प्रगत शिक्षणाचा वसा घेतलेल्या सावित्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 03:57 PM2017-09-03T15:57:55+5:302017-09-03T15:58:21+5:30
प्रासंगिक : येत्या मंगळवारी शिक्षक दिन. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शिक्षकाने घडविल्यामुळे समर्थपणे कार्यरत असताना दिसतो. मग तो गुरू कोणीही असो. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने समर्थपणे उंब-याबाहेर पाय टाकत आपल्या प्रतिभेने राज्यात नावलौकिक मिळविला, अशा शिक्षण क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा घेतलेला हा आढावा...
- अनिता यलमटे-रेड्डी
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात पहिल्यांदाच स्त्री शिक्षणाची दारे पुण्यात सावित्रीबाई व महात्मा फुले या दाम्पत्याने उघडली. तेव्हापासून सुरू झालेली स्त्री शिक्षणाची परंपरा आणि स्वक्षमतेवर स्त्रियांनी आजपर्यंत मोठी मजल मारली आहे. सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक, जाईबाई चौधरी, अंजनाबाई देशभ्रतार, बेगम जजिरा, जोहरा फैजी अशा असंख्य स्त्रियांचा उल्लेख करता येईल. ही वंशावळ या मातीत मोठ्या प्रमाणात रुजली, वाढली. याचा आता वटवृक्ष बनला आहे. त्याची पाळेमुळे ही या मातीत घट्ट रुजली आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, विद्यार्थ्यांची जडण-घडण, ज्ञानरचनावादी उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राबविण्यात येतात. चौकटीच्या बाहेर जाऊन यशाचे नवे आयाम जोडण्यात येत आहेत. यात महिला अधिकारी, मुख्याध्यापकांचा मोठा वाटा आहे. राज्यात ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या उपक्रमाची अनेक ठिकाणी कार्यक्षमपणे अंमलबजावणी झाली. त्याठिकाणी शिक्षणाचा कायापालट झाल्याचे आपणाला दिसून येते. यातील काही प्रशासक रणरागिणींच्या कार्यावर थोडक्यात टाकलेला हा प्रकाशझोत.
तंत्रस्नेही हायटेक कार्यालय
दहा वर्षे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी बनलेल्या तृप्ती अंधारे यांना तंत्रस्नेही अधिकारी म्हणूनच ओळखले जाते. राज्यातील पहिले ई-गव्हर्नन्स, सीसीटीव्हीयुक्त हायटेक कार्यालय त्यांनीच निर्माण केले. लातूर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये बहुतांश शाळा ज्ञानरचनावादी बनवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत अभियानात नावलौकिक मिळविला आहे. शाळेची गोडी निर्माण होण्यासाठी कन्या सुरक्षा कवच, महात्मा ते कलाम वाचन पंधरवडा, उन्हाळी शिबीर फन इन द सन, बालचित्रपट क्लब असे विविधांगी उपक्रम यशस्वीपणे राबवले. शिक्षकांना प्रगल्भ करण्यासाठी कॉफी विथ क्रिएटर्स, जागर सावित्रीच्या लेकीचा कार्यक्रम घेतला. प्रशासनात झीरो पेंडन्सी ही पद्धत प्रशासनात राबविली. त्यांना शिक्षण क्षेत्रातील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखण्यात येते.
सामाजिक बांधिलकीचा सेतू
अंबाजोगाईतील खोलेश्वर विद्यालयात स्वच्छ-सुंदर शाळा, उत्कृष्ट ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, स्वच्छता गृहे, डिजिटल वर्ग, ज्ञानरचनावादी वर्ग, बोलक्या भिंती, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती अशा विविध उपक्रमांनी शाळा नावारूपाला आणली आहे. याचे श्रेय मुख्याध्यापिका जमुना राठोड यांना जाते. याशिवाय शिक्षकांच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी विविध शिबिरे, कार्यशाळा, प्रबोधिनी कार्यक्रम सतत आयोजित करण्यात येतात. स्वच्छता अभियान फेरी, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, दत्तक ग्राम, योगा शिबिरे आयोजित करण्यामध्ये शाळेचा पुढाकार असतो, हे विशेष.
चाणक्य घडविणा-या शाळेची उभारणी
विनाअनुदानित काळापासून गेली २० वर्षे मुख्याध्यापक पदाचा भार सांभाळत असलेल्या ज्योती जोशी यांच्या नेतृत्वात पैठणच्या आर्य चाणक्य माध्यामिक विद्यामंदिर शाळेने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. कला व शास्त्र याचा सुरेख संगम साधून शाळेचे नंदनवन करण्यामागे मुख्याध्यापिकेची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत. शाळेत नियमित पालक भेटी, ग्रामायण योजना, शैक्षणिक सहली, क्षेत्रभेटी, आजी-आजोबा मेळावा, दीपोत्सव, तज्ज्ञांच्या मुलाखती आदी उपक्रम राबविण्यात येतात. यातून पैठणसारख्या छोट्याशा शहरात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
तंबाखूमुक्त शाळा अभियान
प्राथमिक शिक्षणातील खाचखळगे २० वर्षे अनुभवल्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून डॉ. सुचिता पाटेकर यांनी चार वर्षांत नावीन्यपूर्ण व धाडसी प्रयोग केले आहेत. तंत्रस्नेही शिक्षक, डिजिटल व ज्ञानरचनावादी वर्ग, पुस्तक भिशी, फटाके नको पुस्तक हवे, वाचन प्रेरणा चळवळ, शिक्षक कार्यशाळा, शाळा जाहिराती, शिक्षणवारी आणि प्रवेशोत्सव अशा विविध उपक्रमांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण केले. याशिवाय तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले. तंबाखूमुक्ती संकल्प दिनाला साडेचार लाख लोकांच्या उपस्थितीत शपथ दिली. याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. एका स्त्री प्रशासकाने व्यसनमुक्तीचे उचललेले पाऊन स्तुत्यच आहे.
गुणवत्ता परिवर्तन करण्याचा यशस्वी प्रयत्न
सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या सर्वच शाळा ज्ञानरचनावादाने गुणवत्तेत परिवर्तन करणाºया प्रतिभा भराडे कार्यक्षम विस्ताराधिकारी आहेत. ४० शाळांमध्ये १२ वर्षांपासून अथकपणे प्रयत्न करीत आहेत. या सर्व शाळा बघण्यासाठी ८० हजार लोकांनी आतापर्यंत शाळांना भेटी दिल्या आहेत. एकाचवेळी शाळांमध्ये ६६ उपक्रम राबविण्यात आले. कुमठे बीट हे राज्यातील सर्वच शाळांसाठी आदर्श ठरले आहे. या बीटला शिक्षणमंत्र्यांपासून सचिवांनी भेटी दिल्या आहेत. या सर्व परिवर्तनाच्या शिलेदार प्रतिभा भराडे याच आहेत.
(लेखिका उदगीर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रयोगशील शिक्षिका आहेत.)