लहुगडचा छोटा किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:45 PM2017-09-10T13:45:11+5:302017-09-10T13:45:34+5:30

स्थापत्यशिल्पे : नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीच्या मुख्य रांगांतून पूर्वेकडे निघून खान्देशापर्यंत पसरलेल्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगांत नाशिकमध्ये धोडपसारखा छाती दडपून टाकणारा किल्ला, तर खान्देशात नरनाळा, बाळापूर, गाविलगड असे दख्खनी सुलतानांच्या शैलीतील उत्तम किल्ले आहेत. त्यात आपल्या अजिंठा रांगांची उंची जरी कमी असली तरी वाट सापडवून इथल्या किल्ल्यांवर स्वारी करणे सोपे नक्कीच नाही. मागे म्हटल्याप्रमाणे शिवराज्यातील किल्ल्यांप्रमाणे अदम्य उंची, बेलाग कड्यांचे नशीब आणि दक्षिण मराठवाड्यातील किल्ल्यांप्रमाणे आखीव-रेखीव दुर्ग-व्यवस्थेचे कोंदणही नाही तरी...हे छोटेखानी पण दख्खनकडे वाकड्या नजरेने पाहणा-या शत्रूला योग्य धडा शिकवू शकतील, असेच किल्ले आहेत.

The small fort of Lahhud | लहुगडचा छोटा किल्ला

लहुगडचा छोटा किल्ला

Next

- तेजस्विनी आफळे

काटेरी झाडा-झुडपांचे गौताळ्याचे अभयारण्य पश्चिम घाटातील जंगलासारखे भयावह घनदाट नसले तरी पावसाळ्यात मात्र ढग उतरलेली, पावसात न्हालेली ही हिरवीगार डोंगररांग सह्याद्रीच्या मुख्य रांगांपेक्षा कमी सुंदर खचितच नसते, अशा भागातील आपले किल्ले प्रेक्षणीय नसतील तर नवल. त्यातीलच एका नवीन प्रकाशात आलेल्या लोंझा किल्ल्याची आपण मागच्या लेखात माहिती घेतली. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर पाय रोवून उभे ठाकलेले हे सहा शिलेदार पाहून आज आपण जिल्ह्याच्या मध्यभागी परत येऊ. अजिंठा-सिल्लोडमार्गे औरंगाबादकडे येताना फुलंब्री गावातून उजवीकडे वळल्यावर नांद्रा गावाच्या अलीकडे ३ किलोमीटरवर टेकड्यांच्या दोन रांगांमधल्या खिंडीत लहुगडाची गोलाकार टेकडी दिसते. 

टेकडी चढताना अर्ध्यातच रामेश्वर मंदिर लागते. खरे तर टेकडीच्या पोटात खोदलेले हे एक लेणे आहे. आज गर्भगृहात बसवलेल्या चकचकीत फरशा, मंदिरावर चढवलेले सिमेंटचे नवीन शिखर, नवीन पद्धतीच्या मूर्ती, पायºयांच्या बाजूला पूर्वी राहत असलेल्या साधूबाबाची मठी आणि भाविकांसाठी नवीन सोयी-सुविधांच्या तजविजीमुळे लेण्यांचा बाजच पूर्ण बदलून गेलाय. लेण्यातील कोरीव खांब आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा हे लेणे नक्कीच मुसलमानी अंमलाच्या आधीच्या काळातील आहे याची ग्वाही देतात. लेण्यांसमोरचे खोदीव छोटे मंदिर हे याच काळातील आहे. तेथून पुढे कातळात खोदलेल्या पाय-या चढत आपण कातळात खोदलेल्या ठेंगण्या प्रवेशद्वारापाशी पोचतो. जाताना उजवीकडे पूर्वी राहत असलेल्या साधूबाबांची मठी आणि नवीन स्वयंपाकघर आहे.

गडमाथ्यावर प्रवेश केल्यावर पाण्याचं टाकं, खांबटाकं आणि एक प्रशस्त गुहा कोरलेली दिसते. किल्ल्यावर दक्षिणेला अंजनडोह गावाकडे जाणा-या वाटेवरसुद्धा एक गुहा आहे. त्यापलीकडे सीतेचे मंदिर आणि कोरडे टाके दिसते. किल्ल्याच्या शेजारच्या डोंगरावरही काही लेणी आहेत. किल्ल्यावर इमारतींची जोती, काही पुरातन मूर्ती, तटबंदीचे आणि मागील दरवाजाचे काही तुरळक अवशेष वगळता इतर काही नाही. किल्ला टेहळणीसाठी बांधला गेला असावा, असा अंदाज करता येतो. मात्र परत एकदा हा किल्ला बांधला कुणी, कसा, केव्हा हे प्रश्नार्थक शब्द मनात काहूर उठवतातच. आज लोंझा किल्ल्याप्रमाणेच लहुगडालाही धार्मिक स्वरूप अधिक आले आहे. मात्र, त्याबरोबरच किल्ल्याच्या ऐतिहासिक अवशेषांनाही तितकेच महत्त्व देऊन त्या जपण्याचे भान आपल्याला राहील का? श्रद्धेपुढे इतिहास संपून तर जाणार नाही ना...

देवगिरी आणि अंतुर किल्ल्यांसारखे बघण्यासारखे लोंझा आणि लहुगडावर फार नसले तरी इतिहासाच्या मोठ्या पडद्यावरील या छोट्या पात्रांनासुद्धा आपण भेट द्यायला हवी... कुणास ठाऊक ...त्यांच्याकडेही आपणा सुजाणांशी हितगुज करण्यासारखे बरेच काही असेल... !!!

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: The small fort of Lahhud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.