चढती रात्र; रंगता डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:37 PM2017-08-27T13:37:59+5:302017-08-27T13:38:56+5:30
एळकोट : रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे संजय स्वत:वर चिडत होता. आता अतुलने पत्ते पिसून वाटले. ते हातात घेताच संजय म्हणाला, पिसतानासुद्धा १०० कोटींच्या रस्त्यासारखे हुकमाचे पत्ते स्वत:कडेच निवडून घेतो. हा रडीचा डाव आहे. सगळ्यांना सारखे पत्ते वाट; पण डावावर डाव जिंकत अतुल हुकमाची पानं खेळत होता.
- सुधीर महाजन
पहाटेचे चार वाजलेले वक्रतुंडाने सोंड हलवत डोळे किलकिले करून पाहिले. रोषणाईचा झगमगाट विझल्याने मंद पिवळट प्रकाशात खाली मूषकराज तोंड उघडे टाकून झोपलेले होते. त्यांच्या बाजूलाच उत्सवाचे चार खंदे कार्यकर्ते अस्ताव्यस्त लोळलेले होते. रामप्रहर असूनही वातावरण आळसटलेले. रात्री उशिरापर्यंत चालणाºया कर्णकर्कश आवाजाने वक्रतुंडाचे सुपाएवढे कान किटले. झोप पुरेशी नाही आणि भक्तांकडून होणाºया नवसरूपी मागण्यांचा मारा यामुळे तो शिणून गेला. झोप चाळवल्याने आता ती लागणारही नव्हती. काळाचा पट त्याच्या नजरेसमोरून सरकला. ते दिवस आठवले, टिळक की रंगारी असा वाद नव्हता. आपल्या साक्षीने दिग्गज लोक विचारांचे आदानप्रदान करीत.
व्याख्यानमालांचा मोसम, मेळ्यांची रेलचेल. संगीताच्या मैफली. उत्सवाचे दहा दिवस भारावलेले होते. अनंतचतुर्थी येऊच नये असे वाटत असे. कैलासाकडे जाण्याची ओढ नव्हती. जीव इथेच रमत होता. कारण उत्सवासाठी कार्यकर्ते जीव टाकायचे. लोकही तसेच होते. ते सर्व लोप पावले. पुढे सिनेमा आले, नंतर डीजे नावाचा कानठळ्या बसविणारा प्रकार आला आणि उत्सवाचा इव्हेंट झाला. आता तर आपल्या नावावर मोठे अर्थकारण होते; पण आपण एवढे हतबल की काहीच करू शकत नाही. असा विचार येताच मनात विषाद भरून राहील. मन उदास झाले. जे काही चालते ते निमुटपणे पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही.
विनायकाने डोळे उघडले आणि नजर फिरविली. त्याच्या पायाशी इसपीकचा कुरतडलेला एक्का पडलेला दिसला. यावर्षी उंदीरमामाला ही नवीनच सवय लागली होती, पत्त्याची पाने कुरतडण्याची. मोबाइल डमरूचा रिंगटोन वाजला आणि विचारांची गती थांबली. त्याने फोन उचलून कानात ठेवून दिला. पिताश्रींना चरणस्पर्श म्हणताच गणेशा यावेळी हे पृथ्वीवरून व्हॉटस्अॅपवर कसली चित्रे पाठविली. कागदाच्या तुकड्यांवर रंगीबेरंगी चिन्हे, आकडे आणि चित्रे आहेत, काय हा प्रकार आहे. तू दिलेल्या बुद्धीच्या बळावर मानवनामक प्राण्याने हा काय आविष्कार केला, याचा काही उलगडा होत नाही. तुझ्या मातोश्रीनेही प्रयत्न केला. नंदीनेही शिंगे टेकली; पण आम्हा कोणालाच उत्तर सापडले नाही. अरे हे काय आहे? या सरबत्तीने विघ्नेश्वर गांगरलाच; पण सावरत पिताश्री हा आविष्कार नवा नाही तुम्ही आणि मातोश्री जो सारिपाट खेळता त्यातलाच हा प्रकार, पण मानवाने याचे अनेक खेळ शोधले, प्रकार शोधले. या खेळात पैसा आला आणि आता हा खेळ नाही तर जुगार बनला. मी परत आलो की, तुम्हाला शिकवतो, असे सांगून त्याने फोन बंद केला.
तोपर्यंत फटफटले होते. उंदीर महाराज खडबडून जागे झाले. कार्यकर्ते डोळे चोळत अंगाला आळोखेपिळोखे देत उठले. नंतर दिवस सुरू झाला आणि हळूहळू होणारी संध्याकाळ अंगावर आली. जे काय समोर चालले ते पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. आरती, प्रसादाचा कार्यक्रम उरकला गेला, आता गाणे बडवणे सुरू झाले. हळूहळू रात्र सरकली आणि सामसूम झाली. रात्री कार्यकर्त्यांचा जमगट जमला. उंदीरमामाने नवाकोरा कॅट काढला. पावडर हाताला लावली आणि कै ची मारली. पत्ते वाटले. डाव मांडला. ‘समांतर’सारखी बदामची राणी अडवू नको माझी, पण वेळ येईल, असे वैतागत चंदू म्हणाला, हातात पत्तेच चांगले नव्हते, त्यामुळे संजय स्वत:वर चिडत होता. आता अतुलने पत्ते पिसून वाटले. ते हातात घेताच संजय म्हणाला, पिसतानासुद्धा १०० कोटींच्या रस्त्यासारखे हुकमाचे पत्ते स्वत:कडेच निवडून घेतो. हा रडीचा डाव आहे. सगळ्यांना सारखे पत्ते वाट; पण डावावर डाव जिंकत अतुल हुकमाची पानं खेळत होता. चढत्या रात्रीसोबत डाव रंगत गेला. कार्यकर्ते सुस्तावले. बाप्पाला डुलकी लागली. तिकडे कोपºयात प्लास्टिकच्या खुर्चीत बसलेला हवालदार पेंगला होता.