शेतक-यांची गाथा सारे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 12:29 PM2017-10-08T12:29:16+5:302017-10-08T12:30:04+5:30
बुकशेल्फ : ‘माणूस गुणी आहे म्हणून त्यांना महाराष्टÑातले सगळे जण बोलावतात,’ कवी श्रीकांत देशमुखांचे वडील शेतकरी साहेबराव देशमुख राहेरीकर म्हणाले. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्याविषयी एकूणच सर्व जण आपुलकीने आदर व आनंद मनातून दाखवतात. या सात्त्विक व तात्त्विक माणसाने सर्वांच्या मनातील समर्पक बोलून आपले केलेले आहे. ९५ (पंच्च्याण्णव) वर्षांचे साहेबराव म्हणाले, ‘माझी शंभरी तुझ्या अध्यक्षतेखाली साजरी करू’ आणि आर.आर. आबा म्हणायचे, ‘कवी जरा नेहमीच भेटत जा हो.’ निष्कर्ष काय तर या कवीने आपल्या कवितेने महाराष्ट्राचे सारे मन समृद्ध केले आहे. अशा या कवीच्या दहा कविता संग्रहांचा एकच ‘सारे रान’ कविता संग्रहात कवीचे सारे मन महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राचे सारे मन ‘सारे रान’मध्ये गुंतलेले आहे.
- अरूण चव्हाळ
पीकपाणी’, ‘आम्ही काबाडाचे धनी’, ‘दूर राहिला गाव’, ‘कुळंबिणीची कहाणी’, ‘गावाकडं’, ‘पेरा’, ‘टाहो’, ‘मुलूखमाझा’, ‘वेचलेल्या कविता’, ‘भूमीचे मार्दव’ या कविता संग्रहांतील साºया कविता या प्रस्तुत कविता संग्रहात समावेशित असून, त्या सर्वांसाठी संग्रहासाठी सोप्या झालेल्या आहेत. ‘गाथा’ हातात घेऊन वाचताना जे समाधान लाभते तत्त्वत: ‘सारे रान’ अनुभवून मनाला तेवढेच समाधान लाभते, माणसास उभारी देणारा हा संग्रह समग्र शेतक-यांच्या दु:खाशी तादात्म्य पावण्यास भाग पाडतोच. वाचकांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. ‘शेतकºयांची गाथा सारे रान’ ते यासाठी की, कवीचीच एक कविता आहे;
‘कबीर जोतिबा । बोलला जे तुका
सारेच का फुका । वाया गेले
खरा धर्म पोथी । कुराणात नाही
धर्म म्हणजे काही । वस्तू नव्हे
मातीतून जे जे । उगवते वर
खरा तिथे तर । धर्म आहे’
संतकवी तुकाराम महाराज स्वत: कुणबिक (शेती) करायचे. त्यांनीही प्रत्यक्ष शेतक-याच्या रूपातच पांडुरंगाला मानले. शेतकरी तुकारामांना प्रमाण समजून लिहिणारे कवी आणि ‘सारे रान’ ‘शेतक-यांची गाथा’ आहे ते या द्वैतामुळेच आणि तिपेडी बाज असा की, पांडुरंग, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा, चोखोबा, जनाई, बहिणाबाई, गाडगेबाबा, फुले आदींच्या माध्यमातून विचारांचा खळाळता प्रवाह परिवर्तनाची तटबंदी सांभाळून समतोल समाजाची बांधणी करतो. आयुष्यातील अनेक अनुभव अधोरेखित करतो. विविध घटनांचा, वैभवाचा, इतिहासाचा, वर्तमान आणि भविष्यकाळाचा साक्षीदार हा कवितासंग्रह आहे. कवीच्या मुखातून मुलुखाची आलेली वर्णने वैविध्यपूर्ण आहेत. उत्कट, उत्कृष्ट आणि उत्थानासाठी कविता संग्रह संग्रहनीय आहे.
कवी प्रा. इंद्रजित भालेराव हे पहिल्या कविता संग्रहापासून (पीकपाणी) ते आतापर्यंत प्रकाशक व वाचकाचे वाचनप्रिय कवी आहेत. त्यामुळे प्रकाशक पुस्तकाचे निर्मिती मूल्य अप्रतिम करतात आणि शब्दश्रीमंती व एकजीव आशयामुळे कवीच्या कविता गुणगुणल्या जातात. शेतक-यांची कविता लिहिणारे म्हणून ते जरी सर्वत्र प्रसिद्ध असले तरी निसर्गातील अर्थातच, सृष्टीतील व्यापक पसारा ते कवितेतून मांडत आलेले आहेत. शास्त्रोक्त आणि लोकोक्त याद्वारे शाश्वतवाणी आणि लेखणी त्यांची खास वैशिष्ट्ये ठरलेली आहेतच.
‘अलगद खोदत जावी जमीन आणि तिनेही पान्हा म्हणून सोडावेत पाण्याचे झरे आणि भागावी तहानक-यांची तहान-लाभावी तृप्ती,’ असेच काही कवी भालेराव यांचे आहे. शेती-शेतकरी आणि त्यांचे कष्ट आणि स्वत: कष्टकरी असल्यामुळे कवी आपल्या बोलीतून महत्त्वाची कविता खोदत जातो आणि आपल्या शब्दांच्या पाण्याने समीक्षकांसह सारस्वतांनाही शेतक-यांची जिद्द आणि प्रामाणिकपणाचे वाचन करायला लावून तृप्त करतो. मराठी भाषेत आपल्या भाषेची रास उभारून भाषेची आबादानी करतो.
