नागसेनवनाच्या विकासासाठी लोकचळवळ हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:24 PM2017-10-30T13:24:07+5:302017-10-30T13:25:35+5:30
वारसा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात गोरगरीब, दीनदुबळ्यांना शिक्षणाची दारे उघडली. यासाठी शाळा, महाविद्यालये उभारली. त्यांनी उभारलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून नूतनीकरण करण्याचा रचनात्मक उपक्रम हितचिंतकांनी हाती घेतला आहे. याची लोकचळवळ निर्माण व्हावी.
- बी. व्ही. जोंधळे
औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या नागसेनवन परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात एक उल्लेखनीय परिवर्तन आणले. मिलिंद महाविद्यालयामुळे लाखो दलित मुलांनी शिक्षण घेऊन जीवन घडविले. मिलिंद परिसरात सांस्कृतिक चळवळी झाल्या. मिलिंदमुळेच पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्रप्रसाद यांच्यासारखे उत्तुंग राष्ट्रीय नेते प्रथमच मराठवाड्यास पाहावयास मिळाले. दलित साहित्याची चळवळ मिलिंदच्या भूमीत जन्मली. मराठवाड्यातील विद्यार्थी चळवळीचा उगम नागसेनवन परिसरातूनच झाला. मिलिंद एकेकाळी ज्ञानाचे, विद्वत्तेचे पांडित्याचे माहेरघर होते; पण कालौघात नागसेनवन परिसराचा हा साराच उज्ज्वल वारसा मागे पडत गेला. नागसेनवन, परिसरातील विस्तीर्ण जागेचा कुठल्याच रचनात्मक उपक्रमासाठी वापर न केल्यामुळे संस्थेच्या जागेत अतिक्रमणे वाढली, परिसरात बाभळी आणि जंगलराजने थैमान घातले. शाळा-महाविद्यालये, वसतिगृहांची नूतनीकरणाअभावी आबाळ होऊ लागली. रंगमंदिरास अवकाळा आली. नागसेनवन परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम लग्ने होतात; पण नंतर कुठलीच स्वच्छता होत नसल्यामुळे उष्टी-खरकटी कुजत राहतात.
नागसेनवन परिसराला ही जी उतरती कळा लागली त्याचे एक कारण म्हणजेच संस्थेत विविध गटोपगटांनी आरंभिलेले संकुचित राजकारण होय. या अशा विदारक पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील काही मान्यवर नागरिकांनी मोडकळीस आलेल्या मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलच्या इमारतीचा लोकसहभागातून नूतनीकरण करण्याचा जो रचनात्मक उपक्रम हाती घेतला आहे तो निश्चितच स्तुत्य आणि अभिनंदनीय आहे; पण संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थी, निवृत्त अधिकारी, कर्मचारी व लोकांनी शाळेचे नूतनीकरण करूनच न थांबता नागसेनवन परिसरातील शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व परिसरातील इमारती, वसतिगृहे, अंतर्गत रस्ते यांचे नूतनीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे, असे म्हटले तर गैर ठरू नये.
नागसेनवन परिसराच्या मरगळीस वर म्हटल्याप्रमाणे कंपूशाहीचे गटबाज राजकारणच कारणीभूत आहे, हे उघड आहे. संस्थेतील गटबाजीचे राजकारण आज या स्तराला पोहोचले आहे की, बाबासाहेबांची जयंती, महापरिनिर्वाण दिन व संस्थेच्या वर्धापन दिनाचे येथे चक्क तीन-तीन कार्यक्रम साजरे होतात. आंबेडकरानुयायांच्या दृष्टीने दु:खद बाब ती दुसरी काय असू शकते? मिलिंदनंतर मराठवाड्यात जी महाविद्यालये आली ती कुठल्याकुठे पुढे निघून गेली आणि मराठवाडा व दलित समाजाच्या जीवनात क्रांतिकारी बदल निर्माण करणारा मिलिंद परिसर मात्र मागे पडला. विद्यार्थी संख्या रोडावली, गुणवत्ता ढासळली, आता झाले ते झाले. येथून पुढे तरी संस्थेतील भांडणे सर्वांनीच एकत्र बसून मिटवावीत व बाबासाहेबांची संस्था काळाच्या पुढे न्यावी आणि याकामी आंबेडकरानुयायांनी पुढाकार घेऊन लोकसहभाग वाढविणारी लोकचळवळ उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त केली, तर ती चूक ठरू नये दुसरे काय?
(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)