काही सुघड, अनवट वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 01:19 PM2017-08-27T13:19:43+5:302017-08-27T15:52:57+5:30
औरसचौरस : आपल्याच तंद्रीत गावातल्या अरुंद धूळवाटेने चालताना समोरून आलेल्या एका मोटारसायकलला वाट करून देण्यासाठी गडबडीने रस्त्याच्या एका बाजूला सरकलो आणि मध्येच वर आलेल्या दगडाला ठेचाळून पायाच्या अंगठ्याला खच्चून ठेच बसली. कळवळून खाली बसलो आणि एकाएकी आठवले इथेच, याच जागेवर आधीही कधीतरी आपल्याला ठेच लागली होती. हे नख याआधी इथेच कुठेसे उलथले आहे. कळ सोसत उठलो आणि चालता चालता आठवू लागलो. काही क्षणांनी आठवले की, चड्डी आणि दप्तर सावरत शाळेतून येताना घरच्या ओढीने पळता पळता इथेच दगडाला अडखळून पडलो आणि गुडघे आणि हा अंगठा फुटला होता. घरी गेल्यावर आईने रस्त्यात उगवलेल्या दगडाला आणि माझ्या अवखळ धावण्याला शिव्या घालत त्यावर हळद माखली होती. ही तीच वाट, कदाचित हा दगडही तोच.
- बालाजी सुतार
गावातल्या वाटा फार लडिवाळ असतात तशा अशा अवचित दणके देणा-याही असतात. मघाशी ठेचाळलो तिथेच पलीकडे मी लहानपणी राहायचो ते घर होते. नंतर मूळ मालकांनी ते विकले. आता तिथे एक दणकट इमारत उभी आहे. ही वाट माझ्या त्या घराकडे जाणारी होती; पण आताही ती त्या जागेकडे जाते; पण ‘त्या’ घराकडे नेत नाही. ते तीन खोल्यांचे दगडामातीने बांधलेले जुनाट घर छान होते. ही आताची वाट सिमेंटने बांधलेल्या दुमजली इमारतीकडे घेऊन जाते. ती इमारत आता ‘घर’ उरली नाहीय. याच वाटेने मी इथून शाळेकडे जायचो आणि परत घरी यायचो. ही बाजूने जाणारी दुसरी वाट आहे ती गावाकडच्या हापशाकडे जायची. गावात दोन-तीनच हापशे होते. त्यामुळे लाइन मोठी असायची दरेक हापशावर. या वाटेवरून त्या लायनीत नंबर लावायला म्हणून मी मोठ्या बादलीत एक छोटी बादली, एखादी चरवी, एखादी तवली असे एका हातात आणि दुस-या हातात एखादी लोखंडी पत्र्याची घागर असे ओझे सांभाळत हापशावर जायचो. तिथे बादल्या, चरवी, घागर नंबरला लावायची आणि याच वाटेने आणखी दहा-वीस पावले पलीकडे पांढरीवर जाऊन नंबरावर लक्ष ठेवत तिथल्या पोरांशी गोट्यांचा डाव मांडायचा. कधी-कधी गोट्यांच्या नादात नंबर येऊन गेल्यावर भान यायचे, कधी आई किंवा बहीण येऊन पाठीत धपाटे घालायच्या तेव्हा धूम पळत सुटायला हीच वाट सोबत असायची. ती सबंध गावाला वळसा घालून दुस-या बाजूने घराकडे आणून सोडायची. या वाटेवर माझे खूपसे बालपण सांडलेले आहे. ही वाट माझी खेळभिडू होती.
या इथून, अशी तिकडच्या बाजूने आणखी एक वाट जाते, ती मोठी वाट आहे. ती गावाच्या एका वेशीतून बाहेर जाते आणि बाहेर एकदम अंग आखडून घेऊन सडपातळ होत एका बारक्या ओढ्याच्या काठाशी लगट करीत ओढ्याच्याच काठावर असलेल्या एका बारीकशा महादेवाच्या देवळाकडे जाते. देवळाच्या पायथ्याशी ओढा जरासा खोल होऊन तिथे एक डोह असायचा. त्या डोहात मी पोहायला शिकलो. ही वाट तिकडे जातानाच डोहातल्या पाण्यात उतरण्याच्या कल्पनेचा गारवा आधीच मनात दाटवून अंगावर शहारे उमटवत तिकडे घेऊन जायची. पोहून येताना ही वाट आम्हा पोरांच्या आबदार कोवळ्या पायांना भारी टोचत असे; पण त्या टोचण्यामुळे या वाटेवर जडलेला जीव कधीच हळहळला नाही. या वाटेवर धुणे धुवायला जाणा-या बायांचा आणि काही धोब्यांचा कायम राबता असे. खडकावर धुणे आपटण्याच्या आवाजाने या वाटेवर कायम आसुडासारखे फटके उठत असत.