शेतकरी स्वत:च्या मायीसारखीच भूमातेची सेवा करतात. त्यामुळे त्यांचे वंदन खरे आहे. मात्र, सृष्टी फुलविल्यावर आस्वाद घेणारे कधीही शेतक-यांना लुटतात तेव्हा कवी त्यांची झाडाझडती घेऊन शेतक-यांचा कैवारी होतो. एरव्ही सर्व पक्षांचे - संघटनावाले - संस्थावाले - विद्यापीठे आणि माध्यमे त्यांना बोलावतात; पण सर्वांत मिळून मिसळून आपण आपले नामनिराळे राहून शेतीविषयी एकरूप होऊन शब्दांचा कैवार घेणारे कवी प्रा. भालेराव सत्तेपेक्षा सत्यनिष्ठ आहेत. म्हणून त्यांच्यावर सर्वांची निष्ठा आहे आणि हा माणसाळू कवी, दुष्काळातही फक्त शेतकरीच सुकाळ होण्याची आस धरतो म्हणजेच पसायदानातील ‘तिमिर जावो’चा खरा पाईक शेतकरी आहे, हे ‘सर्वांही सदा सज्जन’ आहेत, याची जाणीव कवी करून देतो. गाव आणि गावकरी खंगत चाललेत आणि आज नावकºयांचे नाव होते. शेतकºयांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव आणि सामाजिक भावही दुरावतोय म्हणून आता आपण आत्मीयता बाळगावी अशी कवीची ‘नैसर्गिक आस’ आहे.
‘ज्याला झाडाची तहानभूक
पाखरांची भाषा
मुंग्यांचे संकेत
आणि जमिनीतल्या
पाण्याचे प्रवाह कळतात
त्याला देव मानायला
माझी हरकत नाही’
असे भूदेव शेतक-यांविषयी कवी म्हणतो ते खरेच आहे किंवा शेतकरीणबाईविषयी,
‘तू रस्ता चुकली बाई
तू उगाच केली घाई
हे निवडुंगाचे रान
समजलीस आंबेराई’
शेतात राबणा-या मायबहिणींची जीवघेणी परिस्थिती काळीज तोडते. आता हे शास्त्रकार, व्याकरणकर्ते, सरकार, सावकार यांच्याबरोबरच साहेब आणि लुटारू, लोकसेवकांनाही कळायला हरकत नाही. शेतक-यांना शेतीचे एकूणच ‘अर्थ’कारण शरद जोशी समजावून सांगायचे. त्यांच्या चळवळीचा एक शाब्दिक कार्यकर्ता म्हणून शरद जोशींचा जसा शेतक-यांत जीव होता, तसा कवीतही जीव होता. आईतखाऊ परदेशातून शेतमाल आयात करून येथील शेतक-यांच्या अन्नधान्याचा भाव पाडतात. मंदी निर्माण करून शेतक-यांचा माल कमी दामात खरेदी करतात. परत निर्यातीतून नफा कमावतात. त्यामुळे शेतकरीदादा ‘बळी’ जातो. म्हणून कवी लिहितो,
‘गाफील राहिलो आपून
तर सगळंच नेतील कापून
जगण्यासाठी नुरलं कारण
आपलं सोप्याहून सोपं मरण’
कवी समर्थपणे शेतक-यांना दिशा देतो आणि लोकजागर करतो. त्याच्या आतून शब्द पाझरत असल्यामुळे तो आश्वासक आहे. आपल्या मातीचा माणसांचा उत्कर्ष त्यांना भावतो. त्याचे मराठवाडी शब्द भाषेची व्यासंगता जोजवतात. गवत, दगड, पाखरे, पिके आदी गोष्टींच्या रूप आणि स्वरूपाची सांगड घालून त्यातील सम्यक प्रतिमा आणि प्रतीकांतून कवी फार मोठी अर्थसुबत्ता वाचकांच्या ओंजळीत भरभरून देतो. पैठणी वरून जरी पाहिली तरी तिचा पोत आणि पदर जाणत्या धन्याच्या ध्यानी लगेच येतो. कवीच्या कवितेची भाषिक महानता चटकन वाचतानाही पटकन कळते. तरीही कवितेचे अंतरंग निर्मिती- मांडणी अर्थातच व्याकरणाच्या अंगोपांगी जाणिवेने एकनाथ पगारांची या ‘सारे रान’ला लाभलेली प्रस्तावनाही वाचकाला- अभ्यासकाला मोहवून टाकते. कवीच्या कवितेचा ‘वाचननाद’ करायला पगारांसारखे शब्दपारखी मोलाचे आहेत. ‘सारे रान’ सर्वांना सम्यक दृष्टी प्रदान करून आत्मभान देते, हे निश्चितच. ‘आता पेटवू सारे रान... आता उठवू सारे रान...’ या आदर्शवादाने राबणारे हात लढणारे व्हावेत ही आशा ‘सारे रान’मधून दिसते. माणसांतील महान संवेदनशीलता जागृत ठेवते.
सारे रान (कवितासंग्रह)
कवी : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ
पृष्ठे : ४४०, किंमत : ५०० रु.