अंधकार होऊ नये म्हणून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:10 PM2017-10-15T13:10:24+5:302017-10-15T13:12:31+5:30
प्रासंगिक : दीपावली हा आनंदाचा, उत्साहाचा सण. दीपोत्सवाचा, प्रकाशाचा, गाई-म्हशींना पुजण्याचा, बहीण-भावाचे भावनिक नाते आणखी दृढ करणारा, कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन साजरा होणारा पारंपरिक आनंदोत्सव. शालेय विद्यार्र्थी असो की गृहिणी, शेतकरी असो की व्यापारी, छोटे-मोठे सर्व जण या सणाची आतुरतेने वाट बघतात. या आनंदाच्या सणात एखादी छोटी चूक, निष्काळजीपणा सर्व कुटुंबाचा आनंद हिरावून घेऊ शकते. काही काही वेळेस तर हा अपघात जन्मभरासाठी दु:ख, अंधार घेऊन येतो.. म्हणून आनंदी, सुरक्षित आणि आरोग्यवर्धक सण जाण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. श्याम पाटील तेलंग
दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे, मिठाई, रंगीत दिवे, नवीन वस्तू, भेटवस्तू यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते; पण काही दिवसांपासून दिवाळी म्हणजे निव्वळ फटाक्यांची आतषबाजी, असे समीकरण झाले आहे. फटाके मुळीच उडवू नयेत, असे मी म्हणणार नाही. कारण उत्सव, आनंद साजरा करणे ही सहज प्रवृत्ती आहे. त्यातून मन प्रफुल्लित होते. नवीन कार्य करण्यासाठी नवचैतन्य, नवीन ऊर्जा मिळते हे नक्की. तरीही हे सर्व योग्य प्रमाणात, स्वत:ला इजा होणार नाही, इतरांना त्रास होणार नाही, वातावरणातील प्रदूषण वाढणार नाही अशा जबाबदारीने व्हावे, अशी अपेक्षा करणे मात्र गैर नाही. फटाक्यांची आतषबाजी करतेवेळी एखाद्याला इजा अथवा दुखापत होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे म्हणावे वाटते.
फटाके उडवत असताना दोन वर्षांखालील बालके, हृदयरोग, दमा किंवा श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आणि गर्भवती माता यांना दूर ठेवणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या धुरामधून नायट्रोजन आॅक्साइड, कार्बन डायआॅक्साइड, कार्बोन मोनोआॅक्साइड अशा विषारी वायंूचे कण वातावरणात पसरतात. ही सर्व रसायने आरोग्यासाठी हानिकारक असतात. विशेषत: गर्भवती माता, लहान मुले, दमा, नाकाची अॅलर्जी असलेले रुग्ण यांच्यासाठी तर फारच घातक असतात. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी घरापासून दूर मोकळ्या हवेत, मैदानामध्ये फटाके उडवावेत.
दिवाळी म्हणजे प्रकाश. या प्रकाशामुळे दुर्दैवाने अनेक वेळा डोळ्यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होतात. त्यातही याचे प्रमाण लहान बालकांमध्ये जास्त आहे. एखादा फटाका लवकर उडाला नाही, तर मुले जवळ जातात आणि त्या फटाक्याला फुंकर घालतात. अशावेळी फटाक्याचा एकदम स्फोट होतो आणि काही कळायच्या आतच अपघात झालेला असतो. वेळीच व्यवस्थित उपचार न झाल्यास अगदी कायमचे अंधत्व येते. काही वेळेस उपचाराचाही उपयोग होत नाही आणि एवढ्याशा चुकीमुळे प्रकाशाचा सण साजरा करताना जीवनात अंधत्व येते. या घटना टाळण्यासाठी पालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. फटाके दुरून लांब काडीच्या साहाय्याने उडवावेत. अशा वेळेस शरीरावर सुती कपडे असावेत; पण ते सैलसर असू नयेत. ओढणी असेल तर घट्ट बांधलेली असावी. कपडे सैलसर असतील, अंगावर ओढणी असेल, तर चटकन पेट घेऊ शकते, हे लक्षात ठेवणे जरूरी आहे.
सर्व काळजी घेऊन दुर्दैवाने काही अपघात झाला, तर आपणास प्रथमोपचाराचे ज्ञान असणे आवश्यक आहे. फटाका जवळून उडवताना डोळ्यात मातीचे कण, राखेचे कण गेले, तर तात्काळ स्वच्छ पाण्याने धुऊन काढावेत. त्यानंतरही डोळा कचकच करीत असेल, बुबुळावर डोळ्यात कचरा चिकटला असेल, तर डोळा चोळू नये. त्यामुळे हा कचरा घासला जाऊन बुबुळावर जखम होते. त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडून कचरा काढून घ्यावा. डोळ्यामध्ये तेल, तूप, दूध व मध, असे पदार्थ कदापिही टाकू नयेत. दीपावलीचा आनंद द्विगुणित करतेवेळी थोड्याशा निष्काळजीपणा हा अंधाराचा, दु:खाचा होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेऊया...
(लेखक नांदेड येथील नेत्रतज्ज्ञ आहेत.)