इथूनच गावाबाहेर ओढ्याच्या काठाकाठाने पुढे-पुढे जात ही वाट एकदम रानारानांत शिरते आणि डोंगराडोंगरांतून जवळच्या काही वाड्या-तांड्यांवर घेऊन जाते. गावाबाहेर पडल्यावर ही अरुंद वाट बरीच बेरकी होते. गवताने माखलेली आणि झाड झाडो-याने ग्रासलेली ही वाट चांदण्या रात्रीच्या वाटसरूला हमखास चकव्यात गुंगवते. फलाण्यावाडीला जायला निघालेला माणूस नेमका बिस्तान्यावाडीला जाऊन पोहोचतो. हल्ली अशी रात्रीची पायदळ चाल करणारी माणसे उरली नाहीत आणि अशी वाटचाल करायची कारणेही नाहीत; पण ती होती तेव्हा या वाटेने भल्याभल्यांना चकवे दिलेले आहेत. त्या चकव्यांच्या रम्याद्भुत कथा रात्री उशिरा गावातल्या पारावर धाबळ पांघरूण बसलेल्या म्हाता-यांच्या तोंडून ऐकताना भारी गंमत वाटे.
आता ठेच लागली त्या जागेपासून जरासे पुढे गेल्यावर एक चौवाटा आहे. तेथील एक वाट वय वाढल्यावर भारी आवडायची. त्या वाटेवरून जाताना मनात हुरहुर उमलून येत असे. पौगंडावस्थेत या वाटेने मनात फार गहिरे रंग पेरले होते. त्या वाटेवर ‘तिचे’ घर होते. वाढत्या वयात हळूहळू अनेक नवनव्या गोष्टी घडत गेल्या जगण्यात आणि हळूहळू त्या वाटेवरची वहिवाट मोडत गेली; पण अजूनही काही आठवणींनी ती वाट मनातल्या माळावर एक जत्रा गजबजून उठवून जाते. त्याच वाटेने जरासे पुढे गेल्यावर एक मोठे पटांगण लागते. तिथे एक मोकळी बखळ होती आणि बाजूला एक पिठाची गिरणी. सांजेला दिवेलागण झाल्यावर पोरे तिथे सूरपाट्याचा डाव मांडत. एकीकडे गिरणीच्या मोठ्या टायरी पत्त्याचा आणि गिरणीच्या जात्याच्या कायम लयदार घुमत असलेला आवाज आणि त्या पार्श्वसंगीतावर खेळणाºया पोरांचा टिपेला जाणारा कोल्हाळ अशा दुहेरी गदारोळाने ती वाट ऐन सवसांजेला जिवंत व्हायची.
त्याच जिवंत वाटेचे एक टोक गावाच्या दुस-या बाजूला असलेल्या मसणवटीकडे घेऊन जाते. ती वाट कायम मनात धडकी भरवून असायची. दोन्ही बाजूंनी वाटेवर कललेल्या झुडपांनी व्यापलेल्या त्या वाटेने जायचे म्हणजे छातीतल्या नागा-यावर भयाची टिपरी सडकून पडायला लागे. विशेषत: दुपारभर त्या वाटेवर किरकि-यांची अखंड किरकिर चालू असे. ती मनातले भयाचे सावट अजून गडद करून सोडे. सांज कळल्यावर त्या वाटेने जाणे म्हणजे आम्हा पोरांचे प्राणच कंठाशी येत. गावातले कुणी गेले की, बायाबापड्यांच्या रडण्याच्या स्वर पाठीवर घेऊन तिरडीवर निजलेला माणूस त्याच वाटेने चार जणांच्या खांद्यावरून ती वाट शेवटची चालून जाई आणि काही वेळाने पलीकडच्या ओढ्याच्या काठावरून भडकल्या चितेच्या आगीचे लोट आणि धूर उसळलेला गावातून दिसे. त्या वाटेवरून तिरडीवर गेलेली माणसे पुढे कधीच गावात दिसायची नाहीत. त्यातल्या काहींचे भूत झाल्याच्या वावड्यांनी त्या वाटेचाही थरकाप उडून जाई. त्या वाटेवरून जाताना जागजागी आधी गेलेल्या तिरड्या आठवून येत आणि अंगावर काटा उभा राही.या वाटेने जायला नको नको वाटे. अजूनही नको नकोच वाटते.
(लेखक अंबाजोगाई येथील प्रसिद्ध साहित्यिक आहेत.)