खैरेंचे वैष्णोदेवीला साकडे; शिरसाटांचा दांडिया अन् चव्हाणांचे फटाके !
By सुधीर महाजन | Published: October 23, 2017 11:40 AM2017-10-23T11:40:08+5:302017-10-23T11:40:29+5:30
विश्लेषण : लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळवडीने सर्वांचीच करमणूक झाली होती.
- सुधीर महाजन
लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळवडीने सर्वांचीच करमणूक झाली होती. एकमेकांना पाण्यात पाहत एक-दुस-याला अडचणीत आणण्याचे शह-काट शहचे राजकारण रंगले. खैरेंनी जि.प. निवडणुकीत जाधवांच्या पत्नीला पराभूत केले म्हणून जाधवांनी खैरेंच्या निधीतील घोटाळा बाहेर काढला. या दोघांच्या एकमेकांवरील चिखलफेकीने पक्षच अडचणीत आला आणि अचानक दिलजमाई नाटकाचा एपिसोड व्यासपीठावर आला. हे अचानक घडलेले नाही. हे वरवरचे आहे, खरे तर मातोश्रीवरून दोघांनाही कानपिचक्या देण्यात आल्या आणि खैरेंसाठी कन्नड तालुका महत्त्वाचा आहे, म्हणून त्यांनी नरमाईचे धोरण घेतले. शिवसेनेत सध्या पडद्यामागच्या घडामोडींना वेग आला आहे. नंदू घोडेले महापौरपदाचे उमेदवार ठरले; परंतु त्यापूर्वी नवरात्रीच्या काळात खैरे, घोडेले, सोमनाथ साखरे आणि जया गुदगे अशा चौघांनी वैष्णोदेवीची यात्रा केली. त्यामुळे ब-याच काळानंतर जया गुदगेंचे नाव चर्चेत आले. या समीकरणाचे उत्तर लवकरच समोर येईल.
स्वबळावर औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंचाचा सत्कार घडवून आणणारे अंबादास दानवे गेल्या काही दिवसांपासून ‘लाइम लाइट’पासून दूर आहेत; पण परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स अंबादास दानवेंनी शहरात झळकावले. यावर फक्त या दोघांची छायाचित्रे होती. त्याची एक वेगळीच चर्चा आहे. दानवेंचासुद्धा लोकसभेवर डोळा असू शकतो. पाच वर्षांपूर्वी किशू तनवानी यांनीसुद्धा रावतेंचे असेच पोस्टर लावले होते याची आठवण झाली. दानवेंच्या या पोस्टरवर पालकमंत्री रामदास कदम आणि खा.चंद्रकांत खैरे या दोघांचीही छायाचित्रे नसल्याने प्रत्येक जण त्याचा आपल्या परीने अर्थ लावत आहे. याच गडबडीत सुहास दाशरथे आणि प्रदीप जैस्वाल हे खैरे गोटाकडे सरकल्याचे दिसतात, हा सूक्ष्म बदल लक्ष ठेवण्यासारखा आहे.
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी दांडियाने वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. एरवी शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा असतेच; पण शिरसाट यांच्या दांडियाच्या कार्यक्रमात ही प्रतिमा नव्हती, अशी कुजबूज शिवसैनिकांमध्ये असल्याचे शिरसाट यांच्याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात कोणत्या दिशेला त्यांची पावले वळतात त्यावरून अनुमान काढता येईल. प्रदीप जैस्वाल हे खैरेंच्या जवळ नुसतेच सरकले नाहीत तर जैस्वाल समाजाच्या बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती दिसू लागली, कारण यापूर्वी खैरे समाजाच्या बैठकीला नसायचे. महापौरपदासाठी नंदू घोडेलेंची उमेदवारी मुंबईहून जाहीर झाली. यापूर्वी येथे सर्वांसमक्ष नावाची चर्चा व्हायची आणि उमेदवार ठरायचा, पण घोडेलेंची घोषणा मातोश्रीवरून झाली याला वेगळेच महत्त्व आहे आणि शिवाय राज्यात प्रत्येक ठिकाणी अडवणूक करणारा भाजप या पदासाठी उमेदवार उभा करणार नसल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केल्यामुळे वरच्या पातळीवर काय चालू आहे याचे सर्वांनाच कोडे पडले.
याच वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांच्या वक्तव्याने रंगत आणली. खैरे यावेळी निवडून येणे अवघड. गेल्या वेळी मोदी लाटेमुळे निवडून आले हे त्यांचे वक्तव्य खळबळ उडवण्यापेक्षा लोकसभेसाठी आपण उत्सुक असल्याचा सूचक निर्देश देणारे होते. खरा प्रश्न एकच आहे. सतीश चव्हाण हे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार असतील?