एक नसलेला किल्ला : भांगशीगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:38 PM2017-10-01T12:38:32+5:302017-10-01T12:40:50+5:30

स्थापत्यशिल्पे : औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ल्यांची मालिका श्रेष्ठतम दुर्गवर देवगिरी किंवा किल्ले दौलताबादशिवाय अपूर्णच. तरीसुद्धा आपल्या लेखमालेत मराठवाड्यातील इतर दुर्गांची कहाणी सुफळ संपूर्ण झाल्यावर देवगिरीच्या सुरस गाथेची पोथी उघडावी, असा विचार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील देवगिरी सोडून इतर किल्ले पाहून आता दुस-या जिल्ह्याकडे वळावे, असा विचार केला आणि कुणीतरी म्हणेल, अरे, आमचा भांगशीगड राहिला. यामुळे किल्ला नसलेला भांगशीगड महत्त्वाचा.

A non-existent fort: Bhangshigad | एक नसलेला किल्ला : भांगशीगड

एक नसलेला किल्ला : भांगशीगड

Next

- तेजस्विनी आफळे

औरंगाबाद शहरातून दौलताबाद वेरूळच्या रस्त्यावर मिटमिटा गावानंतर डावीकडे चारी बाजंूनी खड्या कडेकपारीमुळे खंदा वीर उभा राहिल्यासारखा एक डोंगर ब-याच वेळ आपले लक्ष वेधून घेत असतो. डोंगररांगांपासून फटकून उभा असणारा, थोड्या अंतरावरच्या दौलताबादच्या डोंगरासारखाच एकलकोंडा असा हा भांगशीमातेचा डोंगर. खूप वेळा एखादी दंतकथा इतिहासाचा मुखवटा घालून आपल्यासमोर येते आणि हळूहळू तोच आपण खरा इतिहास मानायला लागतो, तसेच काहीसे भांगशीगडाच्या बाबतीत झालेय. 

लहानपणापासून दौलताबादला गेल्यावर एक गोष्ट सांगितली जायची ती यादवांच्या सुखसंपन्न देवगिरीवर झालेल्या अल्लाउद्दीनाच्या हल्ल्याची. त्या गोष्टीची सुरुवात व्हायची ती भांगशीगडापासून. अल्लाउद्दीन मोजक्या फौजेला घेऊन देवगिरीवर हल्ल्यासाठी वायुवेगाने दौडत येत असताना त्याला एक भक्कम कडेकपा-या असलेला डोंगर दिसला आणि तोच किल्ले देवगिरी असल्याची खात्री होऊन त्याने ख-या देवगिरीच्या आधी त्याच डोंगराला हल्ल्याच्या दृष्टीने वेढा घातला, अशी ती गोष्ट. 

मात्र, देवगिरीचा झालेला पाडाव आणि या डोंगरावरील स्थापत्यरचनेचे अवशेष पाहता ही गोष्ट एका अर्थाने दंतकथाच. मात्र, एका गोष्टीनुसार अल्लाउद्दीनला रोखायचा पहिला प्रयत्न लासूरच्या पंचक्रोशीत शूरवीर पण अयशस्वी झाला. तेथून देवगिरीकडे जात असताना अल्लाउद्दीनास भांगशीगड दिसला असेल, यात शंका नाही. असा हा भांगशीगड आज सर्वार्थाने किल्ला नाही; पण त्याचे भौगोलिक स्थान टेहळणीसाठी योग्य असेच आहे. देवगिरीवर येणा-या शत्रूवर नजर ठेवायचे काम येथून नक्कीच झाले असेल. मग याला गड का म्हणायचे, तर आपल्याकडे अनेक देवी-देवतांच्या डोंगरावरील निवासस्थानाला गड म्हणण्याची पद्धत आहे. जेजुरीचा गड, माहूरगड ही काही उदाहरणे... तसाच आपला भांगशीमातेचा गड. या डोंगराची छोटी मुरमाड घसरण चढून गेल्यावर कातळात खोदलेल्या पाय-या दिसतात. 

डोंगरमाथ्यावर काही पाण्याची छोटी-मोठी टाकी आणि जमिनीत कोरलेली लेणी सोडून इतर कुठल्याही जुन्या काळातील मानवी अस्तित्वाच्या खुणा नाहीत. या खोदकामाच्या प्राथमिक स्वरूपाकडे पाहून लेण्यांचा काळ ठरवणे अवघड आहे. आज गडावर सिमेंट काँक्रीट वापरून बांधलेले भांगशीमातेचे मोठे मंदिर आहे. जत्रेच्या वेळी भाविकांची येथे मोठीच झुंबड उडते. अशा या दौलताबादच्या वाटेवरच्या भांगशीगडाला एकदा तरी भेट देणे आवश्यकच. अशा प्रकारे या औरंगाबाद जिल्ह्यातील किल्ले हिंडत असताना प्रकर्षाने ऐतिहासिक माहितीचा अभाव जाणवतो. दुर्गश्रेष्ठ देवगिरी आणि थोडीफार अंतुर किल्ल्याची माहिती सोडल्यास इतर किल्ल्यांचा लिखित इतिहास तर सोडाच; पण स्थानिक दंतकथा, गोष्ट, परंपरा अशा स्वरूपातसुद्धा फार गोष्टी नाहीत. कुठल्या नरवीराचा ना त्यांना सहवास लाभला ना पाठबळ; पण त्यामुळे त्यांचे धोरणात्मक महत्त्व कमी होत नाही, हे नक्कीच.
 

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)

Web Title: A non-existent fort: Bhangshigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.