अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी घेणारी कवी : पी.विठ्ठल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:54 PM2017-09-10T13:54:36+5:302017-09-10T13:54:50+5:30

रसगंध : ‘घडू शकतं असं ही की, हळूहळू लोक आपल्या हनिमूनचे नग्न फोटो फेसबुकवर अपलोड करतील आणि फोटोंना लाइक किंवा शेअर करण्यासाठी व्ह्युअर्सच्या उड्या पडतील...’

Unhealthy current entry poet: P. Vithal | अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी घेणारी कवी : पी.विठ्ठल

अस्वस्थ वर्तमानाच्या नोंदी घेणारी कवी : पी.विठ्ठल

googlenewsNext

- डॉ. संजीवनी तडेगावकर
 

समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलाची नोंद पी. विठ्ठल या कवीच्या कवितेतील ओळी समर्थपणे घेताना दिसतात. काळानुरूप सृष्टीत काही बदल होतात अर्थात ते अपरिहार्यच असतात; पण हे बदल समाज कशा रीतीने स्वीकारतो, पचवतो आणि व्यक्त करतो. हे त्या समाजातील प्रगल्भतेवर अवलंबून असते. साहित्यातही प्रत्येक कालखंडात हे बदल होत आहेतच. नव्या जाणिवांचे हिरवे कोंभ त्यातून रुजताना दिसतात. ते कधी सकारात्मक असतात तर कधी नकारात्मक! त्या - त्या वेळची मनाची तंग अवस्था, जीवनातील अस्थिरता, ध्येयाच्या वाटेवर पसरलेला अंधार या सा-या अनुभवातून कवीची व्यक्तिवादी निराशा त्याच्या अभिव्यक्तीतून डोकावताना दिसते. 

अलीकडच्या काळात तर हरेक अनुभव मग तो कितीही वैयक्तिक असो तो इतरांना शेअर करण्याकडे वाढता कल पाहून अस्वस्थ व्हायला होते. कोणते? किती? आणि काय? लोकांना दाखवावे यावर कुणाच्याच मनाचे निर्बंध राहत नाही. कुणी अडचणीत असताना एखादा अपघात झाल्यावर तातडीने मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पाठवण्यात धन्यता मानताना दिसतात. भूतदया... मानवता... करुणा या सामाजिक जाणिवा त्यावेळी कुठे जाणवत नाहीत; पण त्याचवेळी दूरदेशीच्या कुण्या नव्याने झालेल्या ओळखीच्या व्यक्तीच्या, मित्रांच्या वाढदिवसाच्या (सामाजिक मानसिकतेच्या दबावापोटी दिल्या जाणा-या) शुभेच्छा देण्यात इमाने - इतवारे गुंतलेले अनेक जण दिसतात. समाजातील या ढोंगी दिखाऊ चमकोगिरीला चिमटे काढण्याचे काम पी. विठ्ठल यांची कविता करीत असल्याचे दिसते.

वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला बुद्धिजीवीवर्गसुद्धा जेव्हा राशी भविष्य पाहून कार्यप्रणाली ठरवतो तेव्हा कवी म्हणतो :

‘राशींची दहशत माझ्या मानगुटीवर दररोज असते
‘आज जपून बोला’ म्हटलं की मी हळू बोलतो.
‘वाहन हळू चालवा’ म्हटलं की मीच हळू चालतो.’

हे चित्र अगदी सर्रास पाहायला मिळते. फरक फक्त इतकाच असतो की, कुणी ते मान्य करतो तर कुणी नाही. आज जेव्हा प्रत्येक वर्षी एका ‘बाबा’चं पितळ उघडं पडत असतानाही समाजातील त्यांची वाढती संख्या आणि समाजाचा दैवभोळेपणा कुणालाच कसा चिंतेचा, चिंतनाचा विषय वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. कुठल्याही धर्माच्या धार्मिक स्थळावर तरुण भक्तांची वाढती संख्या हे नेमकं कोणत्या प्रगतीचं लक्षण आहे, माहीत नाही. त्या संदर्भात कवी लिहितो :

‘किती बदलत चाललाय काळ
पाखंडी भक्तांची लांबच लांब रांग वाढत चाललीय तरी माणसाच्या मतलबी उच्चाराला मिळत नाहीत समृद्धीचे हिरवे शब्द!’

वास्तव हे सत्य आहे, त्याला नाकारता येत नसले तरी स्वीकारता येणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. या वास्तवाला झाकण्याचा, लपवण्याचा त्याच्याकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न जसा जगताना समाजाकडून होतो... तसाच लेखकांकडून वेळप्रसंगी होताना दिसतो. समूहमनाच्या दहशतीला घाबरून सामाजिक प्रतिष्ठा जपण्याच्या नावाखाली अनेकदा लेखक बोट चेपेपणाची भूमिका घेतो. ही त्याची भूमिका सभ्यतेच्या नावाखाली अभिव्यक्तीचा गळा घोटताना दिसते. ही अगतिकता व्यक्त करताना पी. विठ्ठल म्हणतात :

‘आपलं स्टेटस आपण जपलं पाहिजे म्हणून
एखादा इंग्रजी पेपर मी टीपॉयवर ठेवतो
गावाकडचा पाहुणा आला की,
असलं इंग्रजी वगैरे बघून खूप कमी बोलतो
किंवा बोलतच नाही...!’

काही केल्या पावलांचे ठसे उमटणे थांबले की, झाडांच्या सावल्या दुरावत चालल्याचा भास होतो. अशावेळी माणूसपणाचा होत जाणारा -हास पाहण्याखेरीज हातात काहीच राहत नाही...

म्हणूनच तर घेतलेल्या अनुभवाकडे कधी आपुलकीने तर कधी तटस्थतेने कधी मिस्किलपणे तर कधी भावनाकुलतेने कधी दुरून तर कधी फार जवळून कधी भूमिकेच्या जाणिवेतून तर कधी तत्त्वचिंतनाची बैठक मारून नव्या जाणिवेच्या कवींनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. प्रत्येकाची अनुभव घेण्याची लकब अर्थातच स्वतंत्र असेल नव्हे ती आहेच. खरं तर, वास्तववाद कशाला म्हणायचे? याबाबत समीक्षाशास्त्रात कितीही वादावादी झाली तरी गेल्या काही वर्षांत आपल्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन झाले आहे. तसेच साहित्यातूनही ते दिसून येते. नव्या जाणिवेच्या शब्दकळेनं ललित साहित्यातील हे बदल नव साहित्य / वास्तववादी म्हणून नोंदवले गेले आहेत. जात आहेत. कवी पी. विठ्ठल हे याच विचारप्रणालीतून व्यक्त होताना दिसतात.

‘माझ्या वर्तमानाची नोंद’ आणि ‘शून्य एक मी’ या दोन्ही कवितासंग्रहातून त्यांनी बदलत जाणा-या भोवतालाबद्दल, माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तीबद्दलचे वास्तववादी चित्रण केले आहे. स्वत:ची त्वचा स्वत:च सोलून काढावी... तशी त्यांची कविता कवीच्या अस्वस्थतेच्या नोंदी घेताना दिसते. पापण्यांवर बसलेलं दु:ख पाहू न शकणा-या कवीची अगतिकता जणू माणूसपण थिजत चालल्याची साक्ष देणारीच आहे...

Web Title: Unhealthy current entry poet: P. Vithal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.