक्यावर तेल थापायला सुरुवात केली. पाठोपाठ चेहरा असं करत, त्यानं तेल चोपडायला सुरुवात केली. सुरुवातीला हा कृश अंगकाठीचा वाटलेला माणूस चांगलीच ताकद बाळगून आहे हे जाणवायला लागलं. हळूहळू तेल लावणारी बोटं जोर लावायला लागली. कामाच्या ठिकाणी हा माणूस चांगलाच प्रोफेशनल निघाला. आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, ती एक निर्जीव वस्तू आहे, असा समज त्याने करून घेतला असावा, इतका जोर लावून त्याचा मसाज सुरू झाला. हाता-पायाला तेल लावून झाल्यावर मी कसाबसा एक प्रश्न विचारला, ‘ये कैसा तेल है.’ त्यावर ‘सरसों’ असं उत्तर मिळालं, पण त्यात ‘सरसों’बरोबर ‘प्रश्न बंद कर, गप्प बस’ असेही त्याने न उच्चारलेले शब्द ऐकायला आल्यासारखे वाटले, म्हणून गप्प बसलो. 

आता त्याने पोटावर झोपायला सांगितलं. तेल लावून झाल्यावर अचानक एवढं जड काय वाटतेय, म्हणून मान वर करून पाहायचा प्रयत्न केला, तर साहेब चक्क माझ्या पाठीवर उभे राहिले होते. काही कळेपर्यंत पाठीपासून पायापर्यंत त्यांनी कालियामर्दन स्टाईल थयथय नाच सुरू केलेला. मला वर बघायची सोय नव्हती, पण या डान्सच्या वेळेस तो खूश असावा. कारण बहुतेक बऱ्याच महिन्यांनतर त्याला इतका आडवातिडवा विस्तार असलेलं गिऱ्हाईक मिळालं असावं, त्यामुळे मन लावून त्याने पायांनी कणीक तिंबायला घेतली होती. मला तोंडातून आवाज काढायलाही संधी न देता, यथेच्छ नाचून झाल्यावर तो उतरला. मग जरा ‘हुश्श’ म्हणेपर्यंत, त्याने माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हातांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

माझे धनुरासन, नौकासन आपल्या मनासारखे झाल्यावरच, त्याने हातापायांची सुटका केली. नंतर हातापायांचे आणखी हवे तसे व्यायामप्रकार करून घेतले. कधी माझा सुळावर चढवलेल्या आरोपीसारखा क्रॉस कर, मध्येच दोन्ही पोटरींवर पाय ठेव, तर कधी अचानक हाताने थाप मारून दचकवायचे, असे करत शेवटी त्याने बऱ्याच वेळानंतर तांडव थांबवले. वाटले आता संपले असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? पण त्याने तसेच झोपायला सांगितले आणि बाहेरून तो साबण आणि खरखरीत स्क्रबर घेऊन आला. एवढा जोर लावून तैलमर्दन झाल्यावर, त्याने एकाच हातात साबण आणि स्क्रबरने मला घासायला सुरुवात केली. हा स्क्रबर म्हणजे नारळाची शेंडी आहे की नायलॉनची जाळी हे अतिक अजिबात कळू देत नव्हता. ‘मी सगळी सेवा व्यवस्थित देतो; पण प्रश्न विचारू नका, भोचकपणा मुळीच चालणार नाही,’ असा सगळा मामला होता, म्हणून मीसुद्धा त्याला फार त्रास दिला नाही. जोरजोरात खराखरा घासून, त्याने सगळा तेलकटपणा काढून टाकला. त्याच्या या मर्दनानं खरं तर मस्त वाटायला लागलं होतं. पाठोपाठ अचानक त्यानं कोमट पाण्याच्या हौदातून बादलीभर पाणी आणून अंगावर ओतलं. आणि हौदाजवळ बुळबुळीत फरशीजवळ जाऊन उभे राहायला सांगितलं. सलग चार-पाच बादल्या भसाभस पाणी ओतून अांघोळ घातली. मग एक टॉवेल देऊ केला; पण मी माझा टॉवेल घरूनच नेला होता. 

बाहेर येऊन अंग पुसल्यावर खरंच हलकं वाटायला लागलं, पाठही मोकळी झाली होती. दीडशे रुपयात इतकी कुस्ती झाली म्हटल्यावर, पाचशेमध्ये काय केलं असतं, असा विचार मनात आला. ‘देढसो और पाचसो में क्या फर्क है’ असे विचारताच अतिक म्हणाला, ‘तो हम बाहरसे मसाला लेके आते है और वो लगाते है.’ आता जरा तोही मोकळा झाल्यासारखा वाटत होता. पैसे देऊन झाल्यावर, तो थोडा-फार बोलायला लागला. मूळचा उत्तर प्रदेशातून आलेला. गेली काही वर्षे इकडेच राहात होता. थोडी-फार माहिती दिल्यावर, त्याने एका पाटीकडे बोट दाखवले. ‘सोरायसिस आणि हार्ट अटॅकच्या रुग्णांना मनाई’ अशी हिंदी, उर्दू आणि गुजरातीमध्ये लिहिलेली ती पाटी होती. आपण भरपूर मदत केली, असे वाटून तो खूश होऊन त्याच्या जागेवर जाऊन बसला. कपडे बदलून मीही निघालो, तोच बाहेर हमामच्या मालकीणबाई भेटल्या. हिदायती कुटुंब गेली अनेक दशके हा हमाम चालवते. त्यांच्या पुढच्या पिढीला या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता, बरेचसे लोक परदेशातच राहायला गेले होते. या मालकीणबाई आणि त्यांचे यजमान अजूनही हमाम चालवतात. ‘आया करो बेटा, आपके लियेही है हमाम,’ असे म्हणून त्यांनी निरोप दिला; पण खरंच पुढची किती वर्षे हा हमाम चालेल, हे समजणं खरंच अशक्य आहे. एके काळी कदाचित इथे मोठ्या संख्येने लोक येत असावेत.

या हमामसारखेच काही सलूनही लोकांना अांघोळीसाठी पाणी देत असल्याचे वाचले होते. इराणी हमाममधून बाहेर पडल्यावर तिकडेच जावे, असा विचार केला आणि पायीच निघालो. कामाठीपुरा छोट्या-मोठ्या उद्योगांनी खचाखच भरलेला आहे. भंगार व्यावसायिक, वेल्डिंग, दुकाने अशी वाट काढत ही दोन सलून शोधायची होती, पण इथेही इमामवाड्यासारखाच प्रकार होता. भरपूर समांतर गल्ल्यांमुळे भरपूर चौकही. त्यामुळे शोधाशोधीत बराच वेळ गेला.
पत्ता विचारल्यावर ‘कौनसी गली, वो बताओ’ हाच प्रतिप्रश्न लोक विचारत. शेवटी एकदाचे नवाब सलून सापडले. सलूनचे मालक बिलाल अहमद आणि त्यांचे कामगार गिऱ्हाईकांची वाटच पाहात होते. नोटाबंदीमुळे नवाबचेही व्यवहार थंडावलेले. बिलाल अहमद यांचे आजोबा पन्नास वर्षांपूर्वी लखनौतून मुंबईला आले आणि त्यांनीच हे सलून सुरू केले. 

(कामाठीपुऱ्यातले नवाब सलून आणि 'पुरानी पेहचान है इसिलिये शुरु रखा है'' असं म्हणणारे त्याचे मालक बिलाल)

कामाठीपुरा, महंमद अली रस्ता परिसरात कामगार भरपूर संख्येने येत, पण बाहेरगावातून येणाऱ्या या कामगारांसाठी अंघोळीची कोणतीच सोय नसे; पण नवाबसारख्या सलूननी त्यांची सोय केली. २५ पैशात हंडाभर पाणी त्यांना अंघोळीसाठी दिले जाई. २५ पैशांपासून वाढत गेलेला हा दर आता २० रुपयांवर गेला आहे. बोलताना बिलाल थोडेसे दुखावलेले वाटले. महागाई आणि नोटाबंदीमुळे थोडे कातावले होते. ‘मैं ये धंदा बंद करना चाहता हूँ, पुरानी पेहचान है इसिलिये शुरू रखा है. जिथपर्यंत होईल, तितके दिवस चालवणार नाहीतर बंद करणार, मी माझ्या भावालाही कुर्ल्याला वेगळं दुकान काढायला सांगितलं. कटिंग-दाढीचे काम कोठेही करता येईल,’ असे सांगत त्यांनी सलून दाखवले. आतल्या बाजूस तीन चिंचोळी बाथरूम होती, ‘पूर्वी लोकांना कपडेही धुवायला आम्ही द्यायचो, पण आता ते परवडत नाही.’
बहुतांश पारंपरिक व्यवसायांप्रमाणे यांची नवी पिढीही या व्यवसायात फारशी इच्छुक नाही. बिलालचा निरोप घेऊन डंकनरोडवरचे असेच पी. जी. सलून पाहून तो परिसर सोडला. एके काळी या परिसरात अशी पंधरा-वीस सलून होती, त्यातली ही दोनच उरलीत. मुंबईतला कोणताही कोपरा खरवडला की, इतिहास दिसायला लागतो. इराणी हमाम आणि हे सलून बदलाच्या चक्रात स्वत:ला टिकवून ठेवण्याचा अखेरचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. त्यांची ही धडपड आणखी किती काळ टिकणार?.. मनात प्रश्न येतोच..
.............
भारतात केवळ दोनच हमाम!- भरत गोठोसकर (नागरी वारसास्थळांचे अभ्यासक)
सध्या भारतात केवळ दोनच हमाम शिल्लक आहेत. एक भोपाळचा आणि दुसरा हा इमामवाड्याचा. हा सगळा परिसरच इराणी लोकांचा आहे. मुघल मशिदीला इराणी मशीद असेही म्हणतात. या परिसरामध्ये इराणी लोकांची हॉटेल्स आणि दुकानेही आहेत, त्यामुळे हमामकडे वेगळे पाहणे योग्य ठरणार नाही. संपूर्ण इमामवाडाच नागरी इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नागरी वारसास्थळांच्या दृष्टीने या हमामचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माझ्या मते अशा हमामची डागडुजी आणि मूळ रचनेत बदल न करता, स्वच्छता व थोडे आधुनिकीकरण केल्यास, त्याच्याकडे लोकांची पावले वळतील. यातला स्वच्छता हा मुद्दा अग्रक्रमाने विचारात घ्यायला हवा. तुर्कस्थान आणि इराणने आपल्या हमामांचा पर्यटनासाठीही चांगला उपयोग करून घेतला आहे. आपणही असे केले नाही, तर काही वर्षांनी अशी स्थळे केवळ ऐकायला आणि फोटोतच पाहायचा मिळतील. नव्या पिढ्यांसाठी एवढे केलेच पाहिजे.
 

Web Title: My visit to Hamamkhana and community Salons of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.