राजाश्रय लाभलेले शिल्प माणिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:11 PM2017-09-03T13:11:26+5:302017-09-03T13:17:08+5:30
स्थापत्यशिल्पे : उस्मानाबाद येथील माणकेश्वर गाव आज तेथील सटवाईच्या जागृत स्थानामुळे प्रसिद्ध आहे; पण त्याच्याच शेजारी असलेले ऐतिहासिक व सुस्वरूप महादेवाचे मंदिर हे दुर्लक्षित राहिले आहे.
- साईली कौ. पलांडे-दातार
इतिहासाचा धांडोळा घेता आपल्याला अणदूर शिलालेखात चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्याच्या मुलाने, मल्लिकार्जुन यांच्या या मंदिरास दान केल्याचे पुरावे सापडतात. स्थानिक लोक मंदिर ‘मल्लिकार्जुन मंदिर’ या नावाने ओळखतात, हा योगायोग नसावा. मंदिराच्या सभामंडपातील खांबावर असलेल्या शके ११४५ सालातील शिलालेखात आपल्याला यादव राजा सिंघन याने या मंदिराला दान दिल्याची नोंद सापडते. लेख त्रुटीत असल्याने पुढील माहिती कळत नाही. मंदिर व शिल्पांची शैली व ऐतिहासिक पुरावे बघता मंदिराची निर्मिती नक्कीच १२ व्या शतकात झाली असावी.
मुख्य मंदिरासमोर दोन ते अडीच फुटांचा गजथर कोरलेला मोठा चौथरा आहे जो की कधीकाळी वाहन मंडप असावा.
मूळ मंदिर हे उंच पीठावर उभे आहे आणि त्या उंचीवरून मंदिराभोवती मंदिराच्या तलविन्यासाच्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला दिसतो. आज देवळाचे शिखर अस्तित्वात नाही ना त्याचा अंदाज येण्यासाठी खुणा शिल्लक आहेत. पाय-या चढून जाता मुख मंडप गूढ मंडप (भिंतींनी बंद असलेला), देवकोष्ठयुक्त अंतराळ व तीन गर्भगृह अशी रचना दृष्टीस पडते. मंदिराच्या मुखमंडपाच्या बाजूने बाहेर आलेले देवकोष्ठयुक्त अर्धस्तंभ ही महाराष्ट्रात कुठेही न आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण रचना होय! मुख मंडपात वामनभिंतीवर (अर्ध्या उंचीच्या) गजथर, मनुष्यकृती व शिखरयुक्त स्तंभाची रचना आहे आणि मागील बाजूने बसायला कक्षासने आहेत.
मंदिराच्या सभा मंडपाचा व गर्भगृहांचा तलविन्यास तारककृती असल्याने मूर्ती कोनात बसवल्या आहेत. उपपीठावरील उपान पट्टीवर देवता मूर्तीचे शिल्पांकन आहे. गर्भगृहावरील ३, सभा मंडपावरील २ व मुखमंडपाच्या बाजूची २ अशी एकूण ७ देवकोष्ठे आहेत; पण ती दुर्दैवाने रिकामी आहेत. सभामंडपाचे छत समतल असून कमलाकृती व मनुष्याकृती कोरल्या आहेत. मुख्य द्वारशाखा ७ शाखांची हस्तीनी प्रकारची आहे व शैव द्वारपाल, नदी देवता, प्रतिहारी पायापाशी कोरले आहेत. ललाटबिंबावर गणेश प्रतिमा आहे व मुख्य माणकेश्वराचे लिंग गर्भगृहात आहे. मंदिरामधील रंगाशिलेभोवती चार स्तंभांवर नक्षीदार अलंकरण असून चौकोनी भागावर देवता मूर्ती आहेत, त्यात कालिया मर्दन, बन्सीधर कृष्ण व नंदिकेश्वरची शिल्पे बसवलेली आहेत. स्तंभांवरील मधल्या चौकटीत भैरव आचार्य योगी प्रतिमा आहेत. त्यावरील एका पट्टीवर यादव राजा सिंघन देवाचा लेख नागरी लिपीत कोरलेला आहे.
मराठवाड्यात, औंढा नागनाथ मंदिराखालोखाल सर्वात अधिक पूर्णाकृती शिल्पे महादेव मंदिराच्या बाह्यभागावर आढळतात. त्यात अर्धस्तंभांच्या मध्ये सूरसुंदरी व देवता मूर्ती बसवल्या आहेत. आठ दिशांचे आठ दिक्पाल अनुक्रमे कुबेर, ईशान, इंद्र, अग्नी, यम, निऋती, वरुण व वायू हे त्यांच्या वाहनांसोबत कोरले आहेत. मंदिरावरील दोन महिषमर्दिनी व दोन महिषासूरमर्दिनी या गतिशील आणि तेवढ्याच सुबक आहेत. शिवाचे भैरव स्वरूप, अंधकासुर वधमूर्ती, नटराज ही शिवाची विविध रूपे मंदिरावर अंकित आहेत. सरस्वती, चामुंडा, दुर्गा, ब्रह्मा, हरिहर, भैरव, बटू भैरव, गणपती, २४ प्रकारच्या विष्णुमूर्तीमधील काही शिल्पे अशी बरीच रेलचेल आहे.
मंदिराच्या बटूभैरव मूर्तीच्या हातात खटवांग (दंडावर मानवी कवटी) नावांचे आयुध दिसते व त्यातील खटवांगाच्या डोळ्याच्या खोबणीतून बाहेर आलेला साप दाखवला आहे. मर्दला, पुत्र वल्लभा, दर्पणा पत्रलेखिका, कर्पूरमंजिरी या चालुक्यांना प्रिय असलेल्या सूरसुंदरी मंदिरावर शिल्पांकित केल्या आहे. प्रदक्षिणा मार्गावर सुबक मकरप्रणाल एक कोनात कोरले आहे. इंद्राणी, ब्राह्मणी, वैष्णवी, करवीर निवासिनी महालक्ष्मी ही शक्तिरूपे मंदिराचे वेगळेपण आहे. मंदिर शिल्पे जरी काही प्रमाणात खंडित असली तरी मूर्तीचे शरीरसौष्ठव, प्रमाणबद्धता, वस्त्रांचे घोळ, दागिन्यांची नाजूक नक्षी व डौल हा वाखाणण्याजोगा आहे. बहुतेक मूर्ती त्रिभंग (तीन कोनात वळलेल्या) असून नृत्यमग्न आहेत, तर काही समभंग आहेत. मंदिराच्या आसपास खंडित मूर्ती विखुरलेल्या दिसतात तसेच काही मध्ययुगीन समाध्या आहेत.
आज सटवाई मंदिर हेही कदाचित पूर्व मध्ययुगीन स्त्रीदेवतेचे लोकदैवतीकरण झाले असावे. राजाश्रय असलेले शिवालय व लोकदेवतेचे स्थान आज माणकेश्वर अभिमानाने बाळगून आहे. या ठिकाणांची योग्य माहिती तिथे फलक लावल्यास येणाºया भाविकांना व पर्यटकांना उस्मानाबादचे एक दुर्लक्षित सांस्कृतिक अंग जाणून घेता येईल.
(लेखिका पुरातत्वज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ आणि इतिहास संशोधक आहेत.)