Blog: भावसंगीताच्या अवकाशातला 'शुक्रतारा' निखळला
By नेहा सराफ | Published: May 6, 2018 11:22 AM2018-05-06T11:22:01+5:302018-05-06T11:24:13+5:30
अनेक भावगीतांना अजरामर करणारा गायक काळाच्या पडद्याआड
- नेहा सराफ
मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा.. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं हे भावगीत यंदा ५५व्या वर्षात पदार्पण करतंय.. काळ बदलला, पिढ्या बदलल्या पण तरीही प्रत्येकाला 'तू अशी जवळी रहा' सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच...मराठी भावसंगीताच्या आकाशात अढळस्थान निर्माण केलेल्या या गीताला अमरत्व बहाल करणारे गायक अरुण दाते यांच्या आठवणींचा हा लेखाजोखा...
ते वर्ष होत १९६३चं ....इंदोर रेडिओ स्टेशनवर एक तरुण गायक उर्दू गझल पेश करत होता. इकडे मुंबई केंद्रावर श्रीनिवास खळे त्या गझलेला दाद देत होते. आणि त्या तरुणाचं मराठमोळं नाव ऐकून ते अवाक झाले. इतक्या नजाकतीने आणि माधुर्याने शब्दांना सुरांनी उलगडणारा हा गुणी गायक आपल्याला कसा माहिती नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. नेमकं त्याचवेळी त्यांच्याकडे एक गाण तयार होत आणि त्यासाठीचा आवाज त्यांना या तरुणाच्या रूपाने मिळाला होता . पुढे या गाण्याने इतिहास रचला आणि मराठी संगीत क्षेत्राला मिळाला भावगीतांचा राजा...हे गाणं होत शुक्रतारा मंदवारा आणि गायक अर्थातच अरुण दाते. शुक्रतारा जमून येताना फक्त संगीतकार खळे आणि शब्दप्रभू मंगेश पाडगावकर यांचेही मोठे योगदान असल्याचे अरुण दाते आवर्जून सांगतात. पण अरुणजींना ऐकलं आणि शुक्रतारा ध्वनिमुद्रित केलं इतकाच या गाण्याचा इतिहास नाही. त्यात काही अडथळेही आले पण त्याला दाद न देता शुक्रतारा अवतरला आणि भावसंगीताचे दिवस पालटले.
दाते कुटुंब मूळ इंदौरचं... कलाकारांच्या कलेची कदर करणारे रामूभैय्या दाते हे अरुणजींचे वडील. मात्र इंदौरला वाढल्यामुळे अरुण यांचे मराठी गाण्याइतपत शुद्ध नव्हते. त्यामुळे खळेंनी अनेक पत्र पाठवूनही अरुण यांच्याकडून उत्तर येत नव्हते. शब्दांच्या उच्चारांबद्दल साशंकता असल्याने त्यांनी उत्तर देणे टाळले होते.अखेर खळे आणि यशवंत देव यांनी रामूभैय्यांकडे तक्रार केली आणि त्यांनी अरुण यांना समजावले. मराठी मातृभाषा असताना त्यात गाणं न गाण्याची त्यांचा विचार रामूभैय्यांनी बदलला. त्यावेळी खळे यांनी चाल ऐकवली आणि अरुण आश्चर्यात बुडाले. त्यांच्या आवाजासाठीच हे शब्द आणि चाल विधात्याने घडवली असल्याचा साक्षात्कार त्यांना मनोमन झाला आणि उदयाला आला शुक्रतारा... हिंदी भाषेत बहुतांश गाणी गाणाऱ्या सुधा मल्होत्रा यांनी त्या गाण्यात अरुण यांना साथ दिली. ते अरुण यांचं पाहिलं गाणं तर होतच पण संगीत संयोजक अनिल मोहिले यांचंही पाहिलं गाणं होत आणि मराठी भावगीतामधलं पाहिलं युगुलगीतदेखील..पुढे या जोडगोळीने हजारो कार्यक्रम एकत्र केले. शुक्रतारा गाजल्यावर अरुण यांना भावसंगीताचे हजारो कार्यक्रम केले.भारताबाहेर तर अरुण यांनी तिथल्या स्थानिक गायिकेसोबत गाणं सादर करत असत. त्यांना या गाण्यात साथ करणाऱ्या गायिकांची संख्या सुमारे शंभरच्याही पुढे आहे.
गेले काही दिवस शारीरिक व्याधींमुळे त्यांचं गाणंही थांबलं होतं मात्र शुक्रताऱ्याचा सुगंध त्यांनी शेवटपर्यंत जपला होता. त्यांची ही अत्तरकुपी त्यांचे चिरंजीव अतुल दाते जगभर दरवळत ठेवण्याचे काम करत आहेत. कविता भावली तरच भावगीत गाणार, या अरुण यांच्या तत्वामुळे त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. त्यामध्ये स्वरगंगेच्या काठावरती, या जन्मावर या जगण्यावर, रंग माझा तुला, भातुकलीच्या खेळामधली, मान वेळावूनी, अखेरचे हे येतील माझ्या, उषःकाल होता होता, अशा अनेक रसिकांच्या मनात रेंगाळलेल्या गाण्यांचा समावेश आहे. विशेषतः कवी मंगेश पाडगावकर आणि संगीतकार यशवंत देव यांच्यासोबत त्यांची जोडी अधिक जमली.या गीतत्रयीने कितीतरी गाणी दिली. नुकताच 4 मे'ला दातेंचा 85वा वाढदिवस पुण्यात साजरा करण्यात आला.त्यानिमित्ताने पुण्यात हा कार्यक्रमही पार पडला. त्यावेळी दाते जास्त आजारी असल्याचं समजलं. तेव्हाच कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली. अखेर आज दिवस उगवला तो या अरुणोदयाच्या मावळण्याचीच खबर घेऊन... मराठी भावगीताच्या अवकाशातले एका सुरेल पर्वाचा अस्त झाला. अरुणजी आज नसले तरी त्यांचे स्वर श्रोत्यांच्या मनात कायमच शुक्रताऱ्यासारखे अढळ राहतील यात मात्र शंका नाही !