कोंडमारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:51 PM2017-09-03T16:51:09+5:302017-09-03T16:51:38+5:30
वर्तनाचे वर्तमान : परवा शिक्षक दिन आहे. झूल पांघरलेल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या, घेतल्या जातील. आदर्श शिक्षकांचे भाव वधारलेत. त्यात जे बाजी मारतील ते ठरतील ‘आदर्श.’ चार-दोन असतील अपवाद. बाकी सारे आलबेल आहे. या वातावरणात ‘ना पुरस्कार, ना मान, फक्त राबणार’ अशा अवस्थेत भला मोठा वर्ग आपल्या व्यवस्थेत आहे उपाशी. आयुष्य संपले तरी त्यांच्या खात्यावर ‘पगार’ कधी जमा झालाच नाही. वर्षानुवर्षे ते राबत आहेत प्रामाणिकपणे लोकांच्या लेकरांसाठी. अशाही लोकांचे असते एक स्वप्न. त्याचा समाज, सरकारला विसर पडला आहे. म्हणून अशाच एका तासिका तत्त्वावर काम करणा-या शिक्षकांच्या व्यथा-वेदनांचे हे स्वगत...
- डॉ. गणेश मोहिते
वय वर्षे चाळीस. डोक्याचा गोटा झालेला. काळा ठिक्कर पडलेला काळजीवाहू चेहरा. आयुष्यभराचा पश्चात्ताप श्वासागणिक जाणवतोय. आजकाल पाहतोय असा की समोरच्याच्या काळजात धस्स व्हावे. ‘जगता जगता रोजच मरत असतोय हजारदा’ हे त्याचे वाक्य चटके देते काळजाला. तुम्हाला सांगतो मास्तर ‘गावाकडं तोंड लपवून फिरावं लागतं अन् शहरात उपाशी झोपावं लागतं. हे कोणतं भणंग आयुष्य आलं वाट्याला. तुम्ही शिकवता तेच मी पण शिकवतो अन् शिकलोही ना; पण मला बनियन घेताना दहादा विचार करावा लागतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांविषयी जेव्हा शाळेत असताना पुस्तकात वाचायचो तेव्हा कधीच नव्हता केला विचार की यासाठीचा संघर्ष असतो ‘सनातन.’
शाळेत शिक्षक सांगायचे शिकून माज्यापेक्षा मोठ्ठा... शिक्षक हो. तेव्हा मी मोहरून यायचो; पण मला तेव्हा कुठं माहीत होतं की मोठ्ठ्या शिक्षकाची अशीही एक नोकरी असते शेळीच्या शेपटासारखी. ‘ज्याने माशाही उठवता येत नाहीत अन् लाजही झाकता येत नाही.’ मास्तर मी झगडतो; त्याबद्दल माझं कुथनं नाही, तर शिक्षणानं माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून येतं यावर उरला नाही माझा विश्वास. शिक्षणानं केलंय उद्ध्वस्त माज्यासारख्या अनेकांना, यावर तुम्ही तर विश्वास ठेवाल का? पण माज्या वर्तमानाकडं पाहा अन् तुम्हीच सांगा मी तरी का म्हणून शिक्षणाने परिवर्तन होतं या भूलथापांवर विश्वास ठेवू? समता, सामाजिक न्याय या गोष्टी मला आजकाल तर अफवाच वाटतात.
वर्णव्यवस्था संपली बरं झालं; परंतु समाजात आजही औषधाला ‘समता’ दिसते काय? अहो, कॉलेजमध्ये प्राध्यापक बाटलीतलं घोटभर पाणी देतानासुद्धा परमनंट की सीएचबी याचा हिशोब ठेवतात. मग तुम्हीच सांगा मी कोणती समता व सामाजिक न्याय माज्या विद्यार्थ्यांना शिकवू? याच समानतेच्या शोधासाठी माझं उभं आयुष्य करपलं हो! अगदी अलीकडं आता तर आमच्या गावातील पोरं माज्याकडं पाहून हसतात तेव्हा मी खजिल होतो. पण करणार काय? कारण मला आठवतं माय-बापाच्या डोळ्यातलं स्वप्न. मी शिकावं म्हणून त्यांच्या खस्ता; पण आज हिंमत होत नाही मास्तर माय-बापाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची. गावात मी दिसलो की लोकं म्हणतात ‘बरं झालं शिकवलं नाही आपल्या पोट्ट्याला नाय तर त्याचा पण ‘कवी’ झाला असता.’ तेव्हा मला आठवतात दया पवारांचे ते शब्द-
‘कशाला झाली पुस्तकांची ओळख?
