निर्माल्य भक्तीचे, निर्माल्य उत्साहाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:48 AM2018-09-15T02:48:15+5:302018-09-15T02:49:57+5:30
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव महत्त्वाचा विषय झाला आहे
- रवि सपकाळे
महाराष्ट्रातील सर्वांत खास आणि महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी, आबालवृद्ध आणि बच्चेकंपनी आपल्या लाडक्या गणरायाच्या आमगनासाठी आतूर असतात. यंदादेखील संपूर्ण देशभरात मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा प्रत्येकाची भेटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेत आणि आपण सर्वांनी त्यांचे तितक्याच कौतुकाने स्वागतदेखील केले. कोणी त्यांच्यासाठी मोदक तयार केलेत, कोणी त्याच्यासाठी घर सजविले तर कोणी त्याच्या सर्व आरत्या अगदी तोंडपाट केल्या.
तसे पाहिले तर गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी कोणतेही विशेष असे काही नियम नाहीत, हा; पण गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा एक तितकाच महत्त्वाचा विषय झाला आहे. गणेशोत्सवानंतर समुद्र किंवा नदीच्या किनाऱ्यावर फेटफटका मारल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की, का हा विषय खरोखरच इतका आवश्यक आहे. समुद्र, नदी किंवा खाडी, तलाव, ओढ्याच्या किनाºयांवर तरंगत असलेले निर्माल्य, मखर यांचा खच तसेच अर्धवट विघटित झालेल्या आणि पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर आलेल्या मूर्ती पाहून, याची आपण इतके दिवस भक्तिभावे पूजा-अर्चा करत होतो आणि आता... हे बघून आपली आपल्याच शरम वाटल्याशिवाय राहत नाही.
देशभरात विशेष करून महाराष्ट्रातील अनेक घरांत गणपती बाप्पाची प्रतिस्थापना होते. शिवाय, प्रत्येक गल्लीबोळात त्या-त्या भागाचा राजा म्हणून गणराज विराजमान होतात. या सर्व बाप्पा मूर्तींची दिवसांतून तीन वेळा आरती होते. शिवाय, भाविकगण मित्रांच्या, नातेवाईकांच्या घरी, तसेच मोठमोठ्या नामांकित मंडळाद्वारे स्थापित बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्या वेळी ते मोठ्या भक्तिभावाने बाप्पाच्या चरणी वाहण्यासाठी सोबत फुले, हार, दूर्वा, नारळ, पेढे, प्रसाद आदी घेऊन जातात. त्यातील बहुतेक भाग इतर भक्तांना वाटण्यात जातो व शिल्लक राहिलेला भाग ज्यात, पुड्यांचे आवरण, पिशव्या, वाहिलेले आणि जुने झालेल्या फुलांचे हार, माचीस, अगरबत्तीचे खोके, नारळाच्या करवंट्या, सजावटीचे मखर, इत्यादी हे निर्माल्य होऊन फे कून देण्यात येते. फक्त महाराष्ट्रापुरता विचार केला तर कितीतरी घरे आणि मंडळांमधून दिवसाभरात हे निर्माल्य सतत तयार होत असते ज्याला अर्थातच, वाहत्या पाण्यात फेकण्याची पूर्वापार प्रथा चालत आलेली आहे. एकंदरच ढोबळमानाने विचार केल्यास, आपल्या लक्षात येईल की, आपण कितीतरी टन निर्माल्य फेकून देत आहोत. ज्यामुळे प्रदूषण वेगाने होते आणि या प्रदूषणाचा परिणाम आपल्यावरच होणार आहे, या वास्तवाकडे आपण कानाडोळा करीत आहोत.
आता अनेक पर्यावरणस्नेही, तसेच शासन अशा प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत, विविध गणपती विसर्जनाच्या ठिकाणी मोठमोठे निर्माल्य कलश ठेवण्यात येत आहेत, त्यातदेखील जैविक आणि अजैविक असे वर्गीकरण करण्यात येते आणि या कलशांचा उपयोग करून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार करण्यात येते आहे आणि हे खत गरजू शेतकºयांना नाममात्र शुल्कात किंवा मोफतदेखील मिळण्याची तरतूद करण्यात येत आहे. म्हणजेच, आपल्या घरातील बाप्पाच्या निर्माल्यामुळे एखाद्या शेतकºयाला खत मिळत आहे, तर याहून चांगले आणखी काय असेल. त्यासाठी आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे की, आपल्या घरात किंवा आपल्या मंडळात साचणाºया या निर्माल्याची योग्य ती वर्गवारी करून, विसर्जन करायच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्य टाकायचे आहे.
या वर्षीपासून सर्व मिळून प्रदूषण न करण्याचा, तसेच इतरांनादेखील त्यापासून परावृत्त करण्याचा संकल्प घेऊ या! निर्माल्य हे निर्माल्य कलशात टाकण्याचा श्रीगणेशा करू या.