सॉफ्ट स्किल्स - जगण्याचा आनंदी मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:58 PM2017-10-15T12:58:59+5:302017-10-15T13:02:09+5:30
बुकशेल्फ : अंजली धानोरकर यांनी १८ वर्षे शासकीय सेवेमध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक म्हणून एक नवीन क्षेत्र हाताळायला सुरुवात केली. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले.
- डॉ. प्रीती पोहेकर
प्रेरणादायी ग्रंथनिर्मिती हा तसा मराठी साहित्यातील उपेक्षित प्रकार आहे. अलीकडच्या दीड-दोन दशकांत ‘यशाची गुरुकिल्ली’, यशस्वी व्हा, सकारात्मक विचारांची जादू, विचार बदला, आयुष्य बदला, अशी काही अनुवादित पुस्तके मराठीमध्ये आलेली आहेत. मूळ मराठी भाषेतून निर्माण केलेल्या अशा पुस्तकांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. अशा कमी पुस्तकांमध्ये अंजली धानोरकर यांनी लिहिलेल्या ‘व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स’ या पुस्तकाची मोलाची भर पडलेली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन औरंगाबादेत रविवारी सायंकाळी हॉकीपट्टु धनराज पिल्ले यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त घेतलेला हा आढावा
अंजली धानोरकर यांनी १८ वर्षे शासकीय सेवेमध्ये तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक म्हणून एक नवीन क्षेत्र हाताळायला सुरुवात केली. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले.
सॉफ्ट स्किल्स संकल्पना स्पष्ट करताना लेखिकेने पुस्तक कुठेही सैधांतिक होणार नाही, याची काळजी घेतली आहे. संकल्पनादेखील उदाहरणे देत स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे पुस्तक कुठेही अवाजवी सैधांतिक, शास्त्रीय आणि म्हणून बोजड होत नाही. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय, त्याची दैनंदिन आयुष्यात गरज काय आहे, वैयतिक व व्यावसायिक पातळीवर काय गरज आहे हे प्रारंभीच स्पष्ट केलेले आहे, ती कुठे शिकता येऊ शकतात त्याचे प्रकार कोणते आहेत हे देखील स्पष्ट केलेले आहे. मात्र ते जास्त पाल्हाळिक न होता केवळ परिचयात्मक होतील याची काळजी लेखिकेने घेतलेली आहे.
संवाद ही सॉफ्ट स्किल्सची पहिली पायरी आहे. संवाद सुरू करताना तो कसा असावा, किती लांबवावा, कुठे थांबवावा हे सांगतानाच तो सुसंवाद असावा, विसंवाद असू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी हे दाखले देत समजावून सांगितलेले आहे. आवश्यक तेथे संवादाच्या तांत्रिक बाजूंची चर्चा केलेली आहे. याखेरीज व्यक्तिसंबंध, नातेसंबंध, व्यावसायिक कौशल्ये, स्व-ओळख व प्रेरणा, भावनावर नियंत्रण ही कौशल्ये कशी आत्मसात करावीत हे उदाहरणांसहित सांगितलेले आहे. लेखिकेने अनेक प्रसंग, उदाहरणे देत सॉफ्ट स्किल्स कसे आत्मसात करता येऊ शकतात हे समजावून सांगितलेले आहे.
हे पुस्तक एकूण ११ प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी त्याचा सार सांगणारी काही प्रेरक वाक्ये उद्धृत केलेली आहेत. तसेच आपल्यासमोरचे प्रश्न कसे सहज सोडवता येतात याविषयी चर्चादेखील केलेली आहे. प्रत्येक कौशल्याची माहिती देऊन ते किती गरजेचे आहे आणि ते कसे अंगी बाणवता येईल हे स्पष्ट केलेले आहे. एकुणच विषय अवघड असल्याचे वाटते मात्र पुस्तकात तो अतिशय सोप्या भाषेत मांडला आहे.
*व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स
लेखिका : अंजली धानोरकर
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे : २२८, किंमत : २५० रु.
(लेखिका लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.)