बरा होतो ओहोळाचा गोटा,
गावची गुरं वळली असती,
असल्या इंगळ्या डसल्या नसत्या’
हे दु:ख जातीव्यवस्थेनं अंगवळणी पडलंच होतं; पण शिक्षणानं पुन्हा तेच वाट्याला आलं. नव्या काळाच्या पोटात असंख्य वर्ग जन्माला आलेत मास्तर. पूर्णवेळ, अर्धवेळ, तासिका तत्त्व हे नुसते नोकरीचे वर्ग नव्हते; तर त्या आहेत तुमच्या माज्यातल्या भिंती. त्यांना भेदून जाण्यासाठी हवी असते, जात, पोटजात, पैसा, मतदारसंघ आणि निवडणुकीत काम करण्याची हमी वगैरे, असं बरंच काहीबाही. साध्या कारकुनाच्या नोकरीला मोजावे लागतात लाखो रुपये. बाकी सर्व ‘बाजारभाव’ तुम्हाला माहीतच आहेत, पुन्हा मी नव्यानं काय सांगू? त्यात आरक्षण असेल तर पोटजातीचा हिशोब मांडला जातोय मास्तर. नवबौद्धापेक्षा मातंग बरा, मातंगापेक्षा चर्मकार बरा, तो हिंदू तरी असतो म्हणे... वगैरे...
हा सगळा हिशोब करता करता डोक्यावरचे केसं गेले; पण थकलो नाही अजून. पायात उसनं ‘बळ’ एकवटून वाट शोधत राहतो मास्तर; परंतु बायको जेव्हा म्हणते ‘बापाला तुमच्यात काय दिसलं होतं काय माहीत, डोंबलं माझं. एखाद्या मोलमजुरी करणा-याला दिलं असतं, तर लोकांच्या नाकावर टिच्चून कामधंदा करून ऐटीत संसार थाटला असता, आता ना गावाकडं जाता येत, ना शहरात धुणीभांडी करता येत. कारण नवरा काय करतो इचारलं तर कॉलेजात प्राध्यापक आहे म्हणून सांगायची लाज वाटते. त्यांना काय माहीत या बुवाला वर्षाकाठी कधीतर तीस-बत्तीस हजार रुपये हातावर टेकवले जातात ते. आज ना उद्या परमनंट होईल म्हणून लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी मूल होऊ दिलं नव्हतं, का तर या पैशात आपलंच भागेना मग आणखी खाणारं तोंड वाढवायचं कशाला. नंतर दहा वर्षानं लेकरू झालं तर त्याला आज शाळेत टाकायला फुटकी दमडी नाही.
माझंच नशीब फुटकं मेलं.’ ती बिचारी भाबडी तिचा हा आक्रोश मी समजू शकतो. त्यात तिचा तरी काय दोष. तिनंही हळदीच्या पिवळ्या अंगानं रंगवली असतील ना स्वप्न सुखी संसाराची; पण या धूसर झालेल्या स्वप्नांसाठी तिनंही कधीपर्यंत बसावं गप्प; परंतु तिचं आपलं सोप्पं आहे. ती स्वत:च्या प्राक्तनाला दोष देऊन स्वत:च्या मनाची समजूत तरी घालते; पण माझं काय? मी तर म्हणे फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारा माननारा. तिथं प्राक्तनाला दोष देऊन पळ काढण्याची सोयही नसते. मग नुसता धुमसत असतो आतल्या आत. ज्याचा आवाज नाही पोहोचत तुमच्यापर्यंत. तरीही काही महाभाग भेटतातच फुकाचे तत्त्वज्ञान शिकविणारे. काय तर म्हणे कशाला नोकरीच्या मागे लागला. इतके पैसे भरून नोकरी परवडते कुठे आज-काल. तिच्या नादी लागण्यापेक्षा स्वत:चा उद्योग, व्यवसाय, शेती करणं चांगलं; पण असा सल्ला देणा-यांना तारुण्याचे पंधरा वर्षे मोजलेत मी स्वप्नांसाठी. त्याचे नसते ‘मोल.’ अशांना काय माहीत स्वप्नांचा ‘सौदा’ करणं नसतं जमत काळीज असणा-या माणसांना.
पंधरा वर्षे उपाशीपोटी दुस-याच्या लेकरांना शिकवा, मग थोपटू यांची पाठ. लोकांचे सोडा मास्तर; परंतु बायको जेव्हा असं काही बोलते तेव्हा मी मुळापासून हादरतो, आतल्याआत पूर्णअंशाने उद्ध्वस्त करून घेतो स्वत:ला. वयाच्या तेविसाव्या वर्षी नोकरीसाठी पात्रता धारण केली. त्याच कागदांवर थुंकतो मनातल्या मनात. तेव्हा नसतं माझं कोणी, मी कोणाचा. जोरात टाहो फोडला तरी निघत नाही आवाज. तेव्हा मीच घालतो माझी समजूत घालत गुणगुणतो बरं वाटावं म्हणून विंदांच्या शब्दांना....
‘हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुज्या गळ्याला पडेल शोष,
कानांवरती हात धर,
त्यांतूनही येतील स्वर,
म्हणून म्हणतो ओत शिसे,
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणा-या रडशील किती?
झुरणा-या झुरशील किती?
पिचणा-या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो,
माज्या मना दगड हो!’
(लेखक बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)