राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये हवी आहे वरूणराजाची कृपादृष्टी, 'या '५ जिल्ह्यात सर्वाधिक वृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:28 PM2020-08-01T20:28:21+5:302020-08-01T21:02:00+5:30
नेहमी तहानलेल्या मराठवाड्यावर यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच कृपादृष्टी ठेवलीय..
पुणे : पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी २ महिने सरल्यानंतरही राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस बरसला असून विदर्भातील ११ पैकी ९ जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. नेहमी तहानलेल्या मराठवाड्यावर यंदा वरुणराजाने चांगलीच कृपादृष्टी ठेवली असून सर्व जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे.
जून महिन्यात पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी मॉन्सूनने १५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. तरीही विदर्भात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होते. पश्चिम बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्याांपासून विदर्भाला प्रामुख्याने पाऊस मिळतो. जुलै महिन्यात मॉन्सूनचा अक्ष हा हिमालयाच्या पायथ्याशी राहिल्याने मॉन्सूनचा सर्व जोर हा उत्तरेकडील राज्ये व ईशान्य भारतात राहिला आहे. त्याचा परिणाम गुजरातसह विदर्भावर दिसून येत आहे.
गेल्या दोन महिन्यातील संपूर्ण राज्यातील पावसाचा विचार केल्यास राज्यात सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्याचवेळी विदर्भातील बुलढाणा व वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४६ टक्के कमी पाऊस पडला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पटीहून अधिक पाऊस झाला आहे.
कोकणातील पालघरमध्ये गेल्या वर्षी दोनदा अतिवृष्टी झाली होती. यंदा मात्र तेथे सरासरीपेक्षा ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. नांदेड येथे सरासरी इतका पाऊस झाला आहे.
..................
सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस पडलेले जिल्हे (टक्केवारी)
गोंदिया -४६, नंदुरबार - ३४, गडचिरोली - २६, सातारा - २९, भंडारा -२२, यवतमाळ -१९, पालघर -३०, रायगड -१७, अकोला -२०
...............
कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी)
अमरावती - १०, नागपूर -५, वाशिम -४, कोल्हापूर -१४, पुणे व नाशिक -२, ठाणे -१८, चंद्रपूर -२, वर्धा -४
.............
सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेले जिल्हे (टक्केवारी)
नांदेड ०, बुलढाणा १८, वाशिम २३, हिंगोली ११, सांगली ८, जळगाव २८, धुळे ५०, लातूर ३७, रत्नागिरी ६, सिंधुदुर्ग ३१, मुंबई उपनगर ४०, मुंबई शहर ३८, लातूर ३७, उस्मानाबाद ३०, परभणी २५ टक्के
सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी)
अहमदनगर ११६, सोलापूर ९२, औरंगाबाद १०९, बीड ९१, जालना ५७
.................
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ४ दिवस पावसाचे
आॅगस्ट महिन्यात देशभरात ९७ टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून त्याचा प्रत्यय पहिल्या आठवड्यात येत आहे़ पुढील चार दिवसात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २ ते ५ आॅगस्ट दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात ४ व ५ